चीनचे प्रचारयुद्ध

    08-Jan-2022
Total Views | 180

namo 2


चीन एकपक्षीय हुकूमशाही आहे व भारत लोकशाही देश आहे. खुल्या समाजात सरकारच्या विरुद्ध बोलणारे बरेच असतात. अशा लोकांमध्ये चुकीची माहिती पेरून लोकक्षोभ माजवणे सहज शक्य असते. चीन अशा गोष्टींचा फायदा घेतो. पाश्चात्य प्रसारमाध्यमे चीनच्या प्रचारयुद्धाला फारसे बळी पडत नाहीत.



त्यामुळे चीनने आपल्या प्रचारयुद्धाचे एक साधन म्हणून ‘ग्लोबल टाइम्स’ या आपल्या वृत्तपत्राचा वापर सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात या पत्राने भारताविरुद्ध बराच प्रचार केला आहे. पण, त्याची विश्वासार्हताच नसल्यामुळे त्याचा फारसा परिणाम भारतीयांवर झाला नाही. चीनच्या प्रचार युद्धाला त्याच पद्धतीने उत्तर देण्याला मर्यादा आहेत. चीनमध्ये अन्य देशांची प्रचारमाध्यमे पोहोचत नाहीत. जगात वापरली जाणारी समाज माध्यमे वापरण्यास चीनमध्ये बंदी आहे. त्यामुळे अन्य देशांच्या प्रचारयुद्धाचा चीनवर परिणाम होत नाही. पण चीनच्या प्रचारयुद्धाचे परिणाम टाळायचे असतील तर या प्रचारयुद्धातला फोलपणा सतत स्पष्ट करणे हाच उपाय आहे.
 
 
नव्या वर्षाच्या मुहूर्ताला चीनने भारताशी संबंधित चार गोष्टी केल्या.
१. अरुणाचल सीमेवरील तिबेटी गावांना चिनी नावे देणे
२. गलवान खोर्‍यात चीनचा राष्ट्रध्वज फडकावणे
३. पँगाँग त्सोवर नवा पूल बांधणे आणि
४. सीमेवर रोबो सैनिक तैनात करणे.



या घटना चीनने जाहीर केल्याबरोबर भारतात अस्वस्थता पसरली. नव्या वर्षातही चीन आपला पिच्छा सोडणार नाही का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि चीनला हेच अपेक्षित होतं. खरं तर हे काही सैनिकी आक्रमण नव्हतं, चीनने सीमेवर एकही गोळी झाडली नव्हती. पण, भारतातील सुजाण व जाणकार लोक एकदम अस्वस्थ झाले. सरकारने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी काही लोक करू लागले या घोषणा करताना चीनला हेच अपेक्षित होतं. चीनने सीमेवर एकही गोळी न झाडता आपल्याला हवा तो परिणाम साधला होता. यालाच म्हणतात ‘प्रचारयुद्ध’ किवा ‘मानसिकयुद्ध’. प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती निर्माण करणे व त्याची लढण्याची इच्छाशक्तीच घालवून टाकणे हा या प्रचारयुद्धाचा किंवा मानसिक युद्धाचा हेतू असतो.


 
चीनशी भारताचा सीमावाद आहे, हा वाद चीनला आपल्या पद्धतीने मिटवायचा आहे, म्हणजे भारताने सीमेबाबतचे आपले म्हणणे निमुटपणे मान्य करावे, अशी चीनची अपेक्षा आहे आणि भारत ते करीत नाही. चीनची लष्करी शक्ती भारताच्या तिप्पट आहे, त्यामुळे तो लष्करी बळाने हा प्रश्न आपल्याला हवा तसा सहज सोडवू शकतो, असे गणित कागदावर मांडता येते. पण प्रत्यक्षात तसे घडणे अवघड आहे. याचे कारण चीनच्या तुलनेत भारत लष्करी शक्तीत कमी असला तरी युद्धात चीनचा प्रचंड विध्वंस करण्याची भारताची क्षमता आहे. भारताकडे केवळ अण्वस्त्रेच आहेत, असे नाही तर चीनच्या आतल्या भागात खोलवर मारा करू शकतील अशी पारंपरिक क्षेपणास्त्रे आहेत. भारताचे लष्कर चिनी लष्करापेक्षा अधिक युद्धानुभव असलेले आहे. हिमालयातील लढायांचा भारताजवळ अधिक अनुभव आहे. त्यामुळे कोणतेही लष्करी साहस चीनला परवडणारे नाही. त्यामुळे लष्करी युद्धात चीनला हमखास यश मिळेल याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवायचा असेल, तर अपारंपरिक मार्गाने त्याला खच्ची करण्याचे मार्ग स्वीकारावे लागतात. चीन तेच करतो आहे.


