मराठी भाषा विभागात सर ज. जी. उपयोजित कला विद्यार्थ्यांचा रंगमेळा

    15-Oct-2022
Total Views |


Kala Vidyarthyancha Rangmela - Eknath Shinde
 
 
वाचन संस्काराचं महत्त्व समाजाला कळायला हवं, अभ्यासू-जिज्ञासू आणि महत्त्वाकांक्षी यांच्यासह इतर अनेक सजग-जाणकार देशाच्या समस्त-सन्माननीय नागरिकांना पटावं, यासाठी आपल्या राज्य सरकारच्या दक्ष अशा संवेदनाक्षम विभागाने मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासकीय भवन ८वा मजला, मुंबई येथे ‘वाचन प्रेरणा दिना’चं औचित्य आणि मुहूर्त साधून एका प्रेरणादायी उपक्रमाचं स्तुत्य आयोजन केलं आहे. त्याविषयी सविस्तर....
 
व्यक्तीचा विकास हा तिच्या अभ्यास करण्याच्या पद्धती, मनन, चिंतन आणि अध्यायन या चतुःसूत्रांवर अवलंबून आहे. या सूत्रांना एका सुतात ओवण्याचे कार्य केवळ आणि केवळ वाचनाने-वाचन करण्यामुळे होते. वाचन व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनवतं. वाचनाने व्यक्तिमत्त्व साकारतं. वाचन हे स्वप्न शिखरांना प्रत्यक्षात उतरवतं. वाचनाने आदर्श विद्यार्थीपण जपलं जातं, ज्यातून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम घडतात, ज्यातून डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, पायलट, शास्त्रज्ञ, विषारद, दृक्श्राव्य कलाकार, साहित्यिक, व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वे आकार घेतात. अशा या वाचन संस्काराचं महत्त्व समाजाला कळायला हवं, अभ्यासू-जिज्ञासू आणि महत्त्वाकांक्षी यांच्यासह इतर अनेक सजग-जाणकार देशाच्या समस्त-सन्माननीय नागरिकांना पटावं, यासाठी आपल्या राज्य सरकारच्या दक्ष अशा संवेदनाक्षम विभागाने मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासकीय भवन ८वा मजला, मुंबई येथे ‘वाचन प्रेरणा दिना’चं औचित्य आणि मुहूर्त साधून एका प्रेरणादायी उपक्रमाचं स्तुत्य आयोजन केलं आहे.
 
 
वाचनाचं महत्त्व सांगण्यासाठी या विभागाने रंग, आकार, विलास आणि बोधवाक्य या चार घटकांची मदत घेतली. या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त सरकारने शासन निर्णय पारित केला. ‘सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालया’च्या कला विद्यार्थ्यांकडून ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त खास ‘पोस्टर्स’ अर्थात भित्तिचित्र आणि बोधवाक्य बनवून घेण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले. संबंधित विभागाला कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातील कला महाविद्यालयातील कला विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन करायचे असावे. परंतु, अत्यल्प वेळ आणि जवळच असलेले ’सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय’ यामुळे शासन निर्णयात याच महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षे उपयोजित कला वर्गाच्या सुमारे ८१ दृश्यकला विद्यार्थ्यांनी १०० भित्तिचित्रं अर्थात ‘पोस्टर्स’ चितारली. अक्षरश: अत्यल्प वेळ असूनसुद्धा या वर्गाचे प्रमुख प्रा. डॉ. शेपाळ यांच्यावर याच शासकीय कलाचे प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर यांनी जबाबदारी सोपविली. इतक्या कमी वेळेत ही तब्बल १०० ‘पोस्टर्स’ या वर्गाने साकारली. त्यांच्या सहाध्यायी दृश्यकला अध्यापकांच्या सक्रिय सहभागाने हे प्रदर्शन दि. १४ ऑक्टोबरला मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित केले जात आहे. कलाध्यापक राहुल मेश्राम, राधिका वाघ- कुसूरकर आणि प्रगती पाटील या सहकारी कलाध्यापकांच्या अथक श्रमाच्या मूर्त स्वरुपात १०० पोस्टर्स मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शित होत आहेत. लौकिक अर्थाने या वर्गात शिकत असलेल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला असल्याने ‘वाचन प्रेरणा दिना’चा संदेशच जणू देशातील सजग दृश्यकला उपासक छात्रांनी देशाला, ‘पोस्टर्स’द्वारे दिला आहे.
 
 
या ‘पोस्टर्स’साठी मंत्रालयाच्या संबंधित विभागाचे सहसचिव मिलिंद गावडे यांच्या दालनात एक बैठक झाली होती. त्या बैठकीला प्रभारी अधिष्ठातांनी वर्गप्रमुख म्हणून मला उपस्थित राहण्यास सांगितले होते. एखादा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यापेक्षा, ‘सेलिब्रेट’ म्हणजे साजरा करण्यासाठी, जर प्रमुख अधिकारी यांची सकारात्मकता आणि इच्छाशक्ती ही गतिमान असेल, तर आवश्यक निर्णय हे त्वरित घेतले जातात. याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. ‘पोस्टर्स’ आणि घोषवाक्यांना भरीव रकमांची पारितोषिके मंजूरही झाली. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनात्मक रक्कम आणि कलाशिक्षणविषयक साहित्य प्रदान करण्यासाठीचा निर्णयही झाला. बापरे! मी अवाक् झालो. मिलिंद गावडे यांनी निर्णय घेऊन उपस्थित अधिकार्‍यांची मंजुरी घेतली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे २५ हजार, २१ हजार आणि १५ हजार आणि बोधवाक्यांसाठी दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये निश्चित झाले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्रासह कलाशिक्षणविषयक शैक्षणिक साहित्य प्रदान करण्याचा याच बैठकीत निर्णय झाला.

