मुंबई : माओवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी तसेच माओवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या प्राध्यापक जी एन साईबाबा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला आहे. साईबाबाला गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर साईबाबा आणि इतर आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जी एन साईबाबाच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज (शनिवारी) न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या विशेष खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.
पोलिसांसाठी हा निकाल धक्कादायक - फडणवीस
नक्षलवादाच्या विरोधात लढणाऱ्या आणि लढताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांसाठी हा निकाल धक्कादायक आहे. नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. केवळ काही तांत्रिक मुद्दे पुढे करत आवश्यक ते पुरावे असलेल्या आरोपीला निर्दोष मुक्त करणे हा त्या शहिदांचा अन्याय आहे. या विषयी आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडणार असून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.'
- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र