अभिव्यक्ती की विकृती?

    18-Oct-2022   
Total Views |
 
hinduisum on india
 
 
 
 
काही ठरावीक अविचारसरणीचे लोक मुद्दाम ठरवून हिंदू धर्म, श्रद्धा आणि हिंदू समाज यावर अश्लाघ्य, बेताल बोलतात, खोडसाळखोटे-नाटेही बोलतात. या सगळ्या खोटेपणाला कला वगैरेचा लेप देतात. कोणी आक्षेप घेतलाच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कलेचे आणि कलाकाराचे स्वातंत्र्य आहे असे थातूरमातूर उत्तर दिले जाते. अर्थात हे मुद्दाम केले जाते. कारण, हिंदू समाजाबद्दल त्यांच्या मनात कमालीचा द्वेष आणि अनाकलनीय अज्ञान भरलेले आहे. बरं हे खोटं म्हणावं आणि ते बिचारे खरेच कलात्मक अभिव्यक्ती सादर करतात म्हणावं तर मग त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये केवळ हिंदू देवदेवता, हिंदू धर्मच का असतो? खरे तर हिंदू कुटुंबात जन्मलेली व्यक्ती क्वचितच रामायण-महाभारताबद्दल बोलते, मनू तर सोडूनच द्या. मात्र, तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी पाण्याच्या घोटागणिक रामायण-महाभारतामध्ये कसे वाईट समाजजीवन होते, त्याअनुषंगाने हिंदू समाज किती वाईट आहे सांगत असतात. त्याने काय साध्य होते हे तेच जाणोत.
 
 
 
दुसरीकडे हे लोक रामायण-महाभारत घडलेच नाही असेही सातत्याने रडगाणे गातात. रामायण-महाभारत घडलेच नाही सगळे खोटे आहे, असे म्हणत हेच लोक रावणाची पूजा करण्याचाही पायंडा पाडण्याचा प्रयत्न करतात. इतके सगळे लिहिण्याचे कारण की, छत्रपती संभाजी महाराज नगरातीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या युवक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामध्ये एका सादरीकरणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेेतला आणि ते सादरीकरण बंद पाडले. त्यांच्या कृत्याचे समर्थन असमर्थन राहू दे. आपण घटना पाहू. रंगमंचावर रामायणावर आधारित असलेले हे सादरीकरण सुरू होते. प्रभू श्रीरामचंद्र इथे इंग्रजी बोलतात, इतर पात्रेही विनोदी अंगाने काहीबाही बोलतात आणि माता सीता ‘झाल्या तिन्ही सांजा’ म्हणत लावणीचे कडवे म्हणते. प्रत्येकवेळी या ना त्या मुखवट्याआडून हिंदूंच्याच श्रद्धांचा अपमान का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या विकृत प्रयोगाला बंद पाडले आणि भूमिका साकारणार्‍यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या सगळ्यांचे अभिनंदन. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो आणि या असल्या विचारांच्या लोकांबाबत तर काळ फारच सोकावला आहे.
 
 
 
फारूख अब्दुलाचा न्याय कराच
 
 
 
उत्तर प्रदेश येथील कनौज जिल्ह्यातले मूळ रहिवासी असलेले मनीष कुमार आणि रामसागर रोजीरोटीसाठी काश्मीरमध्ये शोपियां इथे राहत होते. दिवसभर मजदुरी करून रात्री झोपले असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी ‘ग्रेनेड’ हल्ला केला. त्यात या निरपराध व्यक्तिंचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या भ्याडपणाचा संताप दुःखासहतीव्र निषेध. अर्थात त्या दहशतवाद्यांनी नितीमत्ता-संवेदना विकून खाल्लीच आहे. मात्र, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चा अध्यक्ष आणि काश्मीरचा माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला याला काय म्हणावे? इथे मी त्याचा एकेरी उल्लेख करते हा त्याचा निषेध समजावा. काश्मीरमध्ये दहशतवादी निरपराध लोकांची हत्या करत आहेत आणि फारूखचे म्हणणे की जोपर्यंत काश्मीरला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे सगळे बंद होणार नाही. काश्मीर स्वतःच्या बापजाद्यांची बटिक समजणार्‍या फारूखला काश्मीरमधून ‘370 कलम’ हटवले गेले याचा भयंकर राग आहे. ‘370 कलम’ हटवल्यामुळे काश्मीर दहशतवादाचा बागुलबूवा फुटला. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील हे जगाला कळाले. त्यावेळी फारूख म्हणाला, काश्मीरमध्ये पुन्हा ‘370 कलम’ लागू व्हावे यासाठी चीन मदत करू शकतो.
 
 
 
दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काश्मीरला लुटणार्‍या ठेकेदारांपैकी एक फारूक अब्दुल्ला. जम्मूच्या सजवान इथे फारूखचे घर आहे. मात्र, त्यात 25 हजार कोटींचा जमीन घोटाळा फारूखने केला आहे. सगळे कायदे धाब्यावर बसवून त्याने जंगलाच्या जागेत घर बांधले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळ्यातही फारूख अब्दुल्लाचे नाव बदनाम आहे. खरे म्हणजे ‘बीसीसीआय’ने 2002-2011 मध्ये जम्मू-काश्मीर राज्यामध्ये क्रिकेट सुविधा विकासासाठी 112 कोटी रुपये दिले होते. फारूखवर आरोप आहे की त्याने त्यामध्ये 43.69 कोटी रुपयांचा घोटाळा केला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर काश्मीरला बटिक समजणार्‍या फारूख, सय्यद आणि मुफ्ती कुटुंबाचे सत्य देशासमोर आले. त्यामुळे फारूखसह सगळे पिसाळले. नक्षलवाद्यांना समर्थन करणारेही नक्षलीच असतात तसेच दहशतवाद्यांना समर्थन करणारेही दहशतवादीच असतात. विझत्या दिव्याची वात मोठीच असते म्हणा. पण तरीही तमाम भारतवासीयांची इच्छा आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणार्‍या फारूखला कर्माची सजा मिळावी.
9594969638
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.