मे २०२० मध्ये चीनने पूर्व लडाखमध्ये केलेले आक्रमण फार मोठे नव्हते. भारताची फारशी लष्करी उपस्थिती नसलेल्या भागात विशेषत: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या निर्मनुष्य भागात (no mans land) सैन्य घुसवून त्याने तेथे ठाण मांडले आणि जगातल्या सर्व देशांच्या उपग्रहांना दिसतील अशा बेताने आपल्या लष्कराच्या पिछाडीला मोठ्या प्रमाणात रणगाडे, चिलखती वाहने आणि तोफा आणून ठेवल्या. जगातल्या विशेषत: अमेरिकेच्या उपग्रहांनी अवकाशातून टिपलेली या युद्धसामग्रीची छायाचित्रे प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. एका भारतीय वृत्तवाहिनीने लगेच एक उपग्रह भाड्याने घेऊन या चिनी हालचालींचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू केले व चीन भारतावर मोठा महाभयानक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या सतत देण्यास सुरुवात केली. चीनला हेच हवे होते. चीनच्या प्रचारयुद्धाच्या डावाला ही भारतीय वृत्तवाहिनी बळी पडली होती व तिने बातम्या देण्याच्या नावाखाली भारतीयांमध्ये चीनविषयी भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या भीतीच्या धक्क्यात भारतीय लोक असतानाच चीनने आणखी एक धक्का दिला. त्याने गलवान खोर्‍यात भारतीय सैनिक पथकावर अचानक हल्ला करून २० भारतीय सैनिकांना ठार केले, कोणतेही शस्त्र न वापरता. याचा मोठा धक्का फक्त जनतेलाच बसला नाही तर सरकारला व लष्करालाही बसला. या अशा अचानक व अनपेक्षित हल्ल्याने संपूर्ण देश व सरकार गांगरून जावे व त्याला काय करावे हे सुचू नये, याच अपेक्षेने चीनने ही खेळी खेळली होती व त्याचा परिणामही झाला. भारतात सरकारविरुद्ध एकच ओरड सुरू झाली, पंतप्रधानांनी ताबडतोब निवेदन करावे अशा मागण्या होऊ लागल्या. चीनची लष्करी तयारी किती आहे व तो कसे आक्रमण करणार आहे, भारत कसा बेसावध आहे वगैरे बातम्याही माध्यांमध्ये येऊ लागल्या.


