याचे उत्तर तुर्की देणार का?

    20-Oct-2022   
Total Views |
 
ग्रीस
 
 
 
 
92 लोक... ज्यात महिला आणि पुरूष, आबालवृद्धही होते. सगळे निर्वस्त्र. त्यांच्या अंगावर जखमा होत्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चेहर्‍यावर वेदनाच होत्या. हे 92 निर्वस्त्र लोक कालपरवाच ग्रीस आणि तुर्कस्तान देशाच्या सीमेवर इवरेज नदीजवळ आढळले. या घटनेचे जगभरात पडसाद उमटले. या लोकांचे म्हणणे आहे की, ते इवरेज नदीमधून बोटीने प्रवास करत होते. त्यांना तुर्कीच्या प्रशासनाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना निर्वस्त्र केले. जबरदस्तीने बसमध्ये बसवले. बसेस तिथे तैनात होत्याच. नंतर त्यांना या तुर्की-ग्रीस सीमाभागात आणून फेकण्यात आले. अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही आणि पाण्याचा घोटही नाही. अशा भयंकर परिस्थितीमध्ये हे लोक या सीमाभागात फिरत होते.
 
 
 
ग्रीस प्रशासनाने या लोकांना ताब्यात घेतले. ग्रीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, रबराच्या अतिशय धोकादायक नावेचा वापर करत हे सगळे लोक तुर्कस्तानमधून ग्रीसमध्ये प्रवेश करत होते. तुर्कस्तानने हे अत्यंत लाजीरवाणे आणि भयंकर कृत्य केले आहे. मानवतेला काळीमा फासला. गेले अनेक दशके इराक, सीरिया आणि अफगाणिस्तान इथले नागरिक त्यांच्या देशातील परिस्थितीतीला कंटाळून विस्थापन करतात. तुर्कस्तान मार्गे ग्रीसला येतात. हे सगळे धर्माने मुस्लीम. तुर्कस्तान यांना ग्रीसमध्ये पोहोचण्यासाठी मदत करते. त्यामुळे ग्रीसमध्ये मुस्लीम विस्थापितांच्या माध्यमातून मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे. या मुस्लिमांमध्ये असंतोष पेरत तुर्कस्तान ग्रीसला त्रास देतो. अर्थात, हे काही नवे नाही. दोन शेजारी देश. एक मुस्लीम आणि एक बिगर मुस्लीम देश असेल, तर तिथे हे सर्रास आढळतेच. आपल्या भारताच्या सीमाभागावर तरी काय वेगळे घडले आहे.
 
 
  
असो. तर ग्रीस आणि तुर्कस्तान एकमेकांचे पारंपरिक शत्रू. ग्रीस देश ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती तर तुर्कस्तान मुस्लीम देश. त्यामुळे दोन देशात तणाव या न त्या कारणाने असतोच असतो. इतर मुस्लीम देश आज ज्या आपसातल्या दहशतवादामुळे अस्थिर आहेत. तसेच वातावरण तुर्कस्तानमध्येही आहे.
 
 
 
सध्या ग्रीसमध्ये 12 टक्के मुस्लीम धर्मीय लोकसंख्या आहे. मात्र, तरीही ग्रीसची राजधानी अथेन्स ही युरोपमधील एकमेव राजधानी होती की, जिथे एकही मशीद नाही. मुस्लीम समुदायाने याविरोधात विविध संघटनांच्यामार्फत आंदोलने केली. मात्र, तुर्कस्तानला देशात असंतोष माजवायची जराही संधी द्यायची नाही यासाठी की काय, ग्रीसने इथे विस्थापित मुस्लिमांसाठी नियम कठेार केले. तुर्कस्तान आणि ग्रीसच्या सीमाभागात एक मशीद आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी त्या मशिदीच्या आजूबाजूला अगदी सर्वत्रच बॅनर झळकले की, आमच्या शहराचे आणि देशाचे मुस्लिमीकरण करू नका. त्यावेळी ग्रीसमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. तसेच, ग्रीसमध्ये मुस्लीम समाज स्वतःचाधार्मिक प्रमुख/प्रतिनीधी निवडू शकत नाही, तर ग्रीस सरकार त्यांची नियुक्ती करते. या सगळ्यांचे भांडवल करत तुर्कस्तानने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की, ग्रीसमध्ये मुस्लीम समाजावर बंधने लादली जातात. मात्र, ग्रीसचे म्हणणे की तुर्कस्तानने आमच्या देशाच्या अंतर्गत विषयांत दखल देऊ नये. विस्थापित मुस्लिमांना तुर्कस्तान त्यांच्या देशात स्थान देऊ शकतो.
 
 
 
तर अशा या परिस्थितीमध्ये तुर्कस्तान आणि ग्रीसच्या सीमाभागात हे 92 जखमी निर्वस्त्र लोक सापडल्यामुळे ग्रीसला एक सबळ कारणच मिळाले आहे. तुर्कस्तान ग्रीसमध्ये लोकांची जबरदस्तीने घुसखोरी करते असे ग्रीसने म्हंटले, तर तुर्कस्तानने यावर मत मांडले की, ग्रीस खोटे बोलत आहे. मात्र, 92 पीडित लोकांनी तुर्कस्तानच्या सीमारक्षकांवर आरोप केला आहे, त्यावर तुर्कस्तान काहीही बोलायला तयार नाही. असो. ग्रीसचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रोफेसर जॉन नोमिकोस यांनी एका ‘वेबिनार’मध्ये बोलताना म्हटले की, ”तुर्कस्तान आणि पाकिस्तानची मैत्री ही भारत आणि ग्रीससाठी मोठा धोका आहे. पाकिस्तानी आणि चिनी गुप्तहेर संघटना या जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी एकत्र काम करतात.” या तज्ज्ञांनी अमेरिकेच्या बायडन सरकारलाही आवाहन केले आहे की, तुर्कस्तानच्या अणुशक्ती राष्ट्र बनण्याच्या स्वप्नाला पाकिस्तानने लगाम घालावा. आता या 92 पीडितांबद्दल संयुक्त राष्ट्र संघानेही प्रश्न उभे केले आहेत. याचे उत्तर तुर्कस्तान काय देणार?
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.