धर्मवीर आनंद दिघेंच्या स्वप्नांसाठी...

    17-Oct-2022   
Total Views |
 
मंगेश वाळंज
 
 
 
 
धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचार कार्याची प्रेरणा घेऊन मंगेश वाळंज विविध सामाजिक परिघात कार्य करत आहेत. 18 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या विचार कार्याचा इथे घेतलेला आढावा.
 
 
परिसाच्या संपर्कात आल्यावर सोनेच होणार. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत राहणार्‍या सहकार्‍यांचे झाले. सामाजिक न्याय निवाड्यात कर्तव्य कठोर असलेले साहेब मुलांच्या शिक्षणासाठी किती हळवे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्नरत होते हे पाहून त्यांच्या सभोवतालच्या एका कार्यकर्त्याने आयुष्यात सामाजिक कार्य करण्याचा वसा उचलला. तेे कार्यकर्ता होते मंगेश गजानन वाळंज. ठाण्याच्या सिग्नल शाळेवर बरेच वर्षे कार्याध्यक्ष असलेले, महाड तालुका सामाजिक संस्थेचे सल्लागार असलेले,पूर्वीच्या शिवसेनेच्या ठाणे शहर रोजगार सेनेचे ते पदाधिकारी होते. तसेच ते ठाणे शहर केबल सेनेचे अध्यक्षही होते. आजही त्यांचा स्वामी समर्थ केबल व्यवसाय आहे, बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ते कार्यरत आहेत. या दोन व्यवसायाव्यतिरिक्त काही काळातच ते सौंदर्यप्रसाधन व्यवसायात प्रवेश करणार आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस सौदर्य प्रसाधनाच्या वस्तूंचा वापर करतो. पण यात बहुतेकवेळा रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. अवास्तव रासायनिक घटकांच्या वापरांपासून काही अंशी का होईना समाजाची सुटका करावी म्हणून ‘एक्यम’ नावाची निसर्गावर आधारितसौंदर्य प्रसाधनाची निर्मिती करण्याचा व्यवसाय ते सुरू करत आहेत.
 
 
 
महाड तालुका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तर ठाणे शहरात स्थायिक झालेल्या मूळच्या महाडच्या नागरिकांना मदत करताना मंगेश जराही मागे पुढे पाहत नाहीत. आपल्या तालुक्याच्या लोकांना ठाणे शहरात आल्यावर कोणतीही उणीव भासू नये याची काळजी मंगेश घेतात. अर्थात संघटनेचे नाव जरी महाड तालुक्याशी संबंधित असले तरी मंगेश यांच्याकडे येणारी कोणतीही गरजू व्यक्ती कधी विन्मुख परत गेली नाही. ठाणे शहरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याशी मंगेश यांचा सलोख्याचा संबंध आहे. तरीही महाड तालुक्याशी मंगेश यांचे ऋणानुबंध जुळलेले. कारण तेे मुळचे महाड तालुक्याचे. त्यांचे वडील गजानन आणि आई शारदा अत्यंत कष्टकरी दाम्पत्य. कितीही हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी कष्टाची आणि सत्याची साथ सोडायची नाही असे दोघांचे मत. निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाडच्या आठवणी मंगेश यांच्या मनावर बालपणी कोरल्या गेल्या. पुढे कामधंद्यासाठी वाळंज कुटुंब मुंबईत आले. नवीन शहर नवीन जगणे. मंगेश शाळेत जाऊ लागले. ते अभ्यासात हुशार होते. दहावीनंतर नोकरी लागावी म्हणून त्यांनी ‘मोटर मॅकनिक’ची पदविका पूर्ण केली. त्यानंतर दोन-तीन कंपनीमध्ये ‘अ‍ॅप्रेंटिसशीप’ही केली. तो काळ मुंबई आणि ठाणे या शहरांचा स्थित्यंतराचा काळ होता. मंगेश यांनी चांगली नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच ठाणे येथे ते आले.
 
 
त्यावेळी ठाणे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा दबदबा होता. ते गरजूंना मदत करतात, मार्ग दाखवतातअसे मंगेश ऐकून होते. मंगेश धर्मवीर आनंद दिघेंना भेटायला गेले. त्यावेळी ठाणे शहरात केबलचा व्यवसाय सांभाळण्यासाठी कुणी तरी हवे होते. मंगेश यांनी धर्मवीरांना याबाबत विचारणा केली. धर्मवीर दिघेंनी मंगेश यांच्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास मंगेश यांनी सार्थ केला. त्यावेळी केबलचा व्यवसाय म्हणजे हमखास संघर्ष आलाच. पण धर्मवीर दिघेंच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने मंगेश यांनी ठाणे केबल संदर्भातल्या सगळ्या समस्या मार्गी लावल्या. त्यावेळी कामानिमित्त त्यांचा संपर्क सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यायचा. एकनाथ शिंदेसुद्धा अनेक कामांमध्ये सल्ला, सूचना आणि सहकार्य करायचे.
 
 
 
असो धर्मवीर आनंद दिघे लोकांशी कसे वागतात, त्यांचे विचार काय आहेत हे मंगेश यांनी जवळून अनुभवले. धर्मवीर येणार्‍या पालकांना सांगायचे, “मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या शिक्षणासाठी काही लागले, तर बिलकूल काळजी करू नका.” मुलांना शिक्षणात मदत केली, प्रोत्साहन दिले म्हणून पालक मुलांना घेऊन साहेबांकडे यायचे. मुलांना शिस्त असायला हवी याकडे त्यांचे लक्ष असायचे. साहेब पालकांना सांगायचे, “मुलांच्या केशभुषा शाळेच्या कपड्यांकडे लक्ष द्या. कोणत्याही अंगाने मुलांना कुणीही बेशिस्त समजायला नको.” धर्मवीर आंनद दिघेंचे ऐकून पालकही मग मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे. केबल व्यवसायाकडे लक्ष देतानाच मग मंगेश यांचे मन आपसूकच सामाजिक कार्याकडे वळले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा दीपस्तंभ मंगेश यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक बनला.
 
 
 
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारखा गॉडफादर पाठीशी आहे याची जाणीव त्यांना नेहमीच यश मिळवून देई. धर्मवीरांच्या मृत्यू पश्चातही त्यांनी दिलेली विचारप्रेरणा हीच मंगेश यांच्या आयुष्याची अंतप्रेरणा झाली. त्यामुळेच आयुष्यात अनेक प्रश्न उद्भवले किंवा अनेक समस्या उभ्या राहिल्या तरी मंगेश कधीच डगमगले नाहीत. कोरोना काळात सगळे जग हादरले मात्र त्यावेळीही मंगेश पायाला भिंगरी लाऊन तळागाळात वस्त्यांमध्ये फिरत होते. लोकांना वैद्यकीय मदत पुरवीत होते. लोकांचे कामधाम बंद होते अशा काळात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सातत्याने कार्य करत होते. आपल्याला कोरोना होईल वगैरे ही भीती त्यांच्या मनाला शिवली नाही. कारण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार की, आपल्या माणसाच्या भल्यासाठी कधीही मागे हटायचे नाही. जीव गेला तरीही. यापुढेही समाजासाठी सर्वतोपरी कार्य करायचे आहे, असे मंगेश म्हणतात. अर्थात धर्मवीर आनंद दिघे यांचा परिसस्पर्श झाल्याने यापुढील काळातही मंगेश अनेक क्षेत्रात कार्यरत राहतील आणि स्वतःसोबतच समाजाचा महाराष्ट्राचा उत्कर्ष करतील यात शंका नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.