मानसिक स्वास्थ्यासाठीचा ‘ब्लूमिंग’ प्रयोग

    10-Oct-2022   
Total Views |
 
 
 
 
 
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही तितक्याच तीव्रतेने भेडसावतात. पण, मानसिक समस्यांकडे दुर्देवाने म्हणावे तितक्या गांभीर्याने आजही पाहिले जात नाही. हीच गोष्ट ओळखून पुण्याच्या रसिका आगलावे यांनी मन:स्वास्थ्यासाठी ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’च्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. तेव्हा, एकूणच मानसिक आरोग्याबाबतची जागरुकता आणि रसिका यांच्या नव्या प्रयोगाविषयी माहिती देणारा हा लेख...
 
 
मानसिक आरोग्य हा खरंतर खूप गंभीर विषय. पण, भारतात सामाजिक समज-गैरसमजांमुळे हा विषय अत्यंत दुर्लक्षिला राहिला. त्यातच मागील दोन वर्षांत आपण एका भयानक संकटाशी झुंज देत होतो. या काळात आरोग्य समस्यांच्या बरोबरच मानसिक आरोग्याच्या समस्यांनी सुद्धा डोके वर काढले. त्यामुळे या समस्यांवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य चांगले नसेल, तर माणसाची प्रगती आपसुकच खुंटते. तेव्हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हीच दरी भरून काढण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत आणि थोडेसे या क्षेत्राकडे गंभीरतेने बघितले पाहिजे, हीच भावना आणि त्याला व्यवसायाची जोड देण्याचा अभिनव प्रयोग ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’च्या पुण्याच्या रसिका आगलावे यांनी केला आहे.रसिका मूळच्या विदर्भातील अमरावतीच्या. तिथेच अमरावती विद्यापीठातून त्यांनी ‘व्यवसाय व्यवस्थापन’ म्हणजेच ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले.
 
 
महाराष्ट्रात आजही मुंबई- पुणे-नाशिक ही मोठी शहरे सोडली, तर इतरत्र व्यवसायाच्या, नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे इतर भागांतील मुलांना शिक्षण संपल्यावर याच शहरांची वाट धरावी लागते. तशाच रसिकाही पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावर त्यांनी ‘ह्युमन रिसोर्स’ क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. तीन वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले. या क्षेत्रामुळे सातत्याने विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क आला. त्यामुळे ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातील लोक, त्यांचे मानसिक ताणतणाव, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उद्भवणार्‍या समस्या, कौटुंबिक आयुष्यच न उरणे, त्यामुळे होणारे घटस्फोट किंवा अत्यंत टोकाच्या पातळीवरचे वादविवाद या सर्वच समस्यांशी रसिका यांचा परिचय झाला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ म्हणता येईल. आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, यांवर उपाय कसे शोधले पाहिजेत? याच त्यांच्या विचारांमधून त्यांनी मानसशास्त्राचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ‘मास्टर्स’पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘मानसोपचारतज्ज्ञ’ म्हणून व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करत असताना त्यांचा खर्‍या अर्थाने आपल्या भारतात मानसिक आरोग्य आणि समस्या यांच्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत, यांच्याशी परिचय आला. त्यावरच उपाय शोधण्यासाठी एक जागा असली पाहिजे, याच भावनेतून त्या ‘मैत्र कौन्सिलिंग’ या संस्थेशी जोडल्या गेल्या आणि पुढे त्यातूनच जन्म झाला ’ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’चा.
 
 
रसिका यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “भारतात अजूनही मानसिक आरोग्याबद्दल एक प्रकारची कमीपणाची भावना आहे आणि या व्यवसायात आल्यावर मला ती प्रकर्षाने जाणवली. आपल्याकडे अजूनही या गोष्टी टाळण्याकडेच कल असतो. ’होईल बरे’, ’एवढ्या एवढ्याने काय रडतो?’ ’एवढेसुद्धा नाही झेपत, तर पुढं कसे होणार?’ अशी वाक्ये आपल्याला सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतात. मनावर दडपण आहे, आपल्याला ते व्यक्त केले पाहिजे आणि ते व्यक्त करणे काही चुकीचे नाही. उलट ती गरज आहे, हे आपल्याकडे लोकांना समजतच नाही किंवा समजून घ्यायचे नसते. याला दोन करणे आहेत, एकतर आपल्याला टेन्शन आले आहे, भीती वाटतेय, रडू येतेय या सर्व गोष्टी बोलून दाखवणे, ‘शेअर’ करणे एकतर लोक कमीपणाचे समजतात, हे पहिले कारण. दुसरे कारण म्हणजे, हे व्यक्त झाल्यावर ज्याच्यासमोर व्यक्त होतोय ती व्यक्ती त्याचा दुरुपयोग तर करणार नाही ना, ही भीती सतत मनात असते. याचमुळे आपल्याकडे मानसिक समस्या, आरोग्य एक गंभीर समस्या झाली आहे. जेव्हा हा मानसिक ताण असह्य होतो, तेव्हा कित्येकजणांकडून टोकाची पावले उचलली जातात. मग लक्षात येते की, आपण या आधीच जर कोणाशी बोललो असतो तर? शेअर केले असते तर? तर बरेचसे काहीतरी राहून जाते, हीच सध्याची समस्या आहे.”
  
