पुणे : पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढविणार आहे. त्याबाबतचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर तयारीला लागणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकासकामांचा ‘सीएम’, ‘डीसीएम’ दरमहा आढावा घेणार आहेत.
पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजित विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना व भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेनेचे खा. श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, बाळा भेगडे, आ. महेश लांडगे, राहुल कुल, रमेश कोंडे, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि विकासकामांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर विकासाला अधिक गती मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यात कायमच राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले. परंतु, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील बारामतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्या तुलनेत जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाकडे पवारांचे लक्ष राहिले नाही. राज्य सरकारच्या जास्तीत-जास्त योजना, निधी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळावा. त्यादृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
पुणे जिल्ह्यात प्रशासकीय अधिकार्यांची नियुक्ती करताना दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घ्यावे. त्यांना विश्वासात घेऊनच अधिकार्यांची नियुक्ती करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह दरमहा विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासाला आणि कामांना चालना मिळणार आहे.