श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहाद सांगितला : शिवराज पाटील

    21-Oct-2022
Total Views |
आपल्या धर्मावर चाल करून आलेल्या आणि आपल्या धर्माचा विनाश करणाऱ्याच्या विरोधात शस्त्रं उचलण्याचा उपदेश करणारी गीता आणि आपल्या धर्माचा आक्राळविक्राळ विस्तार करण्यासाठी हिंसेसह कुठल्याही गैरमार्गाने अगदी निर्घृणपणे फैलावणारा जिहाद यातील मूळ फरक समजण्यातच शिवराज पाटील चुकले आहेत. त्यामुळे पाटलांच्या बेसिकमध्येच लोचा झाला आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं !
परित्राणाय साधुनां विनाशायाचं दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे !
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर जे काही अमृतवचन सांगितले होते त्यात या श्लोकाचंही समावेश होता. अर्थात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल म्हणजे धर्म संकटात येईल तेव्हा त्याचं उत्थान करण्यासाठी मी पुन्हा अवतरित होईल. संकटात अडकलेल्या साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेईल असं भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं होतं. श्रीकृष्णाने अर्जुनाला शस्त्रं उचलायला सांगितली होती पण त्याचा वापर अधर्माच्या विरोधात करायचे संकेतही घालून दिले होते. थोडक्यात काय तर आपल्या धर्मावर चाल करून आलेल्या आणि आपल्या धर्माचा विनाश करणाऱ्याच्या विरोधात शस्त्रं उचलण्याचा उपदेश करणारी गीता आणि आपल्या धर्माचा आक्राळविक्राळ विस्तार करण्यासाठी हिंसेसह कुठल्याही गैरमार्गाने अगदी निर्घृणपणे फैलावणारा जिहाद यातील मूळ फरक समजण्यातच शिवराज पाटील चुकले आहेत. त्यामुळे पाटलांच्या बेसिकमध्येच लोचा झाला आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.


माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कधीकाळी सोनिया गांधींचे निकटवर्तीय राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना हिंदू समाजाचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या गीतेची तुलना थेट जिहादासोबत केली आहे. युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही शिकवलं तो जिहाद होता असं चाकूरकर म्हणाले. मुळातच काँग्रेस नेत्यांकडून हिंदू धर्माचा अपमान करणारी, त्याची थट्टा उडवणारी आणि त्या विरोधात गरळ ओकणारी वक्तव्ये मागील कित्येक वर्षांपासून सातत्याने आलेली आहेत, त्याला शिवराज पाटील तरी कसे अपवाद ठरू शकतील. आपल्या आयुष्याची ८७ वर्षे ओलांडलेल्या शिवराज पाटलांकडे सध्या काँग्रेसचे कुठलेही पद नाही, राष्ट्रीय सोडा पण राज्याच्या राजकारणातही त्यांचे महत्त्व कितपत राहिले आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही.
शिवराज पाटील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून बाजूला झाले असले तरी असंच काहीबाही बोलण्याची आणि बेजबाबदार वर्तन करण्याची त्यांची ही काही पहिली वेळ नाही. देशावर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी पाटील गृहमंत्री होती. म्हणजे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील इतक्या गंभीर घटनेवेळी या गृहमंत्र्यांकडून झालेले वर्तन नक्कीच चुकीचं होतं. शिवराज पाटलांनी दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी आयोजित केलेल्या पाच बैठकांसाठी पाच वेळा कपडे बदलले होते आणि त्यावरून त्यांना बरेच फटकारे देखील सहन करावे लागले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने आयोजित केलेल्या बैठकीला देखील गृहमंत्री असलेले पाटील लेटलतीफ बनून उशिरा पोहोचले होते.

म्हणजे एखाद्या संवेदनशील घटनेच्या वेळी देखील केंद्रीय गृहमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती किती असंवेदनशीलपणे वागू शकते याच उत्तम उदाहरण त्यावेळी चाकूरकरांनी घालून दिल होतं. देशात २००४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून लातूरच्या निलंगेकर घराण्यातील रुपालीताई निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा निवडणुकीत थोडाथोडका नव्हे तर ३० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. शिवराज पाटलांच्या तुलनेने नवख्या आणि कमकुवत भासवले जाणाऱ्या रुपालीताई निलंगेकर यांनी या दिग्गज नेत्याला धूळ चारून घरी पाठवले होते. पण सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबाशी जवळीक असलेल्या शिवराज पाटील यांना घराण्यातून दिल्लीत बोलावले गेले आणि थेट गृहमंत्री पदावर बसवले गेले जे की अनाकलनीय होतं, पण असो.


