लोकमंथन - सांस्कृतिक राष्ट्रवादाचे दर्शन

    01-Oct-2022
Total Views |

Cultural
 
 
 
अखंड हिंदूस्थानची लोकसंस्कृती लोककला यांचे दर्शन घडविणारा लोक मंथन हा भव्य महा महोत्सव आसाममधील गुवाहाटी येथे शंकर देव कलाक्षेत्रात आयोजित करण्यात आला होता दि. 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत आयोजित झालेल्या लोकसंस्कृतीच्या या महा कुंभात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय, स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती, आसामचा पर्यटन विभाग अशा विविध संस्था यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. प्रज्ञा प्रवाह या चळवळीच्या छत्राखाली आयोजित झालेल्या या तिसर्‍या लोक मंथनचा बीज विषय होता.
 
 
लोक परंपरा लोकसंस्कृती आणि लोकपरंपरांचे दर्शन या महामहोत्सवात झाले ते विविध राज्यातील लोककला प्रकार हस्तकला प्रकार यामधून. लोक मंथनचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी, मुख्यमंत्री डॉ. हेमंत विश्व शर्मा आणि प्रज्ञा प्रवाहाचे राष्ट्रीय निमंत्रक जे नंदकुमार हे उपस्थित होते. उद्घाटन समारंभामध्ये सर्वच मान्यवरांची भाषणे चिंतनाला उद्युक्त करणारी होती. उद्घाटन सत्रात प्रास्ताविक करताना जे नंदकुमार म्हणाले पुष्कळ वेळा ‘इंग्रजी फोक’ या संज्ञेला भारतीय भाषांमधून लोक ही संज्ञा वापरली जाते पण फोक आणि लोक यामध्ये फरक आहे फोक ही ब्रिटिशांशी संज्ञा असून ती विपरित संज्ञा आहे. ब्रिटिशांनी भारतातील विविध समाज घटकांचे धर्म आणि विचार प्रणालींचे सांस्कृतिक विचारांचे विघटन केले तुकडे पाडले त्यामुळे फोक तुकडे पडते, तर लोक समाजाला जोडते.
 
 
जे नंदकुमार यांचाच विचार पुढे अधोरेखित करीत आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत विश्व शर्मा म्हणाले युरोपियन वसाहतवाद्यांनी भारताच्या संस्कृतीत फूट पाडली भारताची एकता आणि अखंडचा कायम ठेवण्याचे काम इथल्या लोक संस्कृतीने केले. गोदावरी, तापी, भिमा, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा अशा महानद्यांचा वारसा लाभलेला हा भारत देश म्हणजे एक जागृत देवता आहे. डोंगर दर्या झाडे झुडपे पंचमहाभूते त्यांचे लाभलेले वरदान आणि आपली संस्कृती अस्मिता ही भारताची वैशिष्ट्ये आहेत. आसामला कृष्ण भक्तीचे वरदान लाभलेले आहे. आचार्य संत शंकर देव यांनी आसामचे सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुत्थान घडविले.
 
 
पंधराव्या शतकातील धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती आजही आसामला पथदर्शी आहे. ईशान्य भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये लोकसाहित्य लोकसंस्कृती आणि लोककला हा अभ्यासाचा विषय आहे. तथाकथित सेक्युलर शक्तींचा बिमोड करणे आवश्यक आहे. आपण यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे पुढे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारतीय राज्यघटनेचा आदर आपण केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रीयत्वाचा अभिमानदेखील आपण प्रथमता बाळगला पाहिजे, असे विचार आसामचे राज्यपाल प्रोफेसर जगदीश प्रसाद मुखी यांनी व्यक्त केले. एकमेकांशी असलेले आदान प्रदान एकमेकांची काळजी वाहने हीच खरी भारतीय संस्कृती आहे.
 
 
ख्रिस्ती कालखंडापूर्वी भारताला स्वातंत्र अशी ओळख होती आणि ही ओळख भारताच्या संस्कृतीशी निगडित आहे असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. एक भारत सर्वश्रेष्ठ भारत ही भूमिका आपण मनोमन बाळगली पाहिजे. भारताला चर्चा संवाद समन्वय आणि निती मूल्यांची मोठी परंपरा आहे परस्परांमधील संवाद हा सकारात्मकतेचा असला पाहिजे विषम वादी नसला पाहिजे ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे बुद्धिवाद्यांनीदेखील सर्वसामान्यांचा बुद्धिभेद न करता एकत्र येण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गरजेचे आहेच पण त्यासोबत या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा ही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
 
 
 
Cultural
 
 
 
विविध प्रश्नांची सोडवणूक संसदेत संवादातून होत असते आणि ती यापुढेही झाली पाहिजे तथाकथित बुद्धिवादी हे केवळ ‘इव्हेंट मॅनेजर’ आहेत ते समाजामध्ये अस्वस्थता पसरविण्याचे कार्य करतात. या प्रवृत्तीचा आपण बिमोड केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत संस्कृती हा भारताचा आत्मा आहे. भारतात विविध राज्यात वेगवेगळे सण उत्सव वृत्तवैकले लोककला रीतीरिवाज देव देवता आहेत पण या सर्वांचे चैतन्य मात्र समान आहे. हा भारतीयत्वाचा संस्कार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 20 यात संस्कृती आणि नीतीमूल्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पण दुर्दैवाने काही राज्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार केलेला नाही. विविधतेत एकता आहे हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे असे याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी स्पष्ट केले.
 
