खोले सरांची उणीव भासत राहणार!

    19-Oct-2022
Total Views |

MTB 
 
 
 
सा. ‘विवेक’च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोशा’चे मार्गदर्शक, नाट्य खंडाचे संपादक, ज्येष्ठ लेखक-संपादक प्रा. विलास खोले यांचे सोमवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्याविषयी...
 
 
 
सा.‘विवेक’च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोशा’चे मार्गदर्शक, नाट्य खंडाचे संपादक, ज्येष्ठ लेखक-संपादक प्रा. विलास खोले यांचे सोमवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी पुणे येथे निधन झाले. साक्षेपी आणि मर्मग्राही समीक्षादृष्टी लाभलेले प्रा. विलास वसंत खोले हे साहित्यविश्वात ‘खोले सर’ म्हणून सुपरिचित होते. आजघडीला मराठी साहित्य क्षेत्रात धडाडीने कार्यरत असणारे अनेक लेखक-संपादक त्यांनी घडवलेले आहेत.
 
 
प्रा. विलास खोले यांचा जन्म पुण्यातला. नूतन मराठी विद्यालय प्रशाला या शाळेतून 1961 साली माध्यमिक शालांत परीक्षा ते उत्तीर्ण झाले. 1966 साली मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयातून ते ‘बीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे 1968 साली कुलपती सुवर्ण पदकासह सर्व पारितोषिके मिळवून ते पुणे विद्यापीठातून उत्तीर्ण झाले.
 
 
1980 मध्ये पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी’ पदवी त्यांनी संपादन केली. ‘शोकांतिकेची संकल्पना व काही मराठी नाटके’ हा त्यांच्या प्रबंध लेखनाचा विषय होता. 1968 मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, खटाव येथे एक वर्ष अधिव्याख्याता म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यापुढील काळात मुंबई येथील ‘इस्माईल यूसुफ’ महाविद्यालयात ‘लोकसेवा आयोगा’च्यावतीने त्यांची निवड झाली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पुणे येथील मराठी विभागात 1975 मध्ये ते रूजू झाले आणि दि. 31 डिसेंबर, 2004 रोजी विद्यापीठाच्या मुंबई आणि पुणे येथील मराठी विभागांचे प्रमुख या पदावरून आणि पुणे परिसरातील पदव्युत्तर अध्ययन व संशोधन विभागाचे प्रशासकीय समन्वयक या पदावरून ते निवृत्त झाले. पुढे 2005 ते 2007 या दोन वर्षांच्या कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे ‘एमिरिटस फेलो’ म्हणून आणि 2007 ते 2009 या काळात भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे ‘सीनिअर फेलो’ म्हणून ते कार्यरत होते.
 
 
साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा मोठमोठ्या जबाबदारीच्या पदांचा कारभार सांभाळत असतानाच, प्रा. खोले लेखन-संपादनाचे कार्यही अविरतपणे करत होते. अनेक साक्षेपी व वैशिष्ट्यपूर्ण संपादने करून त्यांनी मराठी साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे.
 
 
ग्रीक शोकांतिकेच्या उदयाची मीमांसा करणारे ‘शोकांतिकेचा उदय’, ज्ञानेश्वरांच्या समाधीसंबंधीच्या सर्व मतमतांतरांची चर्चा करणारे ‘बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ’, मध्ययुगीन मराठीतील भक्तिसाहित्याचा परामर्श घेणारा ‘भक्तिशोभा’ हा लेखसंग्रह अशी त्यांची संपादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रभाकर पाध्ये यांच्या व्यक्तित्वाचा व वाङ्मयाचा परामर्श घेणार्‍या ‘अगस्तीचे अंगण’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी रेखा इनामदार-साने यांच्या सहकार्याने केले.



ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ (1997) या पुस्तकाच्या संपादनातून त्यांनी एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या परिस्थितीवर प्रखर प्रकाशझोत टाकला आहे. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या ‘ग्रंथ’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ या 2002 साली संपादनातून त्यांनी 1951 ते 2000 या कालखंडातील मराठी कादंबरीचा वेध घेतला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘वि. भि. कोलते पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. ‘नोबेल’ पारितोषिक प्राप्त झालेल्या लेखिकांसंबंधी विवेचन करणारी त्यांची 11 लेखांची मालिका ‘ललित’ या नियतकालिकातून प्रकाशित झालेली आहे.
 
 
‘दंडकारण्यातील प्रणयिनी’ (1987), ‘राजेंद्र बनहट्टी यांच्या निवडक दीर्घकथा’ (1998), ‘शांताराम पारितोषिक कथा’ (2008) हे त्यांचे ग्रंथ त्यांचा कथा साहित्याचा विलक्षण व्यासंग दर्शवितात.
 
