मुंबई : मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मराठमोळ्या दीपोत्सवाला वरळीच्या जांबोरी मैदानावर जल्लोषात सुरुवात झाली आहे. मुंबई भाजपचे आयोजन, एकाहून एक सरस कलावंतांचे सादरीकरण आणि त्याला मुंबईच्या राजकीय वातावरणाची खमंग फोडणी यामुळे ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीतही भाजपचाच बोलबाला असल्याचे दिसून येत आहे.
बुधवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमात मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार, कार्यक्रमाची धुरा हाती घेतलेले आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह इतर नेतेमंडळी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बुधवारी सुरु झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि स्वरदा गोखले यांच्या स्वरांनी वरळीकर मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी केले.
गणपती - दहीहंडी - नवरात्री आणि आता दिवाळीही जोरातच - लोढा
आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मराठमोळा दीपोत्सव आयोजित केला आहे. मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वात एका अत्यंत दिमाखदार आणि सुंदर कार्यक्रमाचे आयोजन या टीमकडून करण्यात आले आहे. फक्त कार्यक्रमाचे आयोजनच दिमाखदार नसून मुंबईकरांचा प्रतिसादही अत्यंत बोलका आणि सूचक आहे. लोक या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत असून त्यासाठी मी वरळीकरांचे मनापासून आभार मानतो. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की आता आपले सरकार आले आहे, त्यामुळे प्रत्येक सण उत्सव जल्लोषात साजरा केला जाईल. त्यामुळे मुंबई भाजपच्या आयोजनाखाली गणेशोत्सव जोरात साजरा झाला, दहीहंडी जल्लोषात झाली, त्यानंतर नवरात्रीही साजरी झाली आणि आता दिवाळीही तितक्याच जोरात साजरी होणार यात शंकाच नाही.'
- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर
'सामना ' करण्याची वेळ येईल तेव्हा मी तयार असेल - शेलार
वरळीच्या स्थानिक आमदारांचा नारा हा केवळ पेग पेंग्विन आणि पार्टी पुरताच मर्यादित आहे. मराठी भाषा - संस्कृती - कला - कार्यक्रम यासाठी त्यांनी एकही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही हे सत्य आहे. महविकास आघाडी सरकारमध्ये जनतेची वाईट परिस्थिती होती. आपल्याला शक्ती असती तर मागच्या सरकारची अडीच वर्षे डिलीट केली असती. "वरळीत सामना करण्याची वेळ येईल तेव्हा मी, सामना करायला तयार असेल.