चीनने लष्करी कारवाई व प्रचारतंत्र यांचे बेमालूम मिश्रण करून भारताविरुद्धची पहिली लढाई जिंकली होती. या पहिल्याच फटक्याने भारतीय लष्कर व सरकार निश्चितच गांगरून गेले. कारण, चीन असे काही करेल असे कोणासच वाटले नव्हते. पंतप्रधानांनाही चीनच्या या अशा वागण्याचा अर्थ लागत नव्हता. त्यातच चीनने २० भारतीय सैनिक मारल्यामुळे चीनशी चर्चा करण्याचा मार्गही उरला नव्हता. पण अशा घटना घडतात त्यावेळी भावनेच्या भरात कोणतीही कृती करणे घातक असते. चीनची अपेक्षा भारत अशी भावनेच्या भरात काही तरी कृती करील व त्याचा आपण फायदा करून घेऊ अशी होती. पण सुदैवाने भारत सरकारने जनतेचा दबाव असूनही अशी कृती केली नाही. चीनने सीमेवर जे काही केले त्याचे उत्तर द्यायचे असेल तर विचारपूर्वक कृती करणे आवश्यक होते व त्यासाठी पुरेसा वेळ हवा होता. त्यामुळे त्यावेळी पंतप्रधानांनी चीनने भारताच्या भूमीवर आक्रमण केलेले नाही असे संदिग्ध विधान करून वेळ मारून नेली व भारत चीनविरुद्ध काहीच कारवाई करणार नाही असा संकेत दिला. त्यामुळे चीनने भारताच्या अचानक प्रतिसादाला तोंड देण्याची जी तयारी केली होती ती वाया गेली. पण, त्याने प्रचारयुद्धाची नवी आघाडी उघडून भारताला भीती दाखवणे सुरू ठेवले. खरे तर चीनला आणखी भूमी घ्यायची असती तर त्याने युद्ध सुरू ठेवले असते. पण, त्याने तसे केले नाही. त्याने भारताला एक धक्का दिला आणि बधीर केले. त्यामुळे आता भारत आपल्याशी चर्चा सुरू करील व त्या चर्चेत आपण आपल्या अटी भारतावर लादू, अशी चीनची रणनीति होती. पण, भारताने चर्चेची काणतीही मागणी केली नाही. उलट सैन्याची व युद्ध सामग्रीची जमवाजमव करून १५ दिवसात चिनी सैन्यासमोर त्यांच्याइतकेच भारतीय सैन्य व युद्धसामग्री आणून उभी केली, एवढेच नाही तर चिनी सैन्याला बेसावध गाठून कैलाश शिखरे ताब्यात घेतली व चीनचे मोल्डो लष्करी ठाणे धोक्यात आणले. त्यामुळे चीनने टाकलेला दबाव एकदम कमी झाला व भारतीयांत नवीन आत्मविश्वास निर्माण झाला. हे चीनला परवडण्याजोगे नव्हते.

 
आता चीनने प्रचारयुद्धाची दुसरी खेळी सुरू केली. ती म्हणजे चीन लष्करी तंत्रज्ञानात खूप पुढे आहे व तो सायबर युद्धाचा वापर करून भारताची सर्व युद्धयंत्रणा निकामी करू शकतो. त्यामुळे भारताचे एकही लढाऊ विमान उडू शकणार नाही, रडारयंत्रणा पूर्ण निकामी होईल, एवढेच नाही तर देशातील सर्व वीजपुरवठा यंत्रणा बंद पडून भारतदेश ठप्प होईल. या प्रकारच्या प्रचारासाठी चीनने त्याची यंत्रणा तर राबवलीच पण भारतातही काही मंडळींना हाताशी धरले. ही मंडळी सतत युट्युबवर ब्लॉग टाकून चीनच्या तंत्रज्ञानापुढे भारताचा कसा टिकाव लागणार नाही, चीनची ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित युद्धयंत्रणा भारताला दारूण पराभवाच्या खाईत कसे लोटील याचे घाबरवून टाकणारे चित्र रंगवीत होती. आता चीनने सीमेवर रोबो सैनिक आणण्याची घोषणा केल्यानंतर या व्हडिओ ब्लॉगरने नुकताच चीनच्या रोबो सैनिक शक्तीचे वर्णन करणारा व छातीत धडकी भरवणारा व्हिडिओ टाकला आहे. खरे तर रोबो सैनिक म्हणजे स्वयंचलित व दुरनियंत्रित मशीनगन्स आहेत. या मशीनगन्सचा पहिला अनुभव भारतीय लष्कराने श्रीलंकेतील कारवाईच्या वेळेला घेतला होता. ‘एलटीटीई’च्या गनिमांनी ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणा वापरून अशा मशीनगन्स तयार केल्या होत्या व त्याला अनेक भारतीय सैनिक बळी पडले होते. त्यामुळे चीनचे रोबो सैनिक अजिंक्य आहेत आणि भारत त्याच्यापुढे निष्प्रभ आहे, असे समजण्याचे कारण नाही.



