मुंबईतील पुलांची रखडगाडी आणि वाहतूककोंडी

    12-Oct-2022   
Total Views |
 
मुंबई
 
 
 
मुंबईच्या अनेक भागांत पुलांची कामे रखडलेली किंवा अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीतून मार्ग काढायचा असेल तर पालिकेसह इतर संबंधित यंत्रणांना या रखडलेल्या पुलांचे काम मार्गी लावणे क्रमप्राप्त आहे.
 
 
मुंबई महानगर प्रदेशात पालिका, ’एमएसआरडीसी’, ‘एमएमआरडीए’, रेल्वे इत्यादी सरकारी संस्था पूल बांधणीच्या व दुरुस्तीच्या जबाबदारीचे निर्वहन करतात. पण, तरीही मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पुलांचे काम रखडले तरी आहे किंवा नजरचुकीने वा समन्वयाअभावी योग्य तो समन्वय न झाल्याने, आर्थिक विवंचनेने वा अन्य कारणांनी या प्रकल्पाच्या कामांना विलंब होत आहे. या रखडलेल्या कामांमुळे काही रस्त्यांतील वाहतुकीला लांबचा वळसा वा पल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे साहजिकच कामे दिरंगाईने व अधिक खर्चिक होतात.
 
 
सार्वजनिक वाहतुकीचे पूल हे मुख्यत: तीन प्रकारांत मोडतात. पादचारी पूल, वाहन पूल व मिश्र (वाहन व पादचारी) पूल. काही पूल नदी, खाडी, रेल्वेमार्ग ओलांडणे, उड्डाणपूल, स्कायवॉक पूल, जड वा हलक्या वाहनांसाठी, दुचाकी वाहनांसाठी पूल, रेल्वे पूल, मेट्रो पूल, भुयारी मार्ग, रोप-वे, तात्पुरत्या वळणासाठी असे अनेक प्रकारांनी बनले आहेत. पुलाचा पाया कसा असावा व स्थानिक गरजेनुसार पुलाची रुंदी, लांबी व उंची किती असावी, तेसुद्धा ठरवून संरचनेत तशी मजबूत पायाची योजना करावी लागते. शिवाय सिमेंट-काँक्रिटचे, ‘स्ट्रक्चरल स्टील’चे, गंजू नये म्हणून ‘स्टेनलेस स्टील’ वापरून वा स्टीलवर काही रसायनांचा लेप लावून केला जातो, ‘प्री-कास्ट’, ‘प्री-स्ट्रेस्ड’, ‘प्री-मोल्डेड’ आदी प्रकारही विचारात घेऊन वापरात आणावे लागतात.
 
 
गणपतीसारख्या सणांच्यावेळी मुंबई महापालिकेने 13 धोकादायक पुलांची नावे जाहीर केली आहेत व प्रवाशांनी त्यावरून जाऊ नये, असा इशारा दिला आहे. इतर काही पुलांची कामे रखडली आहेत. त्यांची माहिती जाणून घेऊया.
 
 
पादचारी पूल
 
 
1. हिंदमाता परिसरातील पादचारी पूल : या भागातील पावसाळ्यातील पाणी तुंबण्याची समस्या दूर झाल्याचा दावा पालिकेने यंदा केला. आता याच भागातील पादचार्‍यांच्या समस्येकरिता पूल बांधण्यात येणार आहे. याकरिता रु. 4.87 कोटी खर्च येणार आहे व त्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात ‘एक्सलेटर’ लावला जाणार आहे.
 
 
2. केळेवाडी पुलाचा दिलासा : गिरगावकरांची नवीन पुलाची (चर्नी रोड स्थानक ते भालेराव मार्ग) मागणी आता पूर्ण होणार आहे. जुना पूल धोकादायक ठरल्याने चार वर्षांपूर्वी तो पाडण्यात आला. नवीन पुलाला 5.57 कोटी खर्च येणार आहे. महापालिकेने काम करण्याकरिता निविदाही जाहीर केली आहे. त्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. याचे काम काही कारणांनी अनेक वर्षे रखडले होते.
 
