जरासा संशय आला तरी परकीय युद्धनौकांवर थेट गोळीबाराची परवानगी देणारा एक कायदा चीनने पारित केला आहे. फिलिपिन्सने चीनच्या या निर्णयाचा औपचारिक राजनयिक विरोध केलाच. पण, ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र फिलिपिन्ससाठी चीनविरोधातील रणांगणात अभेद्य शस्त्राचे काम करेल आणि यामुळेच तो देश त्याच्या खरेदीसाठी उत्सुक आहे. सोबतच व्हिएतनामही ‘ब्रह्मोस’साठी उत्सुक आहे.
जगातील सर्वोत्कृष्ट ‘सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल’ म्हणून भारत आणि रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे नाव घेतले जाते. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र ध्वनिपेक्षा तिप्पट वेगाने हल्ला करत असून, त्याची मारक क्षमता २९० किमीपर्यंत आहे. केवळ सर्वाधिक वेगच नव्हे, तर रडारच्या पकडीत न येणे, हेदेखील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र जमीन, हवा, समुद्र आणि पाण्याच्या आतही डागता येते. अमेरिकेच्या ‘हारपून’ आणि चीनच्या ‘डॉगफेंग’ आंतरखंडीय क्षेपणास्त्रापेक्षाही ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचा दर्जा वरचा आहे. त्याचमुळे चीनच्या विस्तारवादी धोरणापासून त्रासलेले आणि इतरही अनेक देश सर्वाधिक वेगवान व मारक क्षमतेने परिपूर्ण ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल’च्या खरेदीत रस दाखवत आहेत. त्यात चीनच्या आजूबाजूच्या फिलिपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशियासह संयुक्त अरब अमिराती, अर्जेंटीना, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होतो. या सर्वच देशांत ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदीची चढाओढ सुरु झाली असून भारतही मागणी पुरवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे.
चीन शेजारील देशांना त्रास देतानाच भारताविरोधातही कट-कारस्थाने रचत असतो. त्या पार्श्वभूमीवर भारतही आपल्या मुत्सद्देगिरीच्या, मैत्रीपूर्ण आणि विश्वासपूर्ण संबंधांच्या माध्यमातून चीनला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. त्या मालिकेंतर्गतच दक्षिण-पूर्व आशियाई देशांना ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र निर्यातीचा मुद्दा येतो. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार फिलिपिन्स लवकरच ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स’ची खरेदी करु शकतो. कारण, फिलिपिन्सने डिसेंबरमध्ये जहाजभेदी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी १.३ अब्ज पेसोस (फिलिपिन्सचे चलन) आणि १.५३५ अब्ज पेसोस खर्चाच्या दोन स्पेशल अॅलॉटमेंट रिलीज ऑर्डर जारी केल्या आहेत. तर, “भारत आणि फिलिपिन्समध्ये अनेक शस्त्रास्त्र प्रणालींवर चर्चा सुरु आहे. दौरा निश्चित झाल्यानंतर संरक्षण पुरवठ्याचे काम पाहणारी संयुक्त समिती यावरील चर्चेसाठी बैठक घेईल,” असे फिलिपिन्समधील भारताचे राजदूत जयदीप मजूमदार म्हणाले आहेत. तत्पूर्वी भारताने संरक्षण साहित्य खरेदीसाठी फिलिपिन्सला १०० दशलक्ष डॉलर्सच्या क्रेडिट लाईनचा प्रस्ताव दिला होता. पण फिलिपिन्सने स्वखर्चानेच ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल’ खरेदीचा विचार केला. तसेच फिलिपिन्सने भारताबरोबर ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल’ आणि अन्य भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या संभाव्य खरेदीसाठी एक कार्यान्वयन करारही केला होता. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र दक्षिण चीन समुद्रात चिनी अतिक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी फिलिपिन्सच्या लष्करी ताकदीला अधिक बळकटी देईल. कारण, जरासा संशय आला तरी परकीय युद्धनौकांवर थेट गोळीबार करण्याची परवानगी देणारा एक कायदा चीनने पारित केला आहे. फिलिपिन्सने चीनच्या या निर्णयाचा औपचारिक राजनयिक विरोध केलेला आहेच. पण, ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स’ फिलिपिन्ससाठी चीनविरोधातील रणांगणात अभेद्य शस्त्राचे काम करेल आणि यामुळेच तो देश त्याच्या खरेदीसाठी उत्सुक आहे.
