निशिकांत यांचा अनुभवाचा प्रवास

    21-Oct-2022   
Total Views |
galwant tours
 
 
प्रवास ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट. प्रवासातून आपल्याला काहीतरी आनंद घेता यावा किंवा तो प्रवास अविस्मरणीय ठरावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा. हा प्रवास सुखकर व्हावा, कुठल्याही अडचणींशिवाय व्हावा, अशी सेवा आपल्याला मिळावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण, या प्रवासात आपल्याला ‘पर्सनल टच’ देणारी, या प्रवासात आपली काळजी घेणारी, आपल्या आवडीनिवडींनुसार आपली संपूर्ण ट्रीप अरेंज करून दिली, तर आपल्या संपूर्ण प्रवासाचा नूरच पालटून जाईल, हीच किमया आहे ‘गॅलवन्ट टूर्स’च्या निशिकांत शिंदे यांची. त्यांच्या या स्टार्टअपविषयी...
 
निशिकांत शिंदे यांच्याकडे पर्यटन व्यवसायाची तशी कुठलीच पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणाने तर ते इंजिनिअर. शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्वसाधारण मुलांसारखा नोकरीचाच पर्याय त्यांनीही पत्करला. नोकरीनिमित्त त्यांना पुण्याला स्थायिक व्हावे लागले. पण, या नोकरीमध्ये त्यांचे अजिबात मन रमत नव्हते. स्वतःचे अस्तित्व तयार करावे, स्वतःचा व्यवसाय करावा, हेच त्यांच्या मनात होते आणि तेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यामुळे नोकरीत असतानासुद्धा स्वतंत्रपणे काय व्यवसाय सुरु करता येईल, असा विचार ते करत. लहानपणापासूनच त्यांना फिरण्याची आवड होती. या आवडीतूनच ते मग ‘ट्रेकिंग’, ‘राफ्टिंग’सारख्या गोष्टींमध्ये कायमच पुढे असत. लहानपणापासून त्यांनी ती आवड जोपासली होती. नोकरी सोडून जेव्हा आपल्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा, असे जेव्हा निशिकांत यांनी ठरवले तेव्हा कुठला व्यवसाय करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा आपल्या या लहानपणापासूनच्या आवडीलाच आपला व्यवसाय का बनवू नये, असा विचार करून त्यांनी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करावा, असे ठरवले आणि 2019 साली सुरुवात झाली ‘गॅलवन्ट टूर्स’ची.
 
 
 
प्रत्येक टूर जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला चांगलाच अनुभव घेण्याची आणि आपली ट्रीप चांगलीच व्हावी, अशी इच्छा असते. बरेचदा सध्याच्या ट्रॅव्हल कंपन्यांकडून जी ‘ट्रॅव्हल पॅकेजेस’ तयार केली जातात, ती आपल्या आवडीनिवडींमध्ये ‘फीट’ बसतीलच असेही नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्या गोष्टी आवडतीलच, असेही नाही. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते आणि त्यानुसार फिरायला मिळाले, तर त्या व्यक्तीला ते आवडणारच. पण, अशा पद्धतीने सगळ्या कुटुंबाला आवडू शकेल, असे ‘पॅकेज’ मिळणे अवघडच. याच गोष्टीवर ‘गॅलवन्ट’ काम करते. जेव्हा कुठलाही ग्राहक ‘गॅलवन्ट’कडे येतो, तेव्हा त्याच्याशी संवाद साधून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आवडीनिवडी सर्वप्रथम जाणून घेतल्या जातात. त्यानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आवडू शकेल, असे ठिकाण असणारी एखादी ट्रीप ‘प्लान’ केली जाते. म्हणजे प्रत्येकाला आवडतील, अशी ठिकाणे ज्याला-त्याला बघता येतात.
 
 
आता उदाहरण घ्यायचे झाले, तर एका चार-पाच जणांच्या कुटुंबात, कोणी वडीलधार्‍या व्यक्ती असतील, तरुण मंडळी असतील, तर त्या सगळ्यांना आवडेल असे ठिकाणच त्यांना ट्रीपला जाण्यासाठी सांगितले पाहिजे, जेणेकरून त्यांना एकत्र जाण्याचा आनंद घेता येईल. त्यांना आपण केरळसारखे ठिकाण सांगू शकतो, जिथे वडीलधार्‍या व्यक्तींसाठी छान दाक्षिणात्य पद्धतीची सुंदर देवळे आहेत. लहान मुलांना आणि तरुण लोकांना आवडतील, अशी बॅकवॉटर्स आहेत, अजूनही निसर्गरम्य ठिकाणे आहेत, यातून आपण संपूर्ण कुटुंबाला आवडेल, अशी ट्रीप होते.
 
