संरक्षण क्षेत्रात ४० हजार कोटी रूपयांच्या निर्यातीचे भारताचे ध्येय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

    20-Oct-2022
Total Views |

नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: इच्छाशक्ती, नवोन्मेष आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या सहाय्याने भारत आता संरक्षण क्षेत्रात निर्यातक म्हणून प्रस्थापित होत आहे. गेल्या पाच वर्षांच भारताची संरक्षण निर्यात आठ पटीने वाढली आहे. येत्या काळात ४० हजार कोटींच्या संरक्षण निर्यातीचे ध्येय भारत साध्य करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो २०२२’ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
संरक्षण क्षेत्रात, इच्छाशक्ती, नवोन्मेष आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या मंत्रासह नवभारताची आगेकूच सुरू आहे. आठ वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत जगातला सगळ्यात मोठा संरक्षण विषयक आयातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र, नवभारताच्या इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाने मेक इन इंडिया हा भारताच्या संरक्षण क्षेत्रातला एक यशस्वी अध्याय होत चालला आहे. भारताची संरक्षण निर्यात गेल्या पाच वर्षात आठ पटीने वाढली आहे. जगभरातल्या ७५ हून जास्त देशांना आता संरक्षण सामग्री आणि उपकरणे निर्यात केली जात आहेत.
भारताची संरक्षण निर्यात २०२१-२२ या वर्षात एक अब्ज ५९ कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत म्हणजेच १३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि येणाऱ्या काळात, पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच चाळीस हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट भारत साध्य करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताचे संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारतीय लष्करानेसुद्धा भारतामध्येच तयार झालेले संरक्षण साहित्य खरेदी करण्याचे ठरवले आहे. अशा उपकरणांची तिसरी यादी आज जाहिर होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याद्वारे आता एकुण ४११ संरक्षणविषयक उपकरणे देशातच उत्पादित होणार आहे. या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे भारतीय संरक्षण उद्योगाचा पाया भक्कम होईल आणि त्यामुळे भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्या कर्तृत्वाची नवी शिखरे गाठतील, असेही ते म्हणाले.
स्वदेशी प्रशिक्षण विमानाचे अनावरण
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेल्या एचटीटी – ४० या स्वदेशी प्रशिक्षण विमानाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एचटीटी – ४० चा वापर बेसिक फ्लाइट ट्रेनिंग, एरोबॅटिक्स, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि क्लोज फॉर्मेशन फ्लाइटसाठी केला जाईल. त्याच्या दुय्यम भूमिकांमध्ये सुरक्षा आणि रात्रीचे उड्डाण यांचा समावेश असेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.