किन्नर भगिनींसोबत दिवाळीचा समरस सोहळा

    22-Oct-2022   
Total Views |
kinnar



‘यंदाची दिवाळी किन्नर भगिनींसोबत’ हा कार्यक्रम राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे येथे दि. 21 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. ‘माय ग्रीन सोसायटी’ आणि ‘स्वयम् महिला मंडळा’ने हे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. यावेळी ठाणे शहरातील किन्नर भगिनी यामध्ये सहभागी झाल्या. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते रा. स्व. संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, ठाणे शहर उपायुक्त शंकर पाटोळे, ‘माय ग्रीन सोसायटी’चे विशाल टिब्रेवाल. एक अत्यंत संवेदनशील हृद्य असा हा कार्यक्रम. दिवाळीनिमित्त अनेक स्नेहसंमेलने होत असतात. पण, त्या पार्श्वभूमीवर ‘यंदाची दिवाळी किन्नर भगिनींसोबत’ या संमेलनाचे वेगळेपण आणि महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त साडी आणि मिठाई वितरण असे जरी कार्यक्रमाचे स्वरूप होते तरी या कार्यक्रमाचे अंतरंग म्हणजे ‘सब समाज को साथ लिये’ म्हणत समाजात समरस भाव वृद्धिंगत करणे हाच होता. हाच भाव इथे शब्दरूप मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

“जन्माला येणारे बाळ स्त्री आहे की पुरूष की किन्नर, हे प्रत्यक्ष त्याच्या आईबाबांनाही ठाऊक नसतेच. त्यामुळे स्त्री-पुरूष-किन्नर म्हणूनही माणसाने जन्म घेतला तरी तो शेवटी माणूसच आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, हीच किमान अपेक्षा. कारण, सगळेच शेवटी समाजाचे घटक. कुणीही उच्च नाही की कुणीही नीच नाही. किन्नर भगिनींनी स्वतःला कधीही एकटे समजू नये. सगळा समाज तुमच्या सोबत आहे.” रा. स्व. संघ कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे सांगत होते आणि समोर बसलेल्या किन्नर भगिनी त्यांचे हे विचार ऐकून अतिशय भावूक झाल्या. ‘माय ग्रीन सोसायटी’ आणि ‘स्वयम् महिला मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यंदाची दिवाळी किन्नर भगिनींसोबत’ या कार्यक्रमामध्ये कांबळे किन्नर भगिनींशी संवाद साधत होते.

किन्नर भगिनींशीसंवाद साधताना खरे तर विठ्ठलजीसुद्धा तितकेच भावूक झाले. कारण, समरस समाजाचे अंतरंग संघाच्या स्वयंसेवकाला उलगडले नाही तरच नवल! कोकण प्रांताचे कार्यवाह असलेल्या विठ्ठलजींनी सध्याच्या समाजात किन्नरांचे स्थान आणि योगदान यावर विस्तृत विवेचन केले. विठ्ठलजी म्हणाले की, “किन्नरांमध्ये स्त्री आणि पुरूष या दोघांच्याही गुणांचे मिलन असते. अनुभवामुळे बुद्धिचातुर्य असते. कोणती परिस्थिती कशी हाताळावी याचे उत्तम आकलन असते. एखाद्या वेळी जर संशयास्पद काही आढळले, तर त्याबाबत जरूर माहिती घ्या. तुमच्या गुरूंना सांगा किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही अशा व्यक्तीस सांगा, जे याबाबत योग्य निर्णय घेतील. हा देश, हा समाज आपला आहे. तुमच्या सहकार्याशिवाय समाज पुढे जाऊच शकत नाही.” विठ्ठलजींचे हे मौलिक विचार ऐकताच किन्नर भगिनींनी टाळ्यांचा एकच गजर केला. हात उंचावून सगळ्याजणींनी त्यांना अनुमोदनही दिले. समोर बसलेले अतिथी विठ्ठलजी हे आपले दुःख, आपल्या समस्या जाणतात, आपण काय काय भोगले आहे, आपण कशाकशावर मात केली आहे, याची इत्यंभूत माहिती विठ्ठलजींना आहे, हे ऐकून सगळ्याच किन्नर भगिनी खर्‍या अर्थाने या दिवाळी संमेलनामध्ये समरस झाल्या.

 
यावेळी उदय कुलकर्णी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. पर्यावरण आणि सध्याचे जीवन याबद्दल भूमिका मांडताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, तर याचवेळी ‘माय ग्रीन सोसायटी’चे विशाल टिब्रेवाल यांनी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘माय ग्रीन सोसायटी’चे अनेक सामाजिक उपक्रम सुरू असून त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. शासकीय योजनांचा लाभ किन्नर भगिनींना मिळावा यासाठी पुढाकार घेण्याचे मत त्यांनी मांडले. त्यांच्या सोबत ‘माय ग्रीन सोसायटी’चे कर्मचारी प्राजक्ता, मनीष आणि आंचल यांनी उपस्थितकिन्नर भगिनींचे प्रातिनिधिक स्वरूपात ‘ई-श्रम कार्ड’ही बनवले. यावेळी व्यासपीठावर किन्नर भगिनी प्रतिनिधी म्हणून कामिनी घोडके आणि भावनाताई उपस्थित होत्या. भावनाताई म्हणाल्या, ”कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खूप सहकार्य केले.