 
“अशा संपूर्ण प्रवासात आपली कंपनी ही कायम ग्राहकांशी ‘कनेक्टेड’ राहण्यावर जास्त विश्वास ठेवते,” असे निशिकांत सांगतात. त्यामुळे ग्राहकांशी स्वतः ‘कनेक्ट’ राहतात. त्यामुळे आपल्यावरचा ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि त्यांच्यात आणि आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार होते. त्यामुळे ते त्यांना येणार्‍या अडचणींबद्दल खुलेपणाने आपल्याला सांगतात. त्याचमुळे आपला व त्यांचा एक बंध जुळल्याने आपल्या विश्वासार्हतेत वाढ होते, ज्याचा आपल्या प्रतिमासंवर्धनात खूप फायदा होतो. असेच एक उदाहरण निशिकांत सांगतात.
 
 
त्यांच्यातर्फे एक वयस्कर कुटुंब बालीला गेले होते. बालीमध्ये फिरत असताना त्यांच्याकडून जास्त खर्च झाला आणि त्यांच्याकडचे सगळे डॉलर्स खर्च झाले. आता त्या अनोळखी देशात आपल्याला कोण मदत करणार? आपण भारतात परत कसे येणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांना काहीच कळेना. त्यांनी काकुळतीला येऊन निशिकांत यांना फोन केला की, अशी अडचण आमच्यासमोर आली आहे, काहीही कर पण आम्हाला मदत कर, अशी विनंती त्या जोडप्याने निशिकांत यांना केली. त्यांचा हा प्रश्न समजताच निशिकांत यांनी अवघ्या 15 मिनिटांत डॉलर्सची व्यवस्था केली आणि त्या कुटुंबाचा प्रश्न सोडवला. अशा पद्धतीने अत्यंत तत्परतेने हा प्रश्न सोडवल्यामुळे त्या जोडप्याने निशिकांत यांचे खूप आभार मानले. अशा पद्धतीचे अनेक प्रसंग निशिकांत यांनी अनुभवले आहेत.
 
 
या सर्व प्रवासात सर्वात कठीण काळ म्हणजे कोरोनाचा. कोरोनाचा सर्वात जास्त फटका ज्या कुठल्या क्षेत्रांना बसला असेल, त्यापैकी एक म्हणजे पर्यटन क्षेत्र. सगळे काही बंद असल्याने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. कित्येक व्यावसायिकांना तर घर कसे चालवायचे, हा प्रश्न होता. या काळाने संपूर्ण नुकसान केले. काहींनी हा व्यवसायच सोडून दिला आणि दुसरा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या अशा काळात निशिकांत यांनी धीराने स्वतःचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. अजिबात आपले लक्ष ढळू न देता त्यांनी काम सुरुच ठेवले. त्यामुळे कसेबसे का होईना, पण दोन वर्षांचा काळ त्यांनी धीराने सहन केला आणि त्यातून आपला व्यवसाय टिकवला. जसा जसा कोरोनाचा काळ सरायला लागला, सगळी क्षेत्रे पुन्हा सुरु होऊ लागली, तसे पर्यटन क्षेत्रानेही जोर धरण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत घरात बसून सर्व लोक कंटाळले होते. आता सध्या ‘रिव्हेंज टुरिझम’चा ‘ट्रेंड’ आला आहे. सगळी लोक गेल्या दोन वर्षांचे उट्टे काढायला बाहेर पडली आहेत. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आता पर्यटनस्थळांकरिता ‘बुकिंग’ मिळणे अवघड झाले आहे. सगळी पर्यटन क्षेत्रे ओसंडून वाहत आहेत.
 
 
आता या क्षेत्रात ज्या नवीन उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे, त्यांनी या क्षेत्रात येताना एक भान ठेवावे की, आपल्या ग्राहकांना आपण काय वेगळे देऊ शकतो? आपल्या सेवेने त्यांना कायम संतुष्ट कसे ठेवता येईल? आपल्या सर्व गोष्टी कायम त्यांच्याशी ‘कनेक्टेड’ कशा राहतील? आपला आणि आपल्या ग्राहकांचा कायम थेट संवाद कसा होत राहील? या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे भाग आहे. जर आपण ते तसे करू शकलो, तरच आपल्याकडे आपले ग्राहक टिकणार आहेत. त्यांना आपली सेवा आवडली, तरच आपले ग्राहक आपल्या सेवेला वाखणणार आहेत. अशा पद्धतीनेच व्यवसाय करणे महत्त्वाचे राहील. तसेच पर्यटन हे क्षेत्र देशातील सध्या सर्वात वेगाने वाढणार्‍या क्षेत्रांपैकी आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यास भरपूर वाव आहे आणि ग्राहकांचा दृष्टिकोनही बदलतो आहे. यामुळे नवीन उद्योजकांसाठी ही खूप मोठी संधी आहे आणि त्याचा फायदा त्यांनी उचलावा, असे निशिकांत सांगतात.
 
 
स्वतःला त्या व्यवसायची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या व्यवसायात उतरून आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पनांनी आपल्या व्यवसायाला आकार देऊन स्वतःचे स्थान तयार करणार्‍या निशिकांत शिंदे यांचा प्रवास खरोखरीच स्तुत्य आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.