आरोपीला फाशी द्या! सिन्नरमध्ये सर्वपक्षीय मोर्चाची एकमुखाने मागणी...

‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक?

    08-Jan-2022
Total Views |

nashik
नाशिक : सिन्नर येथे एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ‘लव्ह जिहाद’मधून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात येत असून, याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये शुक्रवार, दि. ७ जानेवारी रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत नागरिकांनी यावेळी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. याप्रकरणी संशयित आरोपी रईस शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ज्यामुळे असे कृत्य करण्यास पुन्हा कोणीही धजावणार नाही, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी शेख याला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचे देखील निलंबन करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली.
 
सिन्नर शहर आणि तालुक्यातील नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. तर बस स्थानकाजवळ नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजप आमदार सीमा हिरे, नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे, भाजपचे सुनील बच्छाव, उदय सांगळे, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, संजय सानप, समाधान गायकवाड, विनायक सांगळे, राजाराम मुरकुटे, बाळासाहेब हांडे, सोमनाथ तुपे, गौरव घरटे, धनंजय गुट्टे, जगन्नाथ भाबड अशोक भाबड, रमेश नागरे, नामदेव कोतवाल, सोमनाथ वाघ, महेश नाईक, शेखर चोथवे, पीराजी पवार, दत्ता गोळेसर, कैलास झगडे, मुजाहिद खतीब, प्रशांत रायते, सविता कोठुरकर, भाग्यश्री ओझा, सरला गायकवाड, मंजुषा दराडे, कैलास दातीर, उत्तम बोडके, रामसिंग बावरी, संजय काकड, राजेंद्र चव्हाण आदींसह शेकडो नागरिक मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.वावी वेस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानकाजवळ मोर्चाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले. दरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने सिन्नर बार कौन्सिलला रईस शेख याचे वकीलपत्र कोणीही न घेण्याचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले.
 
उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपाधीक्षक सोमनाथ तांबे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार आदींनी मोर्चातील नागरिकांशी यावेळी संवाद साधला. पारदर्शी चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन यावेळी पोलीस व प्रशासन यांच्यावतीने उपस्थितांना देण्यात आले.
 
खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
 
संशयित आरोपी रईस शेख यांने अनेकांना अशा प्रकारे फसवले आहे. ही आत्महत्या नसून खून आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून प्रकरणाची पारदर्शी चौकशी करावी अशी मागणी उदय सांगळे यांनी केली. विनायक सांगळे यांनी रईस शेख व पोलीस यांचे लागेबांधे होते, असा आरोप केला. त्यामुळे आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. पीडितेच्या नातलगांना पोलिसांकडून धमकावण्यात आले. संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. अॅड. भाग्यश्री ओझा यांनी वकील संघाच्यावतीने न्यायालयीन लढाई देण्याचे जाहीर केले. यावेळी नामदेव कोतवाल, रामसिंग बावरी, मंजुषा दराडे, धनंजय गुट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.
 
पोलीस निरीक्षक मुटकुळेऐवजी उपअधीक्षक तांबे तापसाधिकारी
 
युवतीच्या संशयित मृत्यू प्रकरणी पोलीस यंत्रणेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडून प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. आता निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे हे या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षिका माधुरी कांगणे यांनी दिली. मोर्चा व रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर राजकीय प्रमुख कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात त्यांनी बैठक घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली.
 
याप्रकरणात यापुढे स्थानिक पोलिसांचा हस्तक्षेप राहाणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयामार्फतच जाबजबाब नोंदविण्यात येतील. पारदर्शी पद्धतीने तपास करून पोलिसांची प्रतिमा भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या मनात कोणताही संशय राहाणार नाही अशा पद्धतीने तपास होईल. प्रकरणात रईस शेख खरोखरच दोषी असेल तर कठोर शिक्षा होण्यासाठी तशा पद्धतीचे दोषारोप पत्र दाखल करणार असल्याचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितले.
 
पोलीस व रईस शेख यांचे असलेले संबंध, गुन्हा घडूनही ‘एफआयआर’ दाखल करण्यास झालेला उशीर, जनमताच्या रेट्यानंतर दाखल झालेला गुन्हा, पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावणे यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पारदर्शी होण्याबरोबरच रईस शेख याला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करावा अशी मागणी यावेळी उपस्थितांच्यावतीने करण्यात आली.
 
युवती गर्भवती असल्याची माहिती
 
सिन्नर येथील घटनेतील ती युवती ही दि. १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी करण्यात आलेल्या तिच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार सहा आठवडे दोन दिवसांची गर्भवती असल्याचे समोर येत आहे. तसेच, शवविच्छेदन अहवालात देखील ही बाब समोर आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलीस आता संशयित आरोपीवर नेमक्या कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
 
विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार : आ. सीमा हिरे
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा गंभीर प्रकार मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोषीला कठोर शिक्षा व्हावी, त्यास सहकार्य करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.
 
प्रशासनाची ढिलाई हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण
सिन्नर येथील घटना ही प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचे एक उदाहरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यापासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाची ढिलाई हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. सिन्नर येथील घटनेबाबत भारतीय जनता पक्षाने व इतर सर्व सजग नागरिक आणि पक्षांनी आवाज उठविल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे अशा अपप्रवृत्तींवर वेळीच कठोर कारवाई होणे आणि त्यांना शासन होणे हे नक्कीच आवश्यक आहे.
- लक्ष्मण सावजी, प्रदेश पदाधिकारी, भाजप