शिवराज पाटील असोत व काँग्रेसची कथित पुरोगामित्वाची टिमकी वाजवणारी गॅंग कायमच हिंदू द्वेषाची आणि हिंदू धर्मियांची थट्टा उडवणारी विधाने करण्यात स्पर्धा लावूनच पुढे येतात हा इतिहास आहे. केवळ आणि केवळ polerisation म्हणजे ध्रुवीकरणाचे अजेंडे पुढे आणण्यासाठीच अशा ज्येष्ठ अर्कांना ही विधाने करण्यासाठी सांगितलं जात असावं असं वाटतं. शिवराज पाटलांनी ज्या जिहादची गीतेशी तुलना केली तो जिहाद म्हणजे नेमका काय आणि त्यात आणि गीतेत नेमकं कुठलं साम्य चाकूरकरांना सापडलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. कारण तसा कुठलाही संदर्भच अस्तित्वात नाही हे उघड आहे. पाटील देशाचे केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे कुठल्याही कैद्याला न्यायालयात घेऊन गेल्यावर त्याला गीता किंवा कुराणची शपथ घ्यायला लावतात हा संकेत माहित असावा. पण जर त्यांच्या म्हणण्यानुसार गीता आणि जिहाद एकाच आहे तर मग त्यांनी त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात जिहादची शपथ घ्यायची असा पायंडा का पाडलं नाही ? न्यायालयात गीता आणि कुराणाची शपथ देतात जिहादची नाही कारण जिहाद हे हिंसाचार आणि कट्टरवादाचे प्रतीक असल्याचं संपूर्ण जगणे मान्य केलेले आहे.


एका बाजूला शिवराज पाटील ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे ५२ वर्षीय युवा नेते राहुल गांधी देश जोडायचा ही घोषणा करून भारत जोडो यात्रेसाठी भटकंती करत आहेत. विविध धार्मिक स्थळांना आणि धर्मगुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. राजकीय नेता म्हणून हा त्यांच्या या यात्रेवर आक्षेप घेण्यात काहीच अर्थ नाही. परंतु दुसरीकडे त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सत्तेची सूत्रे पुन्हा दिली तर देशात सनातन धर्माची ताकद वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. राहुल यांच्या पदयात्रेचे कौतुक करताना त्यांची नेतेमंडळी इतकी बेभान झाली आहेत की महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले परवा बोलताना तर राहुल गांधींची रामाशीच तुलना केली होती. म्हणजे अनाकलनीय झाल्यात गोष्टी आता. अहो काही वर्षांपूर्वी राम अस्तित्वातच नव्हता राम ही केवळ एक कल्पना मात्र आहे असं छातीठोकपणे कोर्टात जाऊन सांगणारी मंडळी आता त्यांच्याच नेत्याची तुलना रामाशी करू लागली आहेत यातून काँग्रेसच्या वैचारिक गोंधळाची स्थिती लख्खपणे अधोरेखित होते.


मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या राजकारणाने आपली कूस बदलली आहे. भाजप आणि मोदींचे सरकार आल्यापासून कित्येक वर्षांपासून दाबला गेलेला हिंदू आणि हिंदुत्त्ववादी ताठ मानेने जगायला शिकली असली तर कधी त्यांनी सत्तेच्या गैरवापराने कट्टरतावादाला आणि संप्रदायिकतेला डोक्यावर घेतलं नाही आणि त्यामुळेच देशाचं राजकारण विकासात्मक बाबींवर ठेवण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न फलद्रुप झाले. पण त्याला छेद देण्याचं काम आता पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वादाची बीजे रोवून करण्याचे प्रयत्न विरोधी मंडळी करत आहेत. आणि हे होतंय ये उगाच नाही. काही आठवड्यांवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यात मतांची बेगमी करण्यासाठी आणि आपलं अस्तंगत होत असलेलं कौटुंबिक पक्षाचं बिर्हाड वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे विकासात्मक दृष्टिकोनाने वाटचाल करणाऱ्या नवभारताकडून अशाप्रकारच्या कट्टरतावादाला किंमत दिली जाणार का ? आणि धार्मिक भेदाभेदाच्या आडून सुरु असलेल्या या सांप्रदायिक राजकारणाला लोक प्रतिसाद देणार का ? हे लवकरच समजेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.