मुंगी उडाली आकाशी : कल्पना शंखपाळ

    11-Oct-2022   
Total Views |
 
कल्पना शंखपाळ
 
 
 
 
आयुष्यात पाचवीला पूजलेल्या संघर्षावर मात करत स्वत:चे अस्तित्व घडवत समाजासमोर प्रेरणा म्हणून उभ्या ठाकणार्‍या निफाडच्या कल्पना शंखपाळ. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
 
 
स्त्री जन्मा, तुझी कहाणी,
हृदयी अमृत नयनी पाणी...
 
 
याची प्रचिती देणारे आयुष्य आहे कल्पना शंखपाळ यांचे. कल्पना या पिंपळगाव बसवंत येथील कारचूळ येथील शेतकरी महिला. शेतकरी महिला म्हणजे सर्वार्थाने शेतकरीच. शेतीमध्ये नांगरणी, वीजपेरणीपासून ते खतफवारणीपासून कापणी ते शेतमाल विक्रीपासून त्या सर्व व्यवहार आणि कामे यशस्वीरीत्या सांभाळतात. साडेचार एकरच्या शेतीत सोयाबिन आणि द्राक्षाचीं शेती करतात. आता कुणाला वाटेल की, मग त्यात काय झाले? आज-काल किती तरी महिला शेती करतात. पण, या सगळ्या पार्श्वभूमीवर कल्पना यांची जीवनकथा कल्पनेपलीकडची आहे. सुख म्हणजे काय असते? असे विचारण्याची उसंतही न देणारी दु:खं त्यांच्या वाट्याला आली. पण, रडगाणं न गाता त्या कष्ट करत राहिल्या, मुलांसाठी, कुटुंबासाठी. परिसरात अत्यंत यशस्वी शेतकरी आणि कष्टकरी महिला म्हणून कल्पना यांना मानसन्मान आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. नाशिकमधील कष्टकरी स्त्रियांसाठी त्या आदर्शाचे प्रतीकच आहेत. जाणून घेऊया कल्पना यांच्याबाबत...
 
 
सिन्नर येथील वावी या खेडेगावात मराठमोळ्या यादव कुटुंबात कल्पना यांचा जन्म झाला. वडील सुधाकर यादव आणि आई वत्सला यादव. यादव कुटुंबाला पाच अपत्ये. तसेच छोटीशी शेतजमीन. गावात पाण्याचा तुटवडा. त्यामुळे शेती करण्यात अनंत अडचणी. अशा काळात कल्पना शाळेत जाऊ लागल्या. त्याचवेळी सुधाकर कर्करोगाने आजारी पडले. बिचार्‍या वत्सलाबाई घरची शेती करून दुसर्‍याच्या शेतात शेतमजुरी करत. सुधाकर यांच्यावर इलाज करता करताच घरातले किडूकमिडूक विकले गेले. पण, सुधाकर वाचू शकले नाहीत. यादव कुटुंब गरिबीच्या गर्तेत रूतत गेले. त्यामुळे मग कल्पना यांना इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण सोडावे लागले. त्यांना जगण्यासाठी मावस काकांकडे पाठवण्यात आले. बापाचे छत्र हरवलेल्या आणि गरिबीमुळे नातवाईकांकडे राहण्याची वेळ आलेल्या दहा वर्षांच्या कल्पना यांचा संघर्ष सुरू झाला. काकांच्या घरी डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि दोन वेळचे अन्न मिळते, हेच भाग्य होते. कल्पना 18 वर्षांच्या होत्या. गरिबाघरची अल्पशिक्षित मुलगी, याचकाची परिस्थिती. लग्नव्यवहार कसे होणार? कल्पना यांचे लग्नही काका-काकूने ठरवले.
 
