मुंबई : गेले काही दिवस होत असलेल्या टीकेनंतर अखेर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. जेव्हा भारतीय संघाला एका चांगल्या खेळीची गरज होती, तेव्हा या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला चागंल्या स्थितीत पोहचवले. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी १११ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात २६६ धावांचा पल्ला गाठता आला. आता दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान उभे केले आहे.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा अजिंक्य आणि पुजारा यांनी आक्रमक खेळी करत दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. अजिंक्य रहाणेने ७८ चेंडूत ५८ धावा केल्या. तर पुजाराने ६२ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर आपले अर्धशतक साजरे केले. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने यावेळी अजिंक्य आणि पुजारा या दोघांनाही बाद करत भारताला दोन मोठे धक्के दिले. विहारीने यावेळी नाबाद ४० धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकूरची २४ चेंडूत २८ धावांची खेळी वगळता कोणालाही चांगली कामगिरी एकरात आली नाही. आदल्या दिवशी मुंबईच्या लॉर्ड शार्दुल ठाकूरने ७ विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी केली.