राज्यात वर्षभराचे पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

    14-Oct-2022
Total Views |


राज्यात वर्षभराचे पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : "राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन उपक्रमांचे पर्यटन कॅलेंडर बनवणार असून पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील काम करणाऱ्या विविध संस्था व शासनाचा संवाद वाढवून समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार", अशी माहिती माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी (दि.१३ ऑक्टोबर) राज्य शासनाच्या संचालनालय, महाराष्ट्र सरकार यांनी 'पर्यटन नवा विचार,नवी दिशा' अंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. दरम्यान पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर, दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांसह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "आपण सर्व एक समान धागा पकडून याठिकाणी जमलेलो आहोत. महाराष्ट्रात समुद्र आहे, जंगल आहे, ऐतिहासिक वस्तू आहेत, गडकिल्ले आहेत; मात्र इथे इतकं सर्व असूनही आपण आज पर्यटनाच्यादृष्टीने भारतात आणि जगात कुठे आहोत, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. या कार्यक्रमातून उद्या लगेच बदल घडेल असे नाही. मात्र आज सुरु झालेला आपल्यातील संवाद कायम राहिल्यास आपण नक्की बदल घडवू."
 
पुढे ते म्हणाले, "जगभरातील अनेक देशात ५ वर्षांचे पर्यटन कॅलेंडर तयार असते. मात्र आपल्या सरकारचे अपयश आहे की आपल्याकडे एक वर्षाचे कॅलेंडरही तयार नाही. आम्ही आता पूर्ण १ वर्षच कॅलेंडर तयार करणार असून त्यानुसार वर्षभरात साजरे होणारे सर्व उत्सव जल्लोषात साजरे केले जातील. अजंता फेस्टिव्हल असणार, यंदाच्या वर्षी रायगडावर शिवराज्याभिषेकाचे ३५० वर्षे मार्चमध्ये पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने रायगडावर ७ दिवसांचा भव्य उत्सव आपण करणार आहोत. यासाठी एक राष्ट्रीय समितीचे गठन करण्यात येणार आहे.
आम्ही या समितीत मी स्वतः आणि आमचे सर्व अधिकारी असतील. त्यासोबतच हॉटेल क्षेत्रातून एक, टूर ऑपरेटर क्षेत्रातून एक, टूर गाईड क्षेत्रातील एक, कंटेंट क्रिएटर क्षेत्रातून एक, पर्यटन शैक्षणिक संस्थामधून एक आणि विशेष पर्यटन संस्थांमधून एक प्रतिनिधींची निवड करण्यात येईल. केंद्र सरकारचे प्रतिनिधीही यात समाविष्ट असतील. दर महिन्याला याची मिटिंग होईल. तसेच, कौशल्य मंत्रालयही जिल्हा स्तरावर ३६ जिल्ह्यात ३६ ठिकाणी कौशल्य कोर्सेस सुरू करणार आहेत."
महिलांसाठी पर्यटन
 
पर्यटनातील वेगवगेळ्या घटकांसोबतच महिलांसाठी विशेष पर्यटन व्यवस्था सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. ४० टक्के महिलांची संख्या असतानाही आज महिलांसाठी विशेष पर्यटन नाही. महिलांनाही एकटे फिरायला आवडते त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो ही नवीन संकल्पना आहे. यात महिला टूर ऑपरेटर, महिला गाईड, महिला कॅराव्हॅन ड्रायव्हर असतील अशी व्यवस्था उभारली जाईल.
 
 
यावेळी बोलताना संपादक किरण शेलार म्हणाले, पर्यटन दिन साजरा करण्याचे आम्ही ठरवलं. तेव्हा आम्हाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विचारलं तुम्ही वेगळं काय करणार? अनेक कार्यक्रमांचे आयोजन होते मात्र पुढे त्या भागभांडवलदारांचं पुढे काय होतं? हे भागभांडवलंदार सरकारशी जोडले जातात का? तर त्यांना पर्यटन मंत्रालयाशी जोडून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटरने ५५० व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधला. पर्यटन विभागाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत? त्यांनी तक्रार सादर करतानाच आम्हाला उपाय ही सुचवावे ही अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं म्हणणं होतं. त्यानुसार आम्ही तुम्ही दिलेलं उपाय आणि तक्रारी याचा अहवाल तयार केला आहे. आज या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांच्या मागण्या आणि पर्यायांचे एकत्रीकरण करून त्याचा अहवाल आपण इथे प्रकाशित करणार आहोत, असेही शेलार म्हणाले. या संपूर्ण टीमचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौतुक केले. तर भविष्यात विविध प्रकल्पांवर सोबत काम करणार असल्याची ग्वाहीही दिली.
 
या परिषदेचे आयोजन विशेषतः पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध घटक आणि पर्यटन मंत्रालय यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी करण्यात आला होता. यावेळी यंदाच्या वर्षीच्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात प्राप्त महाराष्ट्रातील संस्थांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्था, ओंकार ओक याने साहसी पर्यटन, मिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटन, कॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळ, ऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यद, सस्टेनेबल पर्यटन महेश म्हणगोरे, ट्रेल संस्थाविषयक रिद्धी जोशी, वेलनेस टुरिसम ऑपरेटर विषयक उमेश उन्नीकृष्णन, मेडिकल टूरिसम विषयक मिहीर व्होरा, वाईल्ड लाईफ टुरिसम विषयक लोकेश तारदलकर, टूरिसम असोसिएशन विषयक जय भाटिया, टुरिसम कन्सल्टंट विषयक मकरंद केसरकर, कंटेंट क्रिएटर आणि कचरा व्यवस्थापन विषयक अंकिता वालावलकर आणि अमोल जमदरे, गिआयटी टूर ऑपरेटर विषयक अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील आव्हान आणि समस्या यावर मौखिक सादरीकरण केले. हे करताना पर्यटन विभागाकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा आणि सूचनाही त्यांनी केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. मुंबई तरुण भारतचे पर्यावरण प्रतिनिधी उमंग काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन आनंद वैद्य (स्पेस सेलिंग हेड) यांनी केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.