फ्रान्समध्ये मिळाला ओमिक्रॉनपेक्षा घातक नवा व्हेरिएंट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2022   
Total Views |

IHIU





पॅरीस : जगभरात तणावाचे कारण ठरलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननंतर आता आणखी एक व्हेरिएंट पसरत आहे. फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांनी आयएचयू (IHU) या विषाणूचा धोका हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे म्हणत प्रसारही वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, B.1.640.2 म्हणजे या IHU व्हेरिएंटमध्ये दावा केला जात आहे की, लसीकरण पूर्ण झालेल्यांना तसेच एकदा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णालाही हा विषाणू शिकार बनवत असल्याचे म्हटले आहे.



डॉक्टरांच्या मते, या विषाणूचे एकूण ४६ म्युटेशन्स असू शकतात. ओमिक्रॉनपेक्षा हे कित्येक पटींनी जास्त आहेत. या नव्या विषाणूचे एकूण १२ रुग्ण मार्सिलिसमध्ये आढळले आहेत. संक्रमित हे आफ्रिकन देश असलेल्या कॅमरून येथून परतले होते. जगभरात आजही ओमिक्रॉन विषाणूचा मोठा धोका आहे, त्यातच आता IHU व्हेरिएंटच्या बातमीमुळे चिंता वाढलेली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. विषाणूबाधित अन्य रुग्ण इतर कुठल्या देशात नाहीत ना याचा तपास आता सुरू केला जात आहे.



तूर्त फ्रान्स वगळता इतर कुठल्याही देशात हा विषाणू आढळलेला नाही. याबद्दल शास्त्रज्ञ एरिक फेगल डिंग यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे. "हा विषाणू ऑमिक्रॉनपेक्षा घातक आहे का ते म्हणता येणार नाही. मात्र, ज्या विषाणूचे म्युटंट जास्त तितकाच धोका अधिक, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे."


‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या आलेखाने अचानक घेतलेली उसळी जगाची फिरती चाके रोखणारी ठरणार आहे. फ्रान्समध्ये गेल्याच आठवड्याच्या अखेरीस लाखभर कोरोना रुग्णांची भर हे याचे ताजे उदाहरण. ‘लॉकडाऊन’मुळे फ्रान्सच्या विमानसेवेवरही परिणाम झाला. तिथे तर पुढील तीन आठवडे निर्बंध कायम राहणार असल्याने याचे जागतिक पडसाद उमटणार आहेत, हे नक्की...


विमानसेवा रद्द होण्याच्या आकडेवारीवर लक्ष घातल्यास जगभरात एकूण 11 हजार, 500 विमाने रद्द झाली. ज्यात एकूण तीन हजार फेर्‍या सोमवारी, तर 1100 फेर्‍या मंगळवारी रद्द झाल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या अगदी काही दिवस आधी आलेल्या या संकटाने जगापुढे पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परदेशात नवे वर्ष आणि नाताळ साजरा करण्याचा असलेला ‘ट्रेंड’ यंदाही बासनात गुंडाळला गेल्याने सुट्ट्यांनिमित्त बाहेर पडणार्‍या मोठ्या वर्गाला याचा फटका बसणार आहे.


निर्बंधांमध्ये प्रामुख्याने बार, हॉटेल्स इत्यादींवरही निर्बंध आणि नियमावली लागू झाली आहे. ऑस्ट्रेलियातील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हा ‘ओमिक्रॉन’मुळे झाल्याचे निदान आहे. हा व्यक्ती पूर्णपणे लसवंत होता. मात्र, इतर आजारांनीही ग्रासल्याने हे प्रकरण गंभीर बनले. यानंतर धास्तावलेल्या प्रशासनाने नियमावली कठोर केली. फ्रान्स,ऑस्ट्रेलियानंतर युरोपातील परिस्थितीही काही सामान्य नाही.