 
‘वा. म. जोशी : जीवनदृष्टी आणि साहित्यविचार’ (1983), ‘सूर्यबिंबाचा शोध’ (1984), ‘अध्यात्म आणि विज्ञान’ (1984), ‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ (हे. वि. इनामदार यांच्या सहकार्याने 1988), ‘महाराष्ट्रातील राजकारणाचे साहित्यातील प्रतिबिंब’ (1998), ‘साने गुरुजींचे निवडक निबंध’ (1999), ‘लव्हाळी : काही दृष्टिक्षेप’ (2005), ‘आज्ञापत्र’ (2007), ‘केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ’ (2009) ही त्यांची महत्त्वपूर्ण संपादने!
 
 
म. द. हातकणंगलेकर, के. ज. पुरोहित, वि. रा. करंदीकर, पु. ग. सहस्रबुद्धे, माधव मोहोळकर, वा. म. जोशी, श्री. ना. बनहट्टी, साहित्यिक यशवंतराव यांसारखी 14-15 वेधक व्यक्तिचित्रे त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. ‘अमेरिका व्हाया लंडन’ हे त्यांचे प्रवासवर्णन त्यांच्या सौंदर्यग्राही नजरेतून साकार झाले आहे.
 
 
विविध नियतकालिकांमधून अनेकविध विषयांवर समीक्षालेखही त्यांनी लिहिलेले आहेत. कथा, कादंबरी आणि कविता यांच्या आशय-विषय-मांडणीतील सौंदर्यस्थळे नेमकेपणाने उलगडून दाखवण्यात त्यांचा हातखंडा होता. विसाव्या शतकातील मराठी समीक्षेचे यथोचित समालोचन करणारा त्यांचा समीक्षाग्रंथ म्हणजे ‘विसाव्या शतकातील मराठी समीक्षा’ हा होय. ‘चौकट’ या स्त्रियांच्या कथांच्या संपादनाला विस्तृत आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहून त्यांनी स्त्रीवादी साहित्य समीक्षेचा वस्तूपाठ घालून दिलेला आहे.
  
 
प्रा. विलास खोले यांच्या वाङ्मयीन विचारांचा परीघ जसा व्यापक होता, तितकाच त्यांनी जोडलेल्या माणसांचा गोतावळाही खूप मोठा होता. निरनिराळ्या माणसांना भेटणे, त्यांच्याशी साहित्यविषयक आणि साहित्येतरही गप्पा मारणे, कामानिमित्ताने घरी येणार्‍यांचे विशेष आपुलकीने स्वागत करणे यात त्यांना विलक्षण आनंद वाटे. सा. ‘विवेक’च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशा’च्या साहित्य खंडासाठी त्यांनी लिहिलेली दीर्घ प्रस्तावना ही अभ्यासकांसाठी विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.


आगामी नाट्य खंडाच्या संपादकीय कामाची सर्व जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली आणि डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सहकार्याने गेली सात-आठ वर्ष अखंड काम करून नाट्य खंडाचे काम पूर्णत्वास आणले आणि आता हा ग्रंथ वाचकांच्या, अभ्यासकांच्या हाती देण्याच्या या टप्प्यावर आता ते आपल्यात नाहीत. त्यांचे असे अचानक निघून जाणे आमच्यासाठी अतिशय क्लेशदायक आहे. ‘शिल्पकार चरित्रकोश’ प्रकल्पाच्या पुढील प्रत्येक टप्प्यावर खोले सरांची उणीव भासत राहणार आहे. त्यांना विनम्र आदरांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 
विनम्र अभिवादन
 
 
प्रा. विलास खोले हे एक बहुआयामी, चिंतनशील व्यक्तिमत्त्व होते. सा. ‘विवेक’च्या ‘शिल्पकार चरित्रकोश’ प्रकल्पात सुरुवातीपासून मिळालेल्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे कोशाची नेटकी बांधणी आणि शिस्त आम्हाला टिकवता आली. नऊ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या साहित्यकोशात त्यांनी लिहिलेल्या चरित्रनोंदी या इतर कोशातील चरित्रनोंदी लिहिताना आदर्शवत राहिल्या. नाट्य खंडाचे संपादकपद त्यांनी स्वीकारल्यापासून मागील आठ वर्ष ते या प्रकल्पावर काम करत होते आणि मराठी वाङ्मयातील नाट्यशास्त्राचा इतिहास सांगणारा एक अग्रगण्य असा ‘चरित्रग्रंथ’ त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांची अभ्यासू वृत्ती यामुळे पूर्णत्वास जात आहे. अशा वेळी त्यांचे जाणे ‘विवेक’ परिवारामध्ये आणि तमाम मराठी साहित्याविश्वामध्ये पोकळी निर्माण करणारे आहे. प्रा. खोले यांच्या कार्यास ‘विवेक’
 
 
समूहातर्फे विनम्र अभिवादन!

- महेश पोहनेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिल्पकार चरित्रकोश


-चित्रा नातू-वझे
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.