'खासगी शाळांना फी वाढ करता येणार नाही! : योगी सरकारचे आदेश!

    09-Jan-2022
Total Views |

Yogi Adityanath
 
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या अनेक धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द तर आहेतच, मात्र त्यांच्या आणखी दोन कामांची भर यात पडली आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्याही खासगी शाळेला यावर्षी फी वाढ न करण्याचा आदेश योगी सरकारने दिला आहे. ७ जानेवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनतेवरील महागाईचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा आदेश सीबीएसई, सीआयएससीआय, यूपी बोर्ड तसेच इतर बोर्डांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व खाजगी शाळांना लागू असेल. खासगी शाळांना फी वाढ करता येणार नसल्याचे हे तिसरे वर्ष आहे.
 
 
"कोणत्याही खाजगी शाळेने फी वाढवल्यास पालक आणि विद्यार्थी निर्धारण नियामक समितीकडे तक्रार करू शकतील. उत्तर प्रदेश स्वयं-वित्तपोषित स्वतंत्र शाळा कायद्याच्या कलम-८(१) अंतर्गत त्यांना ही तक्रार करता येईल.", असे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आराधना शुक्ला यांनी दिलेल्या आदेशात म्हटले. तसेच कोणतीही खाजगी शाळा फी वाढवणार नाही यासाठी सर्व जिल्हा शाळा निरिक्षकांना कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे.
 
 सैनिक शाळेला जनरल बिपिन रावत यांचे नाव!


CDS General Bipin Rawat
 
 
 
मणिपुरीच्या सैनिक शाळेला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे नाव देण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. या घोषणेचे जनतेने स्वागत केले असून जनरल रावत यांच्या नावाने शाळा होणे, हा सन्मान असल्याचे सांगितले जात आहे.