भारतीय संरक्षण उत्पादनाची क्षमता जगासमोर येणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : गुजरातमधील गांधीनगरमध्ये १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या 'डिफेन्स एक्स्पो – २०२२' मध्ये भारतीय संरक्षण आणि उत्पादन क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडल्या जाणार आहेत. आत्मनिर्भर भारतचे लक्ष्य साध्य करण्यासाठी यंदाच्या एक्स्पोची मुख्य थीम ‘पाथ टू प्राईड’ अशी ठेवण्यात आली आहे. यावेळी प्रथमच केवळ भारतीय कंपन्यांसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १ हजाराहून जास्त भारतीय प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
देशाच्या संरक्षण मंत्रालयातर्फे संरक्षण दर दोन वर्षांनी डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येते. यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय संरक्षण उत्पादक सहभागी होत असतात. मात्र, यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेक इन इंडिया – मेक फॉर द वर्ल्ड’ या विचाराने केवळ भारतीय कंपन्यांसाठी हे प्रदर्शन असणार आहे. यामध्ये भारतीय कंपन्या, मूळ उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या भारतीय उपकंपन्या(ओइएम) , भारतात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे विभाग, भारतीय कंपन्यांसह संयुक्त उपक्रम असलेले प्रदर्शक हे यामध्ये सहभागी होणार आहेत.
यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट म्हणजे सात नव्या संरक्षण कंपन्यांचा सहभाग. केंद्र सरकारने भारतात असलेल्या जुन्या आयुध निर्माण कारखान्यांचे एकिकरण करून सात नव्या संरक्षण कंपन्याची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय गतवर्षी घेतला होता. या कंपन्यांची वर्षपूर्ती झाली असून त्या यंदा प्रथमच प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, संरक्षण तज्ज्ञ यांच्यात वैचारिक आदान-प्रदानही या प्रदर्शनात होणार आहे.
'डिआरडीओ'द्वारे ४०० संरक्षण प्रणालींचे प्रदर्शन
संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थाच 'डिआरडीओ'तर्फे थ्रीडी म्हणजे 'डिआरडीओ, डिझाइन्ड अँड डेव्हलप्ड' या थीमअंतर्गत ४०० स्वदेशी संरक्षण प्रणाली जगासमोर मांडल्या जाणार आहेत. त्यामध्ये लढाऊ आणि पाळत ठेवणारी विमाने, तेजसल एलसीए मार्क२, ड्रोन, तोफा, अत्याधुनिक दारुगोळा, नौदलासाठी विकसित प्रणाली, चिलखती वाहने, क्षेपणास्त्रे (क्रूझ, एमबीआरएल, एएएम, एटीजीएम, एमआरएसएएम), ब्राह्मोस, व्हर्च्युअल रिएलिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली, वैभव – अँटी टँक पॉइंट अटॅक म्युनिशन, विशाल – अँटी टँक बार माइन, प्रचंड – अँटी टँक यांचा समावेश आहे.
भारत – आफ्रिका संरक्षण संवादाचे दुसरे पर्व
प्रदर्शनामध्येच भारत – आफ्रिकादरम्याच्या संरक्षण संवादाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५३ आफ्रिकी देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे भारत – आफ्रिका संरक्षण संवादामध्ये आफ्रिकी देशांना भारताचा संरक्षण उत्पादन भागिदार म्हणून विचार करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे ४० देशांचा सहभाग असलेली स्वतंत्र हिंदी महासागर क्षेत्र परिषददेखील (आयओआर प्लस) या प्रदर्शनादरम्यान होणार आहे.