फिलिपिन्सबरोबरच व्हिएतनामही चीनच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असून, त्यासाठीच ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसालईल्स’ची खरेदी करु इच्छितो. कारण, चीनची अन्य देशांची भूमी हडपण्याची लालसा दिवसेंदिवस वाढतच असून, व्हिएतनामही त्यानेच त्रस्त आहे. म्हणूनच तो देश भारताशी दृढ संबंध प्रस्थापित करुन चीनचा सामना करु पाहात आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चालू महिन्यातच भारत आणि व्हिएतनाममधील राजनयिक संबंधांच्या सुवर्णजयंती उत्सवाला उपस्थित राहाण्यासाठी हो ची मिन्हला जाऊ शकतात. त्यावेळी संरक्षण निर्यात, संरक्षण साहित्याचे प्रशिक्षण आणि देखभालीसह संयुक्त सहकार्य हे राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यातील प्रमुख मुद्दे असू शकतात. दरम्यान, भारताने नौदल साहित्याच्या खरेदीसाठी व्हिएतनामला १०० दशलक्ष डॉलर्सचे कर्जदेखील दिलेले आहे. सोबतच भारत व्हिएतनामच्या लष्करातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असून, निवडक संरक्षण साहित्याच्या देखभालीतही मदत करत आहे. भारत आणि व्हिएतनाम प्रदीर्घ काळापासून रशियाने निर्मिलेल्या संरक्षण साहित्याचा वापर करत आलेत. कदाचित याचमुळे व्हिएतनाम भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स’च्या खरेदीत रस दाखवत आहे. अशाप्रकारे दोन्ही देशांच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदीने त्यांचे स्वतःचे तर संरक्षण होईलच. पण, भारतालाही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर चीनच्या शेजारचे, दक्षिण चीन समुद्रातील देशांचे सहकार्य उपलब्ध होईल.
दरम्यान, भारत स्वातंत्र्यापासूनच अपवाद वगळता सारेच संरक्षण विषयक साहित्य परदेशातून आयात करत असे. भारताच्या संरक्षण साहित्यापैकी ६५ ते ७० टक्के आयातीत वस्तू असत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पदभार हाती घेताच संरक्षण साहित्याच्या देशांतर्गत निर्मितीवर भर दिला. ‘मेक इन इंडिया’पासून ते ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानापर्यंत नवनव्या योजना त्यासाठी वेळोवेळी कार्यान्वित करण्यात आल्या. परिणामी, आता ६५ टक्के संरक्षण साहित्याची निर्मिती देशातच करण्यात येते. तर भारत जगातील ७० देशांना संरक्षण साहित्याची निर्यातही करत आहे. आता फिलिपिन्ससह व्हिएतनामबरोबर ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स’च्या निर्यातीच्या करारावर शिक्कामोर्तब झाल्यास एका प्रमुख निर्यातकाच्या रुपात भारत दक्षिण आशियात पाय रोवून उभा ठाकेल, हे नक्की. भारताने २०२५ पर्यंत पाच अब्ज डॉलर्सच्या संरक्षण साहित्य निर्यातीचे लक्ष्य ठेवले असून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र त्याचाच पाया ठरेल. विशेष म्हणजे, गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) माध्यमातून उभारल्या जात असलेल्या या निर्मिती केंद्रातून दरवर्षी ८० ते १०० ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांचे उत्पादन होईल. त्यातून ‘मेक इन इंडिया-मेक फॉर वर्ल्ड’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती मिळून निर्यातीचे उद्दीष्टही साध्य केले जाईल.