पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे गटावर खोचक टिप्पणी

    11-Oct-2022
Total Views | 41

Chandrashekhar-Bawankule-Uddhav-Thackeray 
 
 
भंडारा : 'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. आता शिवसेनेतील चिन्हाच्या वादानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती मशाल पंजाच्या हातात असून त्यावर पंजाची पकड आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही,' अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर केली आहे.
 
 
मंगळवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी भंडारा येथे पत्रकार परिषदेत बावनकुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खा. सुनील मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, आ. परिणय फुके आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे सहप्रमुख विजय चौधरी उपस्थित होते.
 
 
भाजप जबाबदार नाहीत
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना राजकीय लाभ होणार नाही. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारत आपल्या पक्षाचे व कार्यकर्त्यांचे प्रचंड नुकसान केले. शिवसेनेचा पक्ष का फुटला व त्या पक्षातून खासदार – आमदार का बाहेर पडले याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्या पक्षातील घडामोडींना भाजपा जबाबदार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
विजय मिळवणार हे निश्चित
 
तसेच भारतीय जनता पक्षाची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाच्या जोरावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची युती आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवेल, असा विश्वासही बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला.
 
 
बावनकुळे पुढे म्हणाले की, 'आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास करत आहोत. भंडारा हा आपला प्रवासाचा १९ वा जिल्हा आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण भाजपाचा संघटनात्मक प्रवास करणार आहोत. भाजपाने राज्यातील केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून ‘धन्यवाद मोदी’, अशी लाभार्थ्यांच्या हस्ताक्षरातील पंधरा लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बूथस्तरावर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम चालू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वीस घरांची जबाबदारी देऊन सरकारच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी काम करण्यात येत आहे. तसेच राज्यभर विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.'
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121