 
निफाड येथील वसंत शंखपाळ यांच्याशी. ते बीजवर होते. वयाने कल्पनापेक्षा दुप्पट. पण उच्चशिक्षित आणि घरचे संपन्न. सुरवातीपासूनचत्यांची प्रकृती तोळामासाची होती. गरिबाच्या दुर्लक्षित लेकीचे लग्न झाले, हीच मोठी बाब, असे ते वातावरण. विवाहानंतर एका वर्षातच कल्पना यांना मुलगा झाला. घर, शेतीभाती आणि कुटुंबाचे करण्यात त्यांचा दिवस जायचा. मात्र, मुलगा झाला आणि चार- पाच महिन्यांतच दुर्धर आजारामुळे वसंत यांची तब्येत ढासळू लागली. लग्नाच्या एका वर्षानंतरच पतीच्या आजाराच्या आपत्तीने कल्पना यांच्यावरच्या जबाबदार्‍या वाढल्या. आपल्या आजाराचा बोजा कुणावरही नको, असे कल्पना आणि वसंत यांना वाटले. वसंत यांनी त्यांची ‘एलआयसी’ पॉलिसी मोडली. त्यातून त्यांनी गाय घेतली. मग कल्पना यांचा दिनक्रम सुरू झाला. घर, मूल, नवरा आणि गाय तसेच घरच्या शेतीतली दोन एकर शेती या सगळ्यांकडे लक्ष देणे.
 
 
सुरुवातीला शेती करणे अवघड गेले. पण इतरांच्या शेतीची कामे पाहून, विचारून आणि वसंत यांच्या सूचनेनुसार त्या शेती करू लागल्या. गाईचे दूध डेअरीत विकू लागल्या. पतीचे उपचार, मुलाचे शिक्षण आणि शेतीचे व्यवस्थापन यामध्ये या पैशांचा उपयोग करावा, असे नियोजन कल्पना यांनी केले. अशातच ‘तो’ दिवस उजाडला. वसंत यांची तब्येत ढासळली आणि त्यांचे डोळेही गेले. आता घरातल्या जबाबदार्‍या जास्त वाढल्या. पतीचे उपचार मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात सुरू झाले. याच काळात कल्पना यांनी स्कूटी घेतली. पतीला पाठीशी स्कूटीवर बसवून निफाड येथे जात. तेथून मुंबईसाठी रेल्वेने जात. उपचार करून पुन्हा त्याच दिवशी घरी येत. कारण, मुलगा एकटा घरी असे. जवळजवळ नऊ वर्षे हे सुरूच होते. या काळात कल्पना यांनी आणखीन अडीच एकर शेती घेतली. शेतीचे ज्ञान मिळावे, यासाठी वाचता येणे गरजेचे होते.
 
 
मुलाच्या अभ्यासाची पुस्तक घेऊन त्या लिहू-वाचू लागल्या. आज त्या मराठी आणि इंग्रजी उत्तम वाचतात. पुढे अद्ययावत शेती उपकरणे घेतली. त्याचसोबत स्वत:चे घरही बांधले. या सगळ्या काळात कल्पना यांना तसे पाहायला गेले, तर सांसारिक सुख सुरुवातीला दीड-दोन वर्षे काय ते मिळाले. पण, त्याचे त्यांना वैषम्य वाटत नाही. त्यांचे मत असे आहे की, पतीऐवजी मी आजारी पडले असते तर? आणि आजारी एकाकी व्यक्तीला सोडून जाणे धर्म नाही. असो, कालांतराने वसंत यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या, चार महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. पती नावाचे छत्रही हरपले. पण, कल्पना यांनी मुलाला श्रीरामपूर येथे बीएससी नर्सिंगचे शिक्षण करण्यास पाठवले. आयुष्यात काय मिळवले? दु:ख, कष्ट आणि कष्टच. पण या सगळ्या काळात त्यांनी त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला चांगले समुपदेशन केले. आयाबायांमध्ये जिद्द निर्माण केली की, हरू नका. लढत राहा. कष्ट करा. आज कल्पना यांना नाशिक-निफाड-सिन्नर परिसरात सन्मान आहे, तो नि:संशय याचमुळे आहे. कल्पना यांसारख्या कष्टाळू आणि त्यागमूर्ती महिलेचा संघर्ष आणि यश म्हणजे समाजासमोर प्रेरणाच आहे. या प्रेरणेबाबत म्हणू शकतो, मुंगी उडाली आकाशी...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.