
'डेल्टा’, ‘ओमिक्रॉन’ यांसारख्या कोरोनाच्या विविध विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगभरातील अनेक देशांवर पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ लावण्याची वेळ आली. मात्र, या संकटाच्या परिस्थितीवर मात करत अनेक देशांनी विविध क्रीडास्पर्धा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संकटजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील जरी असले तरी क्रिकेटविश्वाला मात्र सध्या एक वेगळीच चिंता भेडसावत आहे. गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेले कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाचा प्रश्न दिवसेंदिवस सध्या आणखीन गंभीर बनत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार क्विंटन डी कॉकसारख्या तरुण तडफदार खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. अवघ्या २९व्या वर्षी या खेळाडूने यापुढे आपण कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे जाहीर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने जाहीर केले असले, तरी हे कारण न पटण्यासारखे असल्याचे अनेक क्रिकेट समिक्षकांचे म्हणणे आहे. कारण, खेळाडूंना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी प्रत्येक खेळाडूला संबंधित देशाच्या बोर्डांकडून टप्प्याटप्यांनी विविध मालिकांