स्वातंत्र्यापुढे दुबईची संपत्ती फिकी

    15-Oct-2022   
Total Views |
जैनब
 
जैनब जवादली
 
ती मुलींचा सांभाळ करू शकत नाही. मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलू शकत नाही. तसेच, ती जिथे राहते त्या परिसरात तिची लहान मुलगी सारखी आजारी पडते. त्यामुळे मुलींचा ताबा तिच्या वडिलांकडे द्यावा, असे त्या मुलींच्या वडिलांचे म्हणणे. यावर त्या मुलींच्या आईचे म्हणणे की, ”मी मुलींच्या शिक्षणाचा खर्च करू शकते. पण, या हॉटेलमधून मुलींनी बाहेर पाऊल टाकताच त्यांना पकडले जाईल आणि बेकायदेशीररित्या माझ्यापासून दूर करून त्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्या पित्याकडे राहण्यास मजबूर केले जाईल. इतकेच काय? मुलींचे वडील सत्ता संपत्तीचा उपयोग करत दररोज नवनवीन पोलीस गुन्हे माझ्यावर दाखल करत आहेत.” तर या घटनेतील आईने संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली आहे की, मुलींना आणि तिला संरक्षण द्यावे, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्या या हॉटेलमध्ये कैदेतच आहेत. आता ही आई कोण आहे, तर ती आहे दुबईचे राजे आणि संयुक्त अमिरातीचे पंतप्रधान शेख़ मोहम्मद बिन राशिद अल मकदूम यांचा भाचा शेख़ सईद याची पत्नी जैनब जवादली.
 
 
 
जैनब आंतरराष्ट्रीय जिमनॅस्ट असून त्यांचा मूळ देश अझरबैजान. २०१५ साली जैनब यांचा विवाह शेख सईद यांच्याशी झाला. दोघांना तीन मुली झाल्या आणि २०१९ साली या दोघांचा घटस्फोटही झाला. मात्र, घटस्फोट घेतल्यानंतर आता शेख सईद जैनबकडे मुलींचा ताबा मागत आहे. जैनब शेख सईद यांच्याकडे मुलींचा ताबा देऊ इच्छित नाहीत. शेख सईदकडे पाण्यासारखा पैसा आहे, संपत्ती आहे तरीही तिला मुलींचा ताबा त्याच्याकडे द्यायचा नाही. का? तर मुलींना बंदिस्त आयुष्य जगावे लागेल, त्यांच्या मनाप्रमाणे त्या आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही असे तर जैनब यांना वाटत नसेल? असेलही.
 
 
 
कारण, दुबईचे राजे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल यांच्या दोन मुली लतिफा आणि शम्सा आज काय करतात? या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे जैनब यांच्या काळजीचे कारण असू शकते. दुबईच्या राजाच्या शेख मोहम्मद बिन राशिद अल यांना सहा पत्नी आणि अठरा मूलं. असो. तर त्यापैकीच लतिफा आणि शम्स. लतिफाने अनेकदा दुबईहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारण, तिचे म्हणणे की, ”तिचे जगणे पारतंत्र्यात आहे. अत्यंत बंदिस्त कैद्यासारखे जीवन आहे.”
 
 
 
या सगळ्याला कंटाळून एकदा ती दुबईतून पळून गेली. आठ दिवस ती सागरी प्रवास करत होती. मात्र, भारताच्या खाडी भागापर्यंत आली आणि तिला संयुक्त अमिरातीच्या कमांडोने पकडले. त्यानंतर ती खूप वर्षे कुठेही दिसली नाही. संयुक्त राष्ट्राने लतिफा कुठे आहे, असा सवाल विचारल्यानंतर राजदरबारातून उत्तर आले की, “राजकुमारी लतिफा सुरक्षित असून ती एका महालात आहे.” मात्र, काही वर्षांनी लतिफाच्या मैत्रिणीने एक व्हिडिओ जगासमोर आणला.
 
 
 
त्यात लतिफा भेदरलेली होती आणि सांगत होती की, ती कुठच्यातरी अज्ञात स्थळी असून ती नजरकैदेत आहे. राहत्या जागेतून ती उंबरठ्याबाहेर येऊ शकत नाही, तर लतिफाची छोटी बहीण शम्सा ही विदेशात उच्चशिक्षण घेत होती. मात्र, तिचेही तिथून अपहरण करण्यात आले आणि तीसुद्धा आता दुबईत असून नजरकैदेत आहे. पिता दुबईचा राजा असताना आणि सगळी सुखे हात जोडून असताना सत्तेचा संपत्तीचा महल या दोघी बहिणी का सोडू इच्छित होत्या. याचे जे उत्तर आहे तेच कारण कदाचित जैनब हिचेही असेल.
 
 
 
दुसरीकडे शेख परिवाराच्या सुनांनी घटस्फोेट घेतल्याच्या घटनाही तितक्याच विचार करायला लावणार्यां. ७४ वर्षांचा दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल आणि त्यांची सहावी पत्नी ४७ वर्षांची प्रिंसेस यांचा घटस्फोट जगासाठी अतिशय धक्कादायक होता. तिला राजाने घटस्फोट दिला आणि तिच्याकडून मुलींचा ताबाही मागितला. मात्र, याने मुलींचा ताबा द्यायला नकार दिला व तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने न्यायालयात सिद्ध केले याच्या घराशेजारीच दुबईच्या राजाच्या माणसांनी अतिशय महागडे घर घेण्याचाही प्रयत्न केला होता. कारण, एकच यावर नजर ठेवण्यासाठी. मात्र, न्यायालयाने घटस्फोटानंतरची तरतूद तसेच याच्या संरक्षणाचा पूर्ण खर्च तिच्या पतीने द्यायचा असा निर्णय दिला. तसेच, मुलींचा ताबाही २०२२ साली याकडे दिला. दुबईच्या धनसंपत्तीने संपन्न असलेल्या राजघराण्याची ही कौटुंबिक स्थिती विचार करायला लावणारीआहे नक्की. शेवटी काय, स्वातंत्र्यापुढे सारे फिक्के...
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.