रिलायन्स आणि नोकिया करार: जगातील सर्वात मोठे ५ जी जाळे उभारणार

    17-Oct-2022
Total Views |
reliance 
 
मुंबई : रिलायन्स आणि नोकिया या दोन कंपन्या ५ जी नेटवर्कसाठी करारबद्ध झाल्या आहेत. जगातील सर्वात मोठे ५ जी नेटवर्कचे जाळे उभारण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या असल्याचे या दोन्ही कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. रिलायन्सच्या ५ जी नेटवर्कला लागणारी सर्व यंत्रणा पुरवण्याची जबाबदारी नोकिया कंपनीकडे असणार आहे. लवकरच देशात ५ जी नेटवर्कचा विस्तार होण्यास सुरूवात होईल. १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात ५ जी नेटवर्कचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यापूर्वी झालेल्या ५ जीच्या लिलावात देशातील दूरसंचार क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या असणाऱ्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्यांनी बाजी मारली होती.
 
 
रिलायन्स आणि नोकिया करारात, नोकिया या ५ जी नेटवर्कसाठी लागणारी उपग्रह संवेदन प्रणाली, त्यांचे बेस स्टेशन्स, जास्त क्षमतेच्या ५ जी अँटेना रेडिओ लहरी उपकरणे या सर्वांचा पुरवठा रिलायन्सला करेल. रिलायन्स जिओच्या योजनेनुसार सध्याच्या सुरु असलेल्या ४ जी नेटवर्कमध्येच त्यांना नवीन येणारी ५ जी नेटवर्क प्रणाली अंतर्भूत करायची आहे. ज्यातून त्यांना अत्यंत वेगवान, अखंड सेवा पुरवणे शक्य होत राहील अशी त्यांची योजना आहे. या भागीदारीतून त्यांना जगातील सर्वात मोठे ५ जी नेटवर्क जाळे उभारायचे आहे.
 
 
या कराराबाबत प्रतिक्रिया देताना रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी लवकरच हा करार खूप फलदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. "जिओ आपल्या ग्राहकांना अत्यंत वेगवान, अखंड आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास बांधील आहे आणि रिलायन्स आणि नोकिया असा हा करार भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही ५ जी सेवा पुरवण्यासाठी सक्षम राहील याची मला खात्री आहे" असे आपल्या प्रतिक्रियेत आकाश अंबानी यांनी म्हटले आहे.