‘ओमिक्रॉन’ची धास्ती तिथेही कायम आहे. युरोप हा सर्वाधिक प्रभावित मानला जात असल्याने तिथले उद्योगधंदे, भांडवली बाजार, अर्थव्यवस्था आदींवर याचे संकट घोंगावत आहे. सर्वात जास्त मृत्यूही युरोपियन देशातच आहेत. जर्मनीही कोरोना आलेखात मागे नाही. निर्बंध लावल्यानंतर प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी काहींनी निर्बंधांविरोधात मोर्चाच काढला. पोलिसांना या आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करावा लागला. त्यात कित्येक जखमीही झाले. दुसरीकडे अमेरिकेलाही एक वेगळी चिंता सतावत आहे. आता ‘डेल्टा’ नव्हे, इथेही ‘ओमिक्रॉन’ विषाणूने जोर धरला आहे.



सरासरी कोरोना रुग्ण वाढण्याच्या प्रक्रियेत 65 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांहून अधिक होत चालली आहे. रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या दहा टक्के वाढ झाली आहे. म्हणजे दररोज सात हजार रुग्ण हे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. आठवडाभरात मृत्यूची सरासरी आकडेवारीही तीन टक्क्यांनी वाढली आहे. स्वतःला ‘महासत्ता’ म्हणविणार्‍या अमेरिकेला रुग्णालयांतील व्यवस्था हाताळण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना पाचारण करावे लागत आहे.


चिंतेची बाब म्हणजे, कोरोना आकडेवारीत आता लहान मुलांची संख्या वाढत आहे. हे सर्व कमी की, काय म्हणून इटलीत कोरोनाच्या आकडेवारीने चिंतेत आणखी भर घातली आहे. रुग्णांचा सरासरी आकडा 38 हजारांहून अधिक आहे. ही संख्या आणखीन वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत इटलीमध्ये घातलेल्या मृत्यूचे थैमान आजही जग विसरलेले नाही. प्रशासनाला सहकार्य न करणे, लसीकरणासाठी आग्रह न धरणे, निर्बंधातील शिथिलता आणि बेफिकिरीमुळे पुन्हा एकदा जग ‘लॉकडाऊन’च्या दरीत लोटले जाईल की काय, अशी भीती आहे.




या संकटाचा दूरगामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल, भारताशी संलग्न असलेल्या उद्योगधंद्यांवर, नोकर्‍यांवर आणि आर्थिक घडामोडींवरही होणार, हे वेगळे सांगायला नको. चीनहून उगम झालेल्या या विषाणूचा थेट संबंध आरोग्यासह अर्थचक्राशी असल्याने उलटे परिणाम प्रत्येक गोष्टीवर होताना दिसू लागतात. कोरोनाशी लढा देण्यासाठी आजही कमतरता दिसते ती जागतिक नेतृत्वाची. त्यात आजही तफावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशार्‍यांनंतरही स्वतःला ‘प्रगत’ म्हणवून घेणार्‍या राष्ट्रांमध्येही लसीकरणाचा वेग मंदावलेला असेल, तर याची जबाबदारी कुणाची असेल?





दुसरीकडे लसविक्रीसाठी कंपन्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ, बाजारपेठांवर कब्जा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सुरू असलेल्या स्पर्धेत जीव हा माणसाचाच जाणार आहे, हे विसरुन चालणार नाही. विकसित देशांच्या या चुकांचे परिणाम उद्या विकसनशील आणि तुलनेने गरीब देशांना भोगावे लागणार आहेत. अमेरिकेतील सत्तापालटानंतर ज्याप्रकारे जगाची जी अपेक्षा होती, ती पूर्ण झालेली नाही. अफगाणिस्तानच्या माघारीच्या रुपाने ही बाब दिसून आली. ही बाब वेळीच सुधारणा न झाल्यास ‘ओमिक्रॉन’च्या रुपाने आलेले निर्बंध आणि आरोग्याची हानी ही न भरून निघणारी ठरेल!




@@AUTHORINFO_V1@@