Books 1 
शासकीय उपक्रमांना त्वरित सकारात्मक निर्णय घेणार्‍या संवेदनशील अधिकार्‍यांच्या समर्थ मार्गदर्शनासाठी प्रोत्साहन लाभले, तर अत्यल्प वेळ असला, तरीही रंगाकारांच्या आणि बोधवाक्यांच्या मदतीने प्रभावी तसेच रंगिला संदेश देणारे ’वाचन प्रेरणा दिना’निमित्ताने दृश्यकला प्रदर्शनासारखे उपक्रम साजरे होऊ शकतात, हा जणू अनुकरणशील आदर्शच मराठी भाषा विभागाने घालून दिला आहे. या विभागाच्या ऊर्मिला धादवड अवर सचिव अजय भोसले, अवर सचिव नितीन डंगारे, अवर सचिव राजश्री बापट कक्ष अधिकारी आणि ऐश्वर्या गोवेकर कक्ष अधिकारी या अधिकारी वर्गाने प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी अगोदर काय घडले किंवा अशा स्तुत्य उपक्रमांच्या आयोजनापूर्वी किती बाबींमधून जावे लागते, हे ऐकणे-वाचणे हेदेखील उत्सुकतावर्धक असते. आता या प्रदर्शनातील कलाकृतींविषयी वाचायला-ऐकायला हवेच.
 
 
सृष्टी चिद्रवार या विद्यार्थिनीने फार समर्पक चित्रसंकल्पन करीत ‘पोस्टर’ चितारले आहे. महाराष्ट्रीयन हिरवी साडी नेसलेली, डोक्याहून पदर घेतलेली आणिा कपाळावर ठसठशीत सौभाग्य सिंदूर लावलेली, जणू आदर्श रूढी-परंपरांना श्रद्धेने जपणारी स्त्री, तिच्या हातात पाटी आणि पुस्तके आहेत. यथायोग्य शृंगारांनी सजलेली ही स्त्री, शिक्षणाकडेही एक ‘शृंगार’ म्हणूनच पाहतेय. सृष्टीने या पोस्टरद्वारे, ‘शिक्षण एक शृंगार’ हा संदेश देऊन मोठा प्रगल्भ विचार मांडलेला आहे. या पोस्टरला रु. २५ हजारांचे रोख पारितोषिक मिळालेले आहे. रोहित कोकरे या विद्यार्थ्याने ‘शिक्षणाने जीवन समृद्धी होईल आयुष्याची वृद्धी’ या संदेशातून संकल्पन साकारले आहे. एक ओंजळीत पुस्तके असून खाली एका प्रतीकात्मक चेहर्‍याच्या मेंदूच्या जागी, अंकुरणार्‍या वनस्पतीला दाखवले आहे. ‘ज्ञानजला’चे थेंब त्या वनस्पतीला अंकुरण्यास उपयोगी पडताहेत. ‘सृजन’ म्हणजे नवनिर्मिती, जी मेंदूतून विकास पावणार्‍या विचारांद्वारे-कल्पनांद्वारे होते. यासाठी बीज अंकुरण्याचा प्रतीकात्मक उपयोग त्याने केला आहे. या पोस्टरला २० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 
 
Books 2
 
गाभा सोनावणे हिला १५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तिने ‘अज्ञानात आपली अधोगती, वाचनातच आहे खरी प्रगती’ हा सूचक संदेश आणि संकल्पनाद्वारे दिला आहे. जे अज्ञानात वावरतात, त्यांचे हावभाव आणि उघडलेल्या पुस्तकाच्या वरच्या बाजूला वाचनाने स्वावलंबी झालेल्यांचे चेहरे, जे आनंदी भाव असलेले दिसतात. अशा प्रकारचे संकल्पन, यथायोग्य रेखांकन साकारले आहे. घोषवाक्य अथवा बोधवाक्य यातूनही तीन पुरस्कार देण्यात आले आहेत. चेतना पेरवी हिला दहा हजार रोख रकमेचा पुरस्कार मिळाला आहे. ‘इवलेसे रोप वाचनाचे, उमलते फूल संस्कारांचे’ असा संदेश तिने दिला आहे. वैष्णवी राणे हिने ‘घेता हाती माळ पुस्तकांची, तेवत ठेवा ज्योत ज्ञानाची’ असा संदेश दिला आहे. अपेक्षा सोनावणे हिने, ‘वाचन हाच यशाचा महामार्ग आहे,’ हे सांगून स्मृतिप्रवण संदेश दिला आहे. व्यस्त नियोजनातही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. खासगी वाहिन्यांचं जाळं, सोशल मीडियाचा कहर आणि एकूणच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये, वाचनसंस्कृती नामशेष होऊ पाहते का, या भीतीविरोधात या प्रदर्शनाने फार समर्पक उदाहरण दिलेले आहे.
 
 
कलाविद्यार्थी विनोद बंजारा, शुभश्री भिलारे, गौरी जंगम, श्रावणी चव्हाटे, आर्या देशमुख, मोसमी देशमुख, ओम काळे अशा काही कलाविद्यार्थ्यांनीही कौतुकास्पद काम केले आहे. या सार्‍यांचे कौतुक तर आहेच. परंतु, भाषा विभागाकडून या ’पोस्टर’ स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले, ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. इतर विभागांकडूनही समस्त कलाविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, ही अपेक्षा.
 
-  प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.