 
3. छशिमटसमोरचा हिमालय पूल : मार्च 2019 मध्ये हा पूल पडला तेव्हा त्या दुर्घटनेत सात नागरिक मृत्युमुखी पडले व 30 जण जखमी झाले होते. तीन वर्षे रखडल्यानंतर आता या पुलाचे काम डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
 
 
4. वडाळा पूर्व-पश्चिम पूल : हा प्रस्तावित पादचारी पूल तब्बल 30 वर्षे रखडला आहे. या पुलाअभावी प्रवाशांना रेल्वेमार्ग ओलांडून आजही जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रवाशांमध्ये प्रामुख्याने अनेक विद्यार्थी, त्यांचे पालक व अन्य प्रवासी यांची संख्या जास्त आहे. पूर्व-पश्चिम जोडणारा ‘बीपीटी’चा एकमेव पूल आहे. या प्रस्तुत पुलाची मागणी येथील लोकांनी अनेक वर्षांपासून केली आहे. पूर्व व पश्चिम वडाळा भागात लाखोंच्या संख्येने वस्ती व अनेक शैक्षणिक संस्थाही आहेत.
 
 
5. वांद्रे पूर्वकडील स्कायवॉक : हा ‘स्कायवॉक’ ‘एमएमआरडीए’ने 2008 मध्ये कलानगर ते वांद्रे रेल्वे स्थानक असा बांधला होता. मुंबई महानगरपालिकेने 2019 मध्ये तो असुरक्षित ठरविला व त्याचा वापर बंद केला. हा ‘स्कायवॉक’ नवीन बांधायचा का जुना दुरुस्त करायचा, याबद्दल निर्णय अजून झाला नाही म्हणून पुलाचे काम रखडले आहे.
 
 
6. रेल्वे पूल : मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरच्या आयुर्मान पूर्ण केलेल्या दहा पादचारी पुलांची पुनर्बांधणी मध्य रेल्वेकडून होणार आहे व त्यांचा खर्च मुंबई महापालिका देणार आहे. 2019 पासून हे प्रस्तावित होते व महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर या पुलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
वाहन पूल
 
 
1. हँकॉक पूल : 148 वर्षांपूर्वी ब्रिटिश जमान्यात बांधलेला पूल तो मोडकळीस आल्याने 2016 मध्ये पाडला गेला. हा पूल नव्याने बांधून पूर्ण झाल्यानंतर माजगाव ते डोंगरीपर्यंत प्रवासासाठी 45 मिनिटांऐवजी दोन मिनिटे लागतील. सध्या प्रवाशांना डोंगरीमधल्या नूर बागेवरून वळसा घालून जावे लागते. हा पूल अनेक वाहनांकरिता सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकापर्यंत जाण्यासाठी वापरला जाणार आहे. या पुलाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. कारण, पुलाकरिता अनेक प्रवाशांनी ‘रॅम्प’ वा इतर काही सुधारणा कराव्यात, अशा सूचना केल्या आहेत. या कामाला सुरुवातीचा 14 कोटी खर्च आता सहा वर्षांत पाचपट वाढला आहे व काम निकृष्ट झाले आहे. पुलाच्या दोन मार्गिका सुरू केल्या आहेत.
 
 
2. कनक पूल : हा पूल 154 वर्षे जुना आहे. नोव्हेंबर 2013 पासून जड वाहनांकरिता तो बंद ठेवण्यात आला आहे. ‘आयआयटी मुंबई’ने हा धोकादायक ठरवून तो परत बांधण्यात यावा, असा रेल्वेला सल्ला दिला आहे. आठ वर्षांनी हा पूल पाडण्यासाठी घेतला आहे. त्यानंतर महापालिका हा पूल दोन वर्षांच्या कालावधीत बांधायला घेणार आहे.
 
