मैदानाऐवजी स्पेनची तांत्रिक कुस्ती?

    18-Oct-2022   
Total Views |
 
स्पेन
 
 
 
 
जागतिक कुस्ती स्पर्धा म्हटल्या की, त्यात भारताचे खेळाडू निश्चितपणे आपली चमक दाखवतात. कुस्तीसारखा मातीतला खेळ मॅटवर खेळला जाऊ लागला तरी त्यातील भारताचे वर्चस्व आजपर्यंत तसूभरही कमी झालेले नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो वा ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा किंवा ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ असो. प्रत्येक स्पर्धेतभारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतो. मात्र, असे असतानाही भारताच्या खेळाडूंना स्पेनने दिलेल्या वागणुकीमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा विश्वातदेखील संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
स्पेनमधील पोंतेवेद्रा येथे दि. 17 ते 23 ऑक्टोबरदरम्यान अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू तयार होते. त्याचप्रमाणे, भारतीय कुस्ती फेडरेशननेदेखील स्पर्धेचीतयारी पूर्ण केली होती. परंतु, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंना स्पेनच्या दुतावासाकडून व्हिसा दिला गेला नाही. या खेळाडूंच्या स्पेन प्रवासाबद्दल आणि अटींविषयी शंका असल्याचे सांगत दुतावासाच्या अधिकार्‍यांनी व्हिसा नाकारल्याचे म्हटले जात आहे. व्हिसा न मिळाल्याने गेल्या सहा वर्षांत प्रथमच भारतीय कुस्ती खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. 2021 साली ही स्पर्धा सर्बियातील बेलग्रेडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करत एकूण पाच पदके आपल्या नावावर केली होती. दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत भारताचे 45 खेळाडू सहभागी होणार होते. यामध्ये तीस महिला आणि पुरूष कुस्तीपटूंचा समावेश होता. या कुस्तीपटूंमध्ये अंडर 20 कुस्तीत भारताची पहिली वर्ल्ड चॅम्पियन अंतिम पंघल (53 किलो) आणि वर्ल्ड कॅडेट चॅम्पियन सागर जगलान (74 किलो) आणि रीतिका हुडा यांसारखे कुस्तीपटूदेखील सहभागी झाले होते.
 
 
 
भारतीय कुस्ती फेडरेशनचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले की, दि. 4 ऑक्टोबरला सर्व खेळाडूंचे शेंगेन व्हिसासाठी अर्ज जमा करण्यात आले होते. त्यानुसार सर्वांचे फ्लाईट तिकीटदेखील बुक करण्यात आले होते. परंतु, खेळाडू स्पेनसाठी रवाना होण्यापूर्वीच स्पेन दुतावासाकडून अर्ज रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, व्हिसा रद्द करण्यामागील कारणदेखील आश्चर्यचकित करणारे आहे. हे सर्व खेळाडू स्पर्धा होत असलेल्या पोंतेवेद्रामध्ये जास्त दिवस राहू शकतात. त्यामुळे हा व्हिसा रद्द करण्यात आला. तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांचा व्हिसा प्रीमियम लाऊंज सर्व्हिसेसनुसार काढण्याचे स्पेन दुतावासाकडून सांगण्यात आले. परंतु, असे केल्याने खर्च आणखी वाढला असता. यानंतर तोमर यांनी आक्रमक पवित्रा घेत यापुढे कधीही भारतीय संघ स्पेनमध्ये पाठवणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’कडेही ‘स्पॅनिश रेसलिंग फेडरेशन’ला यापुढे कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देऊ नये, अशी विनंतीही करणार असल्याचे तोमर यांनी सांगितले. व्हिसा रद्द झाल्याने भारताची मानहानी झाली असून या प्रकरणी ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’कडे अधिकृत तक्रारदेखील करण्यात येणार आहे.
 
 
 
मुळात, स्पेन दुतावासाला भारतीय संघाने प्रीमियम लाऊंज सर्व्हिसेस अंतर्गत व्हिसासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. परंतु, भारतीय संघाने असे का करावे असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. मुळात भारतीय संघाने याआधीही शेंगेन व्हिसाने प्रवास केला आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघाने स्पेन दुतावास सांगेल तसे का करावे? भारतीय खेळाडू जास्त दिवस थांबू शकतात असा विचार करून व्हिसा नाकारणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल. स्पेनच्या या अडेलतट्टूपणामुळे भारताचे 45 पैकी केवळ नऊ खेळाडू स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पोहोचू शकले आहेत. त्यांच्यासोबत ना प्रशिक्षक आहे ना कोणते अधिकारी-कर्मचारी. भारतीय खेळाडूंशी स्पेनच्या या वर्तनावर भारताने आक्रमक भूमिका घेतली हेदेखील बरे झाले. भारतीय खेळाडू जास्त दिवस स्पेनमध्ये थांबण्याची शक्यता असल्याचे कारण भले स्पेन दुतावासाने दिले असले तरी ते हास्यास्पद आहे. भारतीय खेळाडू तिथे का आणि कशासाठी थांबतील? भारतीय खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान मैदानापेक्षा आडमार्गाने संपविण्याचे हे षड्यंत्र तर नाही ना अशी शंका घ्यायलादेखील वाव आहे. त्यामुळे भारताच्या या अपमानावर भारताने कठोर पावले उचलून स्पेनला नव्या भारताची ताकद दाखवून देणेच हितावह ठरेल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.