आपला तो बाब्या आणि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022   
Total Views |

SONU




‘मराठी राबडीदेवी’ अशा आशयाचे ट्विट जितेन गजारिया यांनी गुरुवारी केले. त्यावरुन शिवसेनेला चांगलीच मिरची झोंबली. मग काय भाजप ‘आयटी’ सेलचे प्रभारी असलेल्या गजारिया यांना लागलीच ‘सायबर सेल’ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण, मुळात ‘मराठी राबडीदेवी’ या शब्दाचा इतका राग का यावा? कारण, या ट्विटमध्ये कुठल्याही असंवैधानिक शब्दांचा वापर केलेला नाही, ना कुठले आरोप! विशेष म्हणजे, राबडीदेवी या राजदचे लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री. त्यामुळे शिवसेनेला नेमकी ही अप्रत्यक्ष तुलना का बरं इतकी खुपली? खरंतर शिवसेनेच्या नेत्यांनी, मुखपत्राने किंवा साध्या कार्यकर्त्यानेही कितीही खालच्या स्तरावर जाऊन टीका-टिप्पणी केली की ती ठरते ‘ठाकरी भाषा’, ‘शिवराळ भाषा.’ म्हणूनच संजय राऊतांनी अभिनेत्री कंगना रानावतला चक्क ‘हरामखोर’ म्हणत नंतर त्याचा अर्थ ‘नॉटी’ होतो, असे म्हणत निर्लज्जपणे सारवासारव केली. मग राऊत यांची वक्तव्ये म्हणजे ‘शिवसेना स्टाईल’ आणि दुसर्‍याची टीका म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य. ही कुणीकडचा न्याय? दररोज ‘सामना’तून भाजपविरोधी अश्लाघ्य शब्दांत गरळ ओकली जाते. मोदी, अमित शाह यांची तुलना तर थेट अफजलखानाशी करणारीही हीच शिवसेना होती! त्याचे काय? काल तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण वृत्तवाहिनीवर ‘डान्सिंग डॉल’ म्हणाल्या. मात्र, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला हा महिलांचा अपमान वाटणार नाही. बाळासाहेब ठाकरे तर आपल्या व्यंगचित्रातून आणि भाषणांतूनही तत्कालीन सरकारवर जोरदार फटकारे ओढत. मात्र, त्यावरुन कोणी बाळासाहेबांना एकाएकी अटक केली नव्हती. पण, त्यांचेच सुपुत्र असलेल्या उद्धव आणि नातू आदित्य ठाकरे यांना विनोदांचे एवढे वावडे का, असा प्रश्नही सहज उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी ‘देशात प्रश्न विचारणे गुन्हा समजला जातो,’ असे म्हटले. मात्र, आता महाराष्ट्रात ठाकरेंविषयी उपहासात्मक लिहिणे, बोलणे हा आता गंभीर गुन्हाच समजला जातो. माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेली मारहाणही याच पठडीतली होती. तेव्हा, शिवसेनेने ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं’ ही अरेरावी थांबवावी आणि सत्तेच्या माजातून चालवलेला हा गैरवापर भविष्यात आपल्यावरही उलटू शकतो, याचे भान ठेवावे.

या अबूचं करायचं काय?



आपल्या कुप्रसिद्ध वाणीने नेहमीच गरळ ओकणार्‍या अबू आझमींनी आता समाजवादी पक्षाचे काम करण्याबरोबरच एक नवीन समाजोपयोगी उद्योग हाती घेतलेला दिसतो. तो म्हणजे लोकांचे जन्मप्रमाणपत्र गोळा करण्याचा! असे म्हणण्याचे कारण म्हणजे, “तुमच्या पूर्वजांचा जन्म कुठे झाला होता, मोदी... तुमच्या आईचे प्रमाणपत्र दाखवा, ती कुठे जन्माला आली आहे,” अशी गरळ नुकतीच आझमी यांनी उत्तर प्रदेशातील उन्नावच्या गंज मुरादाबादमध्ये ओकली. सपा नेत्या जुही सिंहयांच्यासोबत प्रचार करताना ‘एनआरसी’च्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रमाणपत्र मागण्याच्या त्यांच्या या नव्या उद्योगाची घोषणा केली. आझमी इथवर थांबले नाही बरं का... ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’मुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकतेला धोका निर्माण होईल, असे सांगत भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकूणच आझमी नेमके प्रचार करायला गेले होते की, दंगल भडकवायला, असा प्रश्न निर्माण व्हायला निश्चित जागा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यापूर्वी ‘नटवरलाल’ म्हटले होते. असदुद्दीन ओवेसींनाही त्यांनी ‘वोटकटवा’ अशी उपाधी दिली होती, मुरादाबामध्ये मटण व्यावसायिक नासिर कुरैशी यांनी चक्क नोटांचा हार त्यांना घातला. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर आझमींचा चांगलाच जळफळाट झाला. कोरोना काळातही महाशयांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करण्याची हौस पुरवून घेतली. तसेच लग्नासाठी मुलींचे वय 18 वरून 21 करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्ऩशील असताना त्यावरही “ज्यांना मुलं नाहीत त्यांनी हा कायदा आणला,” अशा शब्दांत आझमी यथेच्छ बरळले. विशेष म्हणजे, महाशय सध्या सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदारदेखील आहेत. नरेंद्र मोदी यांच्या आईच्या जन्माचे प्रमाणपत्र मागणार्‍या आझमींवर आता ठाकरे सरकार काय कारवाई करणार, हा प्रश्न तसा गुलदस्त्यातच! कारण, भाजप आणि मोदी म्हटलं की, महाविकास आघाडीच्या सर्वांनाच वावडं असेल याविषयी शंका नाही. आझमी साहेब मुस्लिमांसाठी काम करण्याऐवजी तसेच त्यांच्या उत्थानासाठी काम करायचे सोडून थेट देशाच्या पंतप्रधानांकडे उठसूट प्रमाणपत्र मागत बसायचा, हा नवा उद्योग तत्काळ थांबवा; अन्यथा आमदारकीऐवजी तुम्हाला याच उद्योगात तुमचं भविष्य शोधावं लागेल. तशी वेळ येऊ नये म्हणजे बघा!





@@AUTHORINFO_V1@@