‘लॉकडाऊन’मुळे किन्नर समाजाला उपाशी मरायची वेळ आली. मात्र, रा. स्व. संघाने रेशनकिटचे जागोजागी वितरण केले, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. अगदी आमच्या समाजाचे पालकत्वही स्वीकारले. त्याबद्दल आम्ही रा. स्व. संघाचे खूप आभारी आहोत.” पुढे भावनाताईंनी किन्नर समाजाला भेडसावणारे प्रश्न मांडले. “किन्नरांना अनुदान मिळते, पण त्यासाठी अटीशर्ती नियम असतात. सरकारी कागदपत्र गरजेची असतात. सगळ्याच किन्नरांकडे ही कागदपत्र नाहीत.


किन्नरही शिक्षण घेतात, पण त्यांना नोकरी मिळत नाही. त्यांना कुणीही कामावर ठेवत नाही. भीक मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय तरी काय आहे? तिरस्कृत होऊन जगणे कुणाला आवडते? पण, नाईलाज आहे. सरकारने किन्नरांना हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे. त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या असतात, त्याकडेही लक्ष द्यावे,” हे सांगत असताना त्यांनी समोर उपस्थित असलेल्या किन्नर भगिनींचा आवर्जून उल्लेख केला. “ती अत्यंत आजारी असून ती भीक मागूनही स्वत:चा उदरनिर्वाह करू शकत नाही. उपचार करणे आणि त्यासाठी योग्य आहार घेणे हे सगळे ती करूच शकत नाही. बरे, इतर किन्नरांचीही परिस्थिती अशीच! मग तिला कसे जगवणार?” असे म्हणताना भावनाच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर कामिनी यांनीही अश्रू आवरते घेतले.अर्थात, भावना किंवा कामिनी यांनी किन्नर समाजाचे मांडलेले प्रश्न काही नवीन नव्हतेच.न संपणारे प्रश्न, त्यांची कोंडी फोडणे आवश्यक आहे, असा मनात विचार करत होते आणि त्याचवेळी विठ्ठलजी म्हणाले, ”भावनाताई, काळजी करू नका. तुमचा बंधु आणि सगळा समाज तुमच्या सगळ्याजणींच्या सोबत आहे. बघू काय करता येते ते.” असे आश्वासित करुन विठ्ठलजींनी त्या किन्नर भगिनींबद्दल सविस्तर माहिती घेतली.

 
आतापर्यंत कार्यक्रम नियोजित स्वरूपात होता. म्हणजे सुरुवातीला दिवाळीनिमित्त माता लक्ष्मीचे पूजन आणि आरती, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार, त्यानंतर सगळ्यांचे मनोगत. मात्र, आता कुटुंबाच्या सदस्यांनी एकमेकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्या प्रश्नांवर काय करता येईल, याचा आत्मियतेने विचार करावा, याकडे कार्यक्रमाची वाटचाल सुरू होती. व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोरचे प्रेक्षक असलेल्या किन्नर भगिनी यांच्यातील अंतर संपून स्नेहसंवेदनाचे नाते निर्माण झाले होते.


इतक्यात कार्यक्रमाचे दुसरे मान्यवर अतिथी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे हेसुद्धा तिथे दाखल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात किन्नर भगिनी दिवाळी स्नेहसंमेलनात सहभागी झाल्या म्हणून त्यांनी आनंदही व्यक्त केला. त्यांनी किन्नरांसाठी काय योजना आहेत? ठाणे महानगरपालिका त्यासंदर्भात काय करू शकते, याबद्दल सुसंगत माहिती दिली. ते म्हणाले की, “ठाण्यातील किन्नर समाजाच्या विकासासाठी काय करता येईल, यासाठीही नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.


दिवाळीनंतर उपस्थित किन्नरांच्या शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिकेत यावे, योजना समजून घ्याव्यात, त्यानुसार या योजना आपण मिळून राबवूया,” असे उपायुक्त पाटोळे म्हणाले. इतकेच नव्हे, किन्नरांच्या अनुदान, घर आणि वैद्यकीय सुविधा याबाबत आपण अधिकारी म्हणून तर जातीने लक्ष देऊच, पण तुमच्या सगळ्यांचा भाऊ म्हणूनही या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेईन, अशी त्यांनी खात्रीही दिली. यानंतर अतिथींच्या हस्ते किन्नर भगिनींना साडी आणि मिठाई वितरित करण्यात आली. वैष्णी महिला मंडळाच्या मंजू यादव, मिता सावंत, वनिता चौहान, सीमा चौहान, सपना धारा, संजू यादव यांनी अत्यंत आपुलकीने या वितरणाची जबाबदारी पार पाडली.