चीन लष्करी तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या खूप पुढे आहे, त्यामुळे भारताने चीनशी पंगा घेऊ नये, असा सल्ला काही विश्लेषक देत असतात. खरे तर ते हे कशाच्या आधारे म्हणतात हे कळत नाही. पण, याचा अर्थ भारताने आपली तंत्रज्ञान क्षमता गुप्त राखण्यात चांगलेच यश मिळवले आहे, असे म्हणावे लागेल. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या लष्कराच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी आपला ‘बीदुई’ हा उपग्रह कामाला लावला होता. पण भारतीय तंत्रज्ञांनी या ‘बीदुई’ उपग्रहात शिरकाव करून चिनी लष्कराच्या हालचाली टिपण्यास सुरुवात करून हे तंत्रज्ञान चीनवरच उलटवले. चीनला या धोक्याची जाणीव झाल्याबरोबर चीनने या उपग्रहांचा वापर बंद केला. चीन ज्या तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताला मात देऊ पाहत होता, ते सर्व तंत्रज्ञान तपासून घेण्याची पाळी चीनवर आली आहे. चीन तंत्रज्ञानात आपल्यापेक्षा पुढे आहे, हा एक पद्धतशीरपणे पसरवलेला गैरसमज आहे व हा गैरसमज चीनने आपल्या प्रचारयुद्धातून पसरवलेला आहे. चीनने लष्करी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, हे खरे आहे. चीनच्या तुलनेत भारत या क्षेत्रात बराच मागे आहे, हेही खरे आहे. सायबर वॉर, ड्रोन तंत्रज्ञान, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, रडार आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान यात चीन गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन करीत आहे. १९९१च्या आखाती युद्धापासून प्रेरणा घेऊन चीनने या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. पण, चीनने हे तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित केलेले नाही. चीनची अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर अमेरिकन उद्योगांना चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी देऊन हळूहळू या उद्योगांकडून हे तंत्रज्ञान मिळवले आहे. यातल्या बर्‍याच अमेरिकन कंपन्यांनी चिनी कंपन्यांना दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतर करून बराच पैसा कमावला आहे. या बहुतेक चिनी कंपन्या पीपल्स लिबरेशन आर्मी व चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी सरकारी पैशाने स्थापलेल्या आहेत. म्हणजे त्या चीन सरकारच्या कंपन्या आहेत.



