एका दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांचे पाच मोठे निर्णय!

    20-Oct-2022
Total Views |
 


हे सुद्धा वाचा...

‘विरोधी पक्ष जोडो यात्रे’ला जनता नाकारणार : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली: “देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ‘विरोधी पक्ष जोडो यात्रे’मध्ये कितीही विरोधी पक्ष सहभागी झाले, तरी त्याचा उपयोग नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगाविला. हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील विकासकामांची चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय हवाईवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.
 
यावेळी काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येत आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सहभागी होत असल्याविषयीचा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले शरद पवार की, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची स्थिती पाहता ही आता ‘विरोधी पक्ष जोडो’ यात्रा झाली आहे. मात्र विरोधी पक्षांनी कितीही एकत्र येण्याचा आव आणला, तरी त्यात तथ्य नाही. कारण, देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनाच विजय मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताचीही त्यांनी यावेळी खिल्ली उडविली. ते म्हणाले की, “सध्या काही पत्रकारांना अन्य उद्योग उरलेला नाही. सरकारविषयी विपरित बातम्या मिळत नसल्याने अशाप्रकारे ‘फॅक्टरी’त तयार झालेल्या मजेशीर बातम्या ते पसरवतात. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला आहे.
 
रेल कम रोड’ प्रकल्पावर निर्णय घेणार
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून ‘हायस्पीड’ रेल्वे आणि ‘हायस्पीड कार्गो’ रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावरसुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल,” असे केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.
 
खा. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. ती मागणीसुद्धा यावेळी अश्विनी वैष्णव यांच्यापुढे मांडली असता याबाबत सकारात्मक विचार करण्याचे अभिवचन रेल्वेमंत्र्यांनी दिले. नाशिक-पुणे ‘हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.
एअर इंडिया’ची इमारत राज्याला
“नवी दिल्ली येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली आणि मुंबईतील ‘एअर इंडिया’ची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली. सध्या मंत्रालय आणि ‘अ‍ॅनेक्स’ इमारत मिळूनसुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता.
मात्र, दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला. सध्या ‘रिझर्व्ह बँक’ आणि ‘महाराष्ट्र सरकार’ अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा!
आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल लॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. या ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’मुळे आशियातील सर्वांत मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.