उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' सोडून बाहेर जग कसं दिसतं हेही पहावं : नारायण राणे
मविआचे शक्तिप्रदर्शन म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या - राणेंचा जोरदार प्रहार
14-Oct-2022
Total Views |
मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी आपली भाषा सुधारणे गरजेचे आहे. ते आधी सरकार पाडा म्हणायचे, नंतर मैदानात या म्हणायचे, त्याला भाजपचे राज्यात सत्तांतर करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप मैदानात उतरला असून आता त्यांनीच मातोश्री सोडून त्यांनी बाहेर पडून दाखवावे. उद्धव यांनी जग कसे असते पाहावे, विनाकारण बडबड करू नये,' असा इशारा देत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी दक्षिण मुंबई लोकसभेचा दौरा केला. या दौऱ्यात काळाचौकी येथे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केले. तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने आपल्या खांद्यांवर टाकली असून या जागेवर भाजपचा खासदार निवडून आणणे हे माझे कर्तव्य असून ते मी पार पडणार आणि इथे भाजपचा झेंडा रोवणारच,' असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज भरला असून त्यात आम्ही विजयी होणार हे निश्चित आहे. भाजपाची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे, त्यामुळे अंधेरी पूर्वेची पोटनिवडणूक भाजपासाठी अवघड नाही हे स्पष्ट आहे. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, हे या निवडणुकीतून पुन्हा दिसून येणार असून ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची नांदी ठरणार आहे. भाजप मुंबई महापालिकेवर आपला झेंडा रोवणार हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून सिद्ध होणार असून याचा प्रत्यय काही दिवसांमध्ये येणार आहे. आवश्यकता भासली तर आपणही अंधेरी पोटनिवडणुकीत प्रचाराला जाणार असून ही पोटनिवडणूक भाजपच जिंकणार यात तिळमात्र शंका नाही,' अशी घोषणा केंद्रीय केंद्रीय लघु, सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
काळाचौकी येथे आयोजित पत्रकार परिषदेस मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. ऍड. आशिष शेलार, भाजपचे मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, दक्षिण मुंबई भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक सावंत, मुंबई भाजपचे पदाधिकारी निरंजन शेट्टी यांच्यासह महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्तिप्रदर्शन म्हणजे कमजोरांची टोळी
महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनावर राणे म्हणाले की, 'अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कमजोर लोक एकत्र आले म्हणजे शक्तिप्रदर्शन होत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वादविवाद असून मतभिन्नता आहे. त्यामुळे मविआ नेत्यांनी केलेले प्रदर्शन म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून कमजोरांची टोळी आहे,' असा प्रहार राणेंनी महाविकास आघाडीवर केला आहे.
उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा
'उद्धव ठाकरेंनी आपली भाषा सुधारणे गरजेचे आहे. ते आधी सरकार पाडा म्हणायचे, नंतर मैदानात या म्हणायचे, त्याला भाजपचे राज्यात सत्तांतर करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप मैदानात उतरला असून आता त्यांनीच मातोश्री सोडून त्यांनी बाहेर पडून दाखवावे. उद्धव यांनी जग कसे असते पाहावे, विनाकारण बडबड करू नये,' असा इशारा देत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच, आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर आपण बोलणार नसून शेम्बड्या पोरांच्या प्रश्नांवर टिप्पणी करण्यात आपल्याला स्वारस्य नाही,' असे म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंना अनुल्लेखाने मारले आहे.
दक्षिण मुंबईचा खासदार भाजपचाच
'भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र आणि मुंबईत लोकसभा प्रवास दौरा सुरु असून त्यासाठी मी दक्षिण मुंबईचे दायित्व स्वीकारले आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबई भाजपने सातत्याने आपली ताकद वाढवली असून त्याचा प्रत्यय वारंवार आलेला आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण गोवा या दोन मतदारसंघाची धुरा माझ्याकडे असून तिथे भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच मुंबईत सेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. त्यामुळे सेनेचा एकही खासदार मुंबईत येणार नाही हे निश्चित आहे,' अशी गर्जना राणेंनी या पत्रकार परिषदेत केली आहे.
वरळी कुणाच्या मालकीची नाही
मुंबई भाजपच्या दीपोत्सवावर बोलताना राणे म्हणाले की, 'मुंबई भाजपचा एका स्तुत्य उपक्रम म्हणून वरळीत 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. वरळी मुंबईत येते आणि मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना भाजपचे आहेत. ठाकरेंच्या हातून आधी राज्य गेले, मग मुंबई गेली त्यामुळे कदाचित त्यांचा आता वरळीवर डोळा आहे. पण आता त्यांचे काहीही राहिले नसून वरळी कुणाच्या मालकीची नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे,' असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.
तर आज रमेश लटकेही शिंदे गटात असते
'उद्धव ठाकरे मला भेटत नव्हते तसेच माझा वारंवार अपमान करायचे, मात्र आता त्यांच्याच नावाने निवडणुकीत सहानुभूती लाटली जात आहे,' असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला होता. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, 'आपण याबाबत अधिक बोलणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे जर आज स्व. रमेश लटके जिवंत असते तर ते नक्कीच शिंदे गटात सहभागी झाले असते,' असा दावा राणे यांनी केला.
बनावट शपथपत्राचा निकाल लवकर लागेलच !
ठाकरे गटाकडून बनवण्यात आलेल्या बनावट शपथपत्रांची चौकशी यंत्रणेच्या माध्यमातून सुरु असून लवकरच त्याचा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. मी येताना आर्थर रोड कारागृहाची पाहणी करून आलो आहे. तिथे भरपूर जागा शिल्लक असून याच प्रकरणात काही जण लवकरच आता जातील हे निश्चित आहे. शिवसेनेचा बनावट शपथपत्रांचा इतिहास फार पूर्वीचा असून यापूर्वी कुठेकुठे अशा प्रकारे बनावट शपतपत्रे देण्यात आली याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. याबाबत लवकरच खुलासे होतील.' असा इशाराही राणेंनी ठाकरेंना दिला आहे.
संजय राऊतांवर खोचक टिप्पणी
आता इकडे येताना आर्थर रोड कारागृहातून काही आवाज बाहेर येत होते. त्यामुळे आता बाहेर असणारी काही मंडळी येत्या काही दिवसांत कारागृहातील मंडळींना साथ देण्यासाठी आत जातील. ज्या मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या भाषेचा वापर करून टीका केली अशा मंडळींना नारायण राणे कधीही मदत करणार नाही हे स्पष्ट आहे.' असे म्हणत त्यांनी आर्थर रोड कारागृहात आरोपी म्हणून कैद असलेल्या संजय राऊतांवर खोचक टिप्पणी केली आहे.
अंधेरीत राणेंची सभा होणार - शेलार
अंधेरी पोटनिवडणुकीत राणे प्रचार करणार का प्रश्नावर आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला अंधेरी पूर्ण पोटनिवडणुकीत गरज आहे. त्यामुळे प्रचारासाठी आम्हीही त्यांना विनंती करणार असून त्यांची अंधेरी पोटनिवडणुकीत सभा होणार हे निश्चित आहे,' अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.