चीनचे हे तंत्रज्ञान व त्यावर आधारित लष्करी साधने ही पूर्ण कसोटीवर उतरणारी आहेत की, नाही याविषयी अमेरिकन संरक्षण व संशोधन यंत्रणांच्या मनात शंका आहे. चीनने या सर्व तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्यात काय, त्याचे परिणाम काय दिसून आले, त्यातल्या किती यशस्वी झाल्या वगैरे माहिती उपलब्ध नाही. चीनने मध्यंतरी उपग्रह मारक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला, नंतर चीनने किमान १७ वेळा भारतीय उपग्रहांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट अमेरिकेने केला. पण, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपले सर्व उपग्रह सुरक्षित आहेत व त्यातला एकही नष्ट झालेला नाही, असे जाहीर केले आहे. यावरून चिनी तंत्रज्ञानाची विश्वासार्हता लक्षात यावी. २०१२ ते २०१८ या काळात अनेक उपग्रहांवर हल्ले केल्याचा दावा चीनने केला आहे. पण, एकाच हल्ल्याचा तपशील जाहीर केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) म्हणणे आहे की, त्यांनी अशा हल्ल्यांना रोखणारी यंत्रणा बसवली आहे, त्यामुळे असे हल्ले झाले असले तरी ते परतवले गेले आहेत. अशा हल्ल्यांची ‘इस्रो’ नोंद करते, पण हे हल्ले कुठून झाले हे सांगता येत नाही, असेही ‘इस्रो’चे म्हणणे आहे. दुसर्‍या देशांच्या संगणकात घुसखोरी करणे, ड्रोन युद्धतंत्राचा वापर करणे वगैरे चीनची वैशिष्ट्ये आहेत, असे सांगितले जाते. पण, हे तंत्र भारतासह जगातले अनेक देश वापरत असतात. चीनने मुंबईच्या वीजयंत्रणेची संगणक यंत्रणा मध्यंतरी काही तास बंद पाडली होती. पण ती लगेच दुरुस्त करण्यात आली होती. हे एक उदाहरण वगळता चीनला भारताच्या ‘सायबर’ सुरक्षा यंत्रणेत फारसा शिरकाव करता आलेला नाही. अर्थात त्यासाठी ‘सायबर’ सुरक्षा यंत्रणा सतत अपग्रेड करावी लागते, त्यात हयगय झाली तर शत्रू डाव साधू शकतो.
चीन एकपक्षीय हुकूमशाही आहे व भारत लोकशाही देश आहे. खुल्या समाजात सरकारच्या विरुद्ध बोलणारे बरेच असतात. अशा लोकांमध्ये चुकीची माहिती पेरून लोकक्षोभ माजवणे सहज शक्य असते. चीन अशा गोष्टींचा फायदा घेतो. पाश्चात्य प्रसारमाध्यमे चीनच्या प्रचारयुद्धाला फारसे बळी पडत नाहीत. त्यामुळे चीनने आपल्या प्रचारयुद्धाचे एक साधन म्हणून ‘ग्लोबल टाइम्स’ या आपल्या वृत्तपत्राचा वापर सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात या पत्राने भारताविरुद्ध बराच प्रचार केला आहे. पण, त्याची विश्वासार्हताच नसल्यामुळे त्याचा फारसा परिणाम भारतीयांवर झाला नाही. चीन व्यापारी संबंधांचा वापरही युद्धातले एक अस्त्र म्हणून यशस्वीपणे करू शकतो. कारण, चीनची अर्थव्यवस्था सुदृढ आहे. चीनची अर्थव्यवस्था निर्यातप्रधान आहे व जवळजवळ सगळे जग याबाबत चीनवर अवलंबून आहे. भारताने लडाखमधील आक्रमणानंतर चीनवर काही व्यापारी निर्बंध लादले होते पण ते यशस्वी झाले नाहीत, उलट काही महत्त्वाच्या वस्तूंबाबतचे भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले आहे.
 
चीनच्या प्रचार युद्धाला त्याच पद्धतीने उत्तर देण्याला मर्यादा आहेत. चीनमध्ये अन्य देशांची प्रचारमाध्यमे पोहोचत नाहीत. जगात वापरली जाणारी समाज माध्यमे वापरण्यास चीनमध्ये बंदी आहे. त्यामुळे अन्य देशांच्या प्रचारयुद्धाचा चीनवर परिणाम होत नाही. पण चीनच्या प्रचारयुद्धाचे परिणाम टाळायचे असतील तर या प्रचारयुद्धातला फोलपणा सतत स्पष्ट करणे हाच उपाय आहे. चीनने पँगाँग त्सोवर पूल बांधण्याची घोषणा केल्यानंतर भारताने प्रथमच या प्रचाराला उत्तर देऊन स्पष्ट केले आहे की, हा भारताचा प्रदेश आहे व हे बांधकाम बेकायदा आहे. या उत्तरावरून गोष्ट स्पष्ट होईल की, अक्साई चीनचा प्रदेश चीनच्या ताब्यात कितीही काळ असला तरी भारत त्यावरील आपला दावा सोडणार नाही व योग्य वेळ येताच तो प्रदेश चीनकडून घेण्याचा प्रयत्न करील. १९६२च्या पराभवानंतरही भारताने या प्रदेशावरचा दावा सोडलेला नाही व यापुढेही तो सोडणार नाही, ही गोष्ट चिनी धोरणकर्त्यांच्या मनावर बिंबवणे हेही चीनविरुद्धचे एक प्रचारयुद्ध आहे व ते भारताने सतत खेळत राहिले पाहिजे.









दिवाकर देशपांडे




 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121