 
लोक मंथन मागील भूमिका स्पष्ट करताना संस्कार भारतीचे संघटन मंत्री अभिजित गोखले म्हणाले लोकमंथनचा तिसर्‍या पर्वाचा विषय ’लोकपरंपरा’ असा आहे. हा विषय घेण्याचे कारण भारताचे सांस्कृतिक वैभव हे केवळ नागर संस्कृतीने अथवा अभिजनसंस्कृतीने वाढविले नाही, तर वनवासी वाड्या पाड्यातील वनवासी बंधूंपासूनग्राम संस्कृतीत शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांपासून सर्वांनी देशाचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे लोक परंपरा हा या सांस्कृतिक वैभवाचा एक भाग आहे हे लक्षात घेऊन तिसर्‍या परवाच्या लोक मंथनमध्ये हा विषय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक विविधतेतून देशाची एकात्मता आणि राष्ट्रवाद वृद्धिंगत करण्याचा संकल्प आपण मंडळींनी सोडलेला आहे.
 
 
लोकमंथनच्या या महा महोत्सवात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसंबळे, भारत सांस्कृतिक महापरिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आसाम नागालँडचेविविध मंत्री सहभागी झाले होते. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन सातत्याने लोक मंथनसारख्या चळवळींना लाभत आहे. समारोपाच्या भाषणातील केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या भाषणांनी लोकमंथनच्या या महामहोत्सवावर अक्षरशः कळस चढविला. पाण्याच्या थेंबाला सागर असल्याची जाणीव होते हेच वैश्विक सत्य आहे. स्त्री शक्ती आणि संस्कृती ही खरी भारताची ओळख आहे.
 
 
आसाम आणि केरळसारख्या राज्यांनी मातृशक्तीला प्राधान्य आणि प्राथमिकता दिली. जेथे नारीची पूजा होते तेथे साक्षात ईश्वरदेखील रमतो, असे म्हटले जाते. देशाचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटले आहे, जगातील सर्व कारुण्य स्त्री शक्ती सामावलेले आहे. स्त्री शक्तीची आराधना केल्यावर आपल्या मनात करुणेचा भाव निर्माण होतो, असे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटकमधील विचारवंत दत्तात्रय होसबाळे यांनी सांगितले ब्रिटिश वसाहत वाद्यांनी लोककला फोक हा पर्यायी शब्द दिला हा अतिशय अवहेलनात्मक शब्द आहे. लोकचा संबंध राष्ट्रीय अस्मितेशी आहे.आणि अस्मितेशी हिंदूस्थानने कधी तरजोड केली नाही. लोकमध्ये सामूहिक शहाणपण असते आणि हे सामूहिक शहाणपण विविध कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रांत होते.लोकमंथनमधील सर्वच मान्यवर अभ्यासकांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले.
 
 
लोक मंथन उपक्रमाचे गुवाहाटी हे तिसरे सत्र होते. यापूर्वी लोक मंथन भोपाळमध्येआयोजित झाले होते. दुसरे लोक मंथन झारखंडमधील राची येथे आयोजित झाले होते. या तिसर्‍या लोक मंथनचा मध्यवर्ती विषय लोक परंपरा हा होता. त्यामुळे आजच्या गतिमान युगात लोकपरंपरेचे स्थान लोकपरंपरेचा इतिहास जागतिकीकरण आणि लोक परंपरा, विज्ञान आणि लोक परंपरा, संत वांङ्मय आणि लोकपरंपरा, अर्थ नीती आणि लोकपरंपरा, कृषी-संस्कृती आणि लोक परंपरा, लोक परंपरा पर्यावरण आणि जैविक विविधता, लोकपरंपरेत शक्तीची संकल्पना, व्रतवैकल्ये अन्नदान आणि लोकपरंपरा शिक्षण कथन कौशल्य आणि लोकपरंपरा, लोकपरंपरेमध्ये वाद्यांचे योगदान अशा विविध विषयांचा आढावा आणि चिंतन या लोक मंथन उपक्रमात घेण्यात आले.
 
 
लोक मंथनच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना आयोजकांनी म्हटले, लोक परंपरा हा बीज विषय यासाठी घेतला त्यातून लोककलांचे संवर्धन आणि संरक्षण होईल. विविध जाती समूहांमध्ये आदान प्रदान सुरू होईल. त्यासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग करण्यात येईल. संस्कृती आणि अध्यात्म ही देशाची शक्ती आहे. सनातन मूल्यांची अभिव्यक्ती हा लोक मंथन मागील विचार आहे.लोक मंथनमध्ये ईशान्य भारतातील अनेक लोककला प्रकार सादर झाले. लोक मंथनच्यापूर्वसंध्येला ईशान्य सांस्कृतिक केंद्राचे प्रमुख प्रसन्न गोगोई यांच्या नेतृत्वाखाली मेघालयाचे वांगला नृत्य, मणिपूरचे ढोल आणि चोलाम नृत्य, आसामचे बिहू नृत्य, त्रिपुराचे होजागिरी नृत्य असे विविध लोककला प्रकार सादर झाले. महाराष्ट्रातील पुण्याच्या संचाने आदिशक्तीचे जागरण या महामहोत्सवात घडविले. एकूणच लोक मंथन ही लोक चळवळ होणे ही काळाची गरज आहे, असेच या महामहोत्सवाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
 
 
-प्रा. डॉ. प्रकाश खांडगे