फडणवीस - शिंदे - राज
मुंबई : दीपावलीच्या औचित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादर येथील शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या या दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थितांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेला दीपावली पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
राजकीय संदर्भ नाही !
हे त्रिकुट मंचावर एकत्रित आल्याने सुरु झालेल्या संभाव्य युतीच्या चर्चेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी पार्कवर आम्ही मनसेच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरीचा कुठलाही राजकीय अर्थ नाही. यापूर्वीही आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो, त्याचप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी एका मंचावर आलो होतो. त्यामागे कुठल्याही राजकीय समीकरणांचा संदर्भ नाही,' अशी स्पष्टोक्ती शिंदेंनी आवर्जून केली.