समाजसेवी धन्वंतरी

    20-Oct-2022   
Total Views |
dr.pramod baliram patil



गोरगरिबांच्या सेवेला वाहून घेतलेल्या जळगावच्या थोरगव्हाण गावचेसुपुत्र डॉ. प्रमोद पाटील या निवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याविषयी...
 
डॉ. प्रमोद बळीराम पाटील हे मूळचे थोरगव्हाण ता. रावेर, जि. जळगाव येथील असून सध्या ते नाशिक येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे बालपण गरिबीत गेले. शेतकरी असलेले वडील चौथी पास तर आई अशिक्षित होती. पाच भाऊ एक बहीण अशा भल्या मोठ्या कुटुंबात प्रमोद हे शेंडेफळ असल्याने त्यांचे लाड व्हायचे. गावातच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन नांदेडला भावाकडे राहून ‘एम.डी.आयुर्वेद मेडिसीन’ची पदवी प्राप्त केली. नंतर ‘एमपीएससी’मार्फत त्यांची गट ‘अ’ वर्ग वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाली होती. मुळातच समाजसेवेची आवड व तळागाळातील लोकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी शासकीय सेवेचा मार्ग निवडला. किंबहुना, जाणीवपूर्वक पदोन्नती नाकारून सेवानिवृत्तीपर्यंत 34 हून अधिक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्रातच सेवा दिली. वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त होताच नुकताच ठाण्यात ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ व ‘रोटरी क्लब’च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
वैद्यकीय सेवेत असताना सर्वच साथीच्या आजारांचे अचूक निदान करून त्यांनी साथरोग नियंत्रणात आणले. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रकारची जीवितहानी न होऊ देता त्यांनी आपले कार्य केले. त्यामुळे, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले तेथील लोकांमधे त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होऊन ते लोकप्रिय झाले. या चांगल्या कामामुळे साथरोग नियंत्रणासाठी त्यांची ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सार्क कंट्रीजच्या कार्यशाळेसाठी भारतातील नऊ लोकांमध्ये निवड झाली होती. 2000 साली ‘डेंग्यू’ची साथ असताना ते कार्यरत असलेल्या गावात 425 रुग्ण आढळले होते. परंतु, डॉ. पाटील यांनी एक महिना शाळेत मुक्कामी राहून एकही मृत्यू न होऊ देता साथ आटोक्यात आणली. म्हणून ग्रामस्थांनी सहकुटुंब त्यांचा व स्टाफचा वाजतगाजत, आरत्या ओवाळत मिरवणूक काढून अवर्णनीय असा सत्कार केला होता.
 
 
प्रसूतीबाबतची एक आठवण त्यांच्या आजही लक्षात आहे. एके दिवशी पहाटे 6 वाजताच एसटी बस त्यांच्या दारात येऊन थांबली. बसमध्ये प्रसूती रुग्ण असून गंभीर आहे, असे उत्तर आले म्हणून ते तसेच बसच्या दाराजवळ गेले आणि दार उघडले तर एक 25 वर्षांची स्त्री थेट त्यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी गांभीर्य ओळखून तसेच तिला खांद्यावर घेऊन प्रसूतीकक्षात नेले.तपासणीत तिची नाडी एकदम क्षीण लागत होती. रुग्ण पूर्ण पांढरीफटक, थंडगार, बेशुद्ध, रक्तदाब मोजला तर लागत नव्हता, विचारणा केली असता रात्री प्रसूत झाली असून ‘प्लासेंटा’ आतच राहिल्याने सतत रक्तस्त्राव चालू आहे, असे सांगण्यात आले. डॉ. पाटील यांनी नातेवाईकांना धोक्याची कल्पना दिली. तसेच, संपूर्ण वैद्यकीय कसब पणाला लावले. त्यानंतर तिची जरा नाडी लागायला लागली.परंतु, तिचा ‘प्लासेंटा’ आतच चिकटलेला होता व तो काढता येणे शक्य नव्हते.
 
 
डॉ. प्रमोद यांनी नातेवाईकांना सांगितले की, रुग्णाला जिल्हा रुग्णालयात न्यावे लागेल. त्यामुळे, गरिबीमुळे नातेवाईक चिंतेत पडले. पैसे नव्हते, परंतु जीवाला धोका असल्याने रुग्णास नेणे गरजेचे होते. त्याकाळी शासनाची रुग्णवाहिकादेखील पैसे भरल्याशिवाय मिळत नव्हती. डॉ. प्रमोद यांनी मागचा पुढचा विचार न करता शासकीय गाडी स्वतः चालवत रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दणके बसल्यामुळे ‘प्लासेंटा’ बाहेर आला आहे. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला व ती महिला रुग्ण वाचली.
 
एके दिवशी अचानक एक व्यक्ती त्यांच्या घरी आली व त्यांना पैसे देऊ लागली. त्यांना काही कळेना. ते म्हणाले हे काय आहे. तेव्हा त्या व्यक्तीने डॉ. प्रमोद यांना सांगितले की, साहेब, तुम्ही माझ्या बायकोचे प्राण वाचविले. तुम्हाला मी तेव्हा गाडी भाडे दिले नव्हते, आताही माझ्याजवळ पूर्ण पैसे नाहीत मी माझ्याकडे असलेला बैल विकून हे पैसे आणलेत. हे शब्द ऐकून डॉ. प्रमोद यांना गहिवरून आले, त्यांनी पैसे परत केले. अशा प्रकारे बरेचसे सर्पदंश, अपघात, विजेचा अपघात यांमुळे आलेले रुग्णदेखील वाचवल्याचे डॉ. प्रमोद सांगतात.
 
वृद्धांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियादेखील त्यांनी केल्या असून त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे. दरवर्षी शासनाची दिलेली उद्दिष्टे पूर्ण केल्याने व लोकांमध्ये विनातक्रार काम केल्यामुळे त्यांना वरिष्ठाकडून सतत ‘ए प्लस’ दर्जा मिळाला. चांगल्या कामामुळे नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याहस्ते ‘जीवनगौरव’पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच, ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी ते आजही सतत मदतीला धावून जातात. सोशल मीडियाच्या आहारी न जाता सध्या लोप पावत असलेली ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना पुन्हा रुजवण्यासाठी युवावर्गात ते जनजागृती करत आहेत, अशा या समाजसेवी धन्वंतरी डॉ. प्रमोद पाटील यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वकशुभेच्छा!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.