 
3. डिलाईल रोड पूल : पश्चिम रेल्वे पहिला गर्डर जूनमध्ये चढविल्यावर दुसरा गर्डर या महिन्यात ‘पूश थ्रू’ पद्धतीने बांधण्यास घेणार आहे. त्यानंतर पूर्वेकडील बांधकाम महापालिका करणार आहे. जुलै 2018 मध्ये हा ब्रिटिशकालीन पूल बंद करण्यात आला. 2019 मध्ये हा पूल पाडण्यात आला होता. पुढील वर्षात हा पूल सेवेत येण्याची अपेक्षा आहे. पुलाची तांत्रिक माहिती - लांबी-रुंदी : 85 मी. व 37 मी. वाहतुकीकरिता रुंदी 27.5 मी. पदपथ - 1.8 मी. गर्डरचे वजन - 1,045 टन व लांबी 90 मी. बांधणी खर्च रु 138.42 कोटी.
 
 
4. बाबासाहेब आंबेडकर रोडचा ‘किंग्ज सर्कल रेल्वे पूल : उंचीच्या मर्यादेमुळे अनेक अवजड वाहने अडखळत आहेत. या वर्षी आठ वाहनांनी धडक दिली व रेल्वे वाहतुकीला कोंडी केली. ही उंचीची मर्यादा रेल्वेने त्यांच्या डिझाईनमधून आणली.
पालिकेच्या अखत्यारितील सर्व पुलांची तपासणी आता दर सहा महिन्यांनी होणार, असे पालिकेने ठरविले आहे.
पुलाच्या स्थितीची छायाचित्रे काढली जाणार असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे.
 
 
पिलर, पुलावरील रस्ता, पर्जन्यवाहिन्या, बेअरिंग व पुलाच्या महत्त्वाच्या भागांची तपासणी सल्लागारांनी करणे आवश्यक आहे.
 
 
वर्षातून एकदा पाण्यात असलेला पुलांचा पाया, ‘पिलर’ची तपासणी करणे, पुलावर असलेले भार तपासले जाणे आवश्यक आहे.
वाहने व पादचार्‍यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने त्यातून पुलावर किती ताण व भार आहे ते अचूक मिळू शकेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुलाचे आयुर्मान व इतर गोष्टींबद्दल काय मत आहे?
 
 
देशातील पूल कालबाह्य होत नाहीत. त्यांना ‘एक्सपायरी डेट’ नसते. त्यांचे आयुर्मान कधी संपते, याबद्दल सरकारी कार्यालयात नोंदणी व दस्तावेज सापडत नाहीत. या कारणामुळे पूल कोसळतात व अपघात होऊन अनेक जणांचे मृत्यू होतात. त्यामुळे यापुढे जाऊन पुलाचे आयुर्मान निश्चित करण्याची वेळ आली आहे व त्यासाठी धोरण बनविले जाईल, असे विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी मांडले आहेत. पुलाचे वित्तीय मूल्यमापन, बांधकामाचा दर्जा इत्यादी गोष्टी बघणे गरजेचे आहे. भारतात फक्त पूल बांधले जातात, पण त्यांची योग्य देखभाल होत नाही.
 
 
म्हणून प्रस्तुत लेखकालासुद्धा असे वाटते की, पुलांकरिता अंकीय पत्रक (ऊळसळींरश्र कळीीेीूं लरीव) पद्धत आणायला हवी. त्यात पुलाची सर्व माहिती नोंदायला हवी. त्याचा नंबर, त्याचा प्रकार, भाराची क्षमता, आयुर्मान किती असणार, पुलाचे मूल्यांकन, दुरुस्ती, पूल बांधण्याचे कारण, कंत्राटदाराचे नाव, संरचना कोणी केली इत्यादी गोष्टी अंकीय पत्रकामध्ये लिहायला हव्यात.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.