असो. लौकिक अर्थाने कार्यक्रम संपला होता. मात्र, तरीही किन्नर भगिनी हॉलमध्ये थांबल्या होत्या. विठ्ठलजी तसेच शंकर पाटोळे यांच्याशी संवंद साधत होत्या. त्या म्हणत होत्या, ”घरातल्या लेकीबाळीसारखे तुम्ही आम्हाला समजून घेतलेत. आमच्या दुःखावर मायेची फुंकर घातलीत. तुम्ही आमच्यासोबत दिवाळी साजरी केलीत. खरेच खूप बरे वाटले.” दिवाळीचा पहिला दिवस किन्नर भगिनींसोबत साजरा करून काय साध्य झाले, असा प्रश्न काही मंडळी उपस्थितही करू शकतात. तर त्यांच्यासाठी गेल्या आठवड्याची मुंबईच्या पश्चिम उपनगरातली घटना इथे मुद्दाम सांगायलाच हवी.


मुंबईतल्या त्या भागात देवीचे एक मंदिर. या मंदिराची पूजाअर्चा एक किन्नर करायचे. पुजारी म्हणूनच सगळे त्यांचा आदर करायचे. या मंदिरात त्यांच्या अधिपत्याखाली विविध हिंदू सण-उत्सव साजरे केले जायचे. मंदिराचे कार्य सुरळीत चालावे म्हणून या पुजार्‍यांनी मंदिराचा ट्रस्ट निर्माण केला. त्यामध्ये एका स्थानिक ख्रिश्चन व्यक्तीलाही सामील केले. या मंदिरामध्ये पुजारी महाराजांचे शिष्यही राहत असत. देवीची पूजाअर्चा करणे, मंदिराची सफाई आणि लक्ष ठेवणे असे ते काम करत. असे सगळे सुरू असताना पुजारी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर या देवीच्या मंदिराच्या पाठच्या भिंतीवर अचानक मोठा क्रॉस बांधण्यात आला. पुजारी महाराजांनी मंदिराच्या ट्रस्टवर नियुक्ती केलेल्या ख्रिश्चन व्यक्तीची शेवटची इच्छा, असे काही जण म्हणतात.

मात्र, याविरोधात परिसरातील नागरिकांनीच आवाज उठवला. त्यानंतर तो क्रॉस तिथून हटवण्यात आला. किन्नर पुजारी असलेल्या आणि प्रमुख असलेल्या देवीमातेच्या मंदिराबाबत असे का व्हावे? कारण, इतर किन्नरांना वाटले की, आपण मंदिराबाबत बोललो तरी आपले कोण एकणार? ना समाज ना कायदा? हे जे किन्नरांना वाटले तेच खूप दुःखद. त्यांना वाटले की, समाज त्यांना कधीच समजून घेणार नाही, त्यांचा हक्क असला तरी. या सगळ्या परिक्षेपात एक स्पष्ट होते की, किन्नर समाजाशी उर्वरित समाजाचा सुसंवाद असणे गरजेचे आहे. ही त्यांची गरज नाही, तर आपल्या सगळ्या समाजाची गरज आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये आपण संकल्प करू की, ‘सब समाज को साथ लिये’ हा मंत्र केवळ बोलण्यापुरता नाही, तर जगण्याचाही विषय करूया...

राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या विश्वस्त आणि पदाधिकार्‍यांची आपुलकी...
हा कार्यक्रम राष्ट्र सेविका समिती संचालित राजमाता जिजाबाई ट्रस्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला ट्रस्टच्या कार्यवाह संहिता कुलकर्णी, विश्वस्त अ‍ॅड. भारती गुजराथी विश्वस्त, विभा निमकर उपस्थित होत्या. तिघीजणी राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका. या कार्यक्रमाला कसलीच कमी पडू नये म्हणून या भगिनींनी अतिशय सुंदर नियोजन केले. घरी एखादा समारंभ असावा आणि घरच्या लक्ष्मीने पडद्याआड राहून सगळा कार्यक्रम कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करावेत, असेच या तिघींचे वागणे. कार्यक्रमात चहापानाची व्यवस्था ‘माय ग्रीन सोसायटी’ किंवा ‘स्वयम् महिला मंडळा’ने केलीच नव्हती. पण, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी किन्नर भगिनी ट्रस्टच्या वास्तूत आल्या आहेत. मग त्यांना आदरातिथ्य केल्याशिवाय कसे जाऊ द्यायचे, असे या भगिनींचे मत. त्या दिवशी नेमके ठाणे शहरात दूध वितरणाची काही तरी समस्या झाली. शहरात कुठेच दूध उपलब्ध नव्हते. पण, चहापान तर करायचेच म्हणून मग कळव्याला राहणार्‍या ट्रस्टच्या विश्वस्त अ‍ॅड. भारती गुजराती या कळव्यावरून दूध घेऊन आल्या. इतके प्रेम आणि आपुलकी. कल्पना करा, समितीच्या या भगिनींचे जगणे आणि किन्नर भगिनींचे जगणे यामध्ये कमालीचे अंतर. पण, या कार्यक्रमाला उपस्थितीत किन्नर भगिनी आपल्या भगिनी आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पदर खोचून समितीच्या भगिनींनी 50 ते 60 कप चहा बनवला. आईच्या मायेने त्यांनी तो सगळ्या किन्नर भगिनींना दिला. हेच ते समरस जगणे ना?




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.