  
‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’मध्ये का यावे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, तुम्हाला तुमचे मन मोकळे करण्यासाठीची, शांत होण्यासाठीची हक्काची जागा म्हणजे ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ.’ इथे कोणीही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जात नाही. तुमचे तुम्ही या, तुमची काय समस्या असेल, त्याप्रमाणे तिकडे असलेले खेळ, वर्कशीट्सप्रमाणे काम करा आणि मन शांत झाल्यावर तुम्ही घरी जाऊ शकता, अशी ही ‘ब्लूमिंग माईंड’ची साधी सिस्टीम. नेमके इथे कसे काम चालते, याबद्दल एक उदाहरण घेऊनच बोलू. आता समजा, कोणाला खूप चिडचिड होणे ही समस्या असेल आणि त्याला ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’मध्ये यायचे असेल तर इथे यासाठी नेमके काय आहे? तर राग ही मुळात अशी भावना आहे की, ती व्यक्त करता आली पाहिजे. जर ती व्यक्त करता आली नाही, तर तर ते आतल्या आत साचत राहते. मग एकेदिवशी स्फोट होऊन बाहेर येते. अशी समस्या या चिडचिडेपणामुळे होते. त्यामुळे तर अशी समस्या असलेल्या व्यक्तीने इथे यावे. आमच्या इथे अतिशय छोटे छोटे खेळ आहेत की, ज्यामुळे थोडा काळ का होईना, थोडे वेगळे विचार मनात येतील. मग तुम्ही स्पंजचा बॉल दाबणे, कागद चुरगाळणे असले उपाय करून तुम्ही तुमचा राग व्यक्त करू शकता आणि मोकळे होऊ शकता. या सर्व गोष्टींमधून पण काही समाधान झाले नाही, तर ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’ची टीम आहेच. त्यांच्याशीही मनमोकळेपणाने बोलू शकता.
 
 
इथे येणार्‍या प्रत्येकाला मदत करण्यासाठी ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’चे स्वयंसेवक सज्ज असतात. ते लोकांना सांगू शकतील की नेमके कशासाठी काय करायचे, कसे करायचे, त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने आपले मुख्य काम की जे आपली मानसिक समस्या सोडवणे हे आहे, ते होऊ शकते. भारतात मानसिक समस्यांच्या बाबतीत एक दरी आहे. एका बाजूला लोकांमध्ये या मानसिक समस्यांबद्दल अजूनही पाहिजे तितकी जागरूकता नाही आणि दुसरीकडे या सर्व मानसोपचारासारख्या उपचारपद्धती इतक्या महागड्या आहेत की, लोकं तिकडे जाण्याचा विचारदेखील करत नाहीत. त्यामुळे या समस्यांवर उत्तर शोधायचे असेल, तर सर्वप्रथम ही दरी भरून काढली पाहिजे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’तर्फे सध्या हॉस्पिटल्स, मोठमोठ्या संस्था, शाळांमध्ये मोफत शिबिरे घेतली जातात. त्यातून मानसिक आजारांबाबत लोकांना जाणीव करून दिली जाते, जेणेकरून लोक संस्थेकडे येतील आणि त्यांच्या समस्या व्यक्त करतील. कारण, कुठलीही समस्या सोडवायची असेल, तर अशी ती समस्या आहे हे मान्य करायला हवे,” असे रसिका सांगतात.
 
 
आम्हीही याच कारणामुळे अगदी थोड्या शुल्कामध्येच ही आमची सेवा उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दलची भीती कमी होईल. या सर्वांच्या भविष्याबद्दल बोलताना रसिका सांगतात की, “भारतात या प्रकारच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. कोरोना काळानंतर तर याची गरज खूप वाढली आहे. याचबरोबरीने जे या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा काम करत आहेत, त्यांनी या समस्यांकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघितले पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याला व्यावहारिक ज्ञानाची जर जोड दिली, तर हे बर्‍यापैकी साध्य होऊ शकते. यासाठी जे मानसिक रुग्ण आपल्यासमोर येत आहेत, त्यांच्या संपूर्ण कौटुंबिक तसेच इतर सगळ्या बाजूंची नीट माहिती करून घेऊनच त्यांच्याशी बोलावे, जेणेकरून आपल्याला त्यांची खरी समस्या काय आहे ते समजून घेता येईल आणि काम करता येईल. ‘ब्लूमिंग माईंड’च नाही तर अशा अजूनही संस्था उभ्या राहाव्यात आणि एकंदरीतच मानसिक आरोग्य या समस्येची स्थिती सुधारावी, असेच या सर्व गोष्टींच्या भविष्याबद्दल बोलता येईल.”
 
 
मानसिक आजारांकडे फक्त एक पूर्वग्रह ठेवून न बघता त्यांच्याकडे एक सामाजिक गरज म्हणून बघत त्याला व्यवसायाची जोड देत पुढे जाण्याचा रसिका आगलावे यांचा उपक्रम स्तुत्यच!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.