कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लसीकरण मोहिमेत सामील न झालेल्या सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या आलेखाचा विचार करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत आहे. राज्यातील पॉझिटिविटी रेट हे २३.१५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर मृत्यू दर हा १.१८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात एकूण ४०३ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. दोन हजारांहून अधिक बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. १९ हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. ममतांनी राज्यात येणाऱ्या प्रत्येकाची RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे.
पुढील १५ दिवस हे आकडेवारीच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे. सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही. त्याच वयोगटात कोरोनाची लक्षणे आढळण्यास सुरुवात झाली आहे. श्वास घेण्यास अडचणी, कमजोरी, ताप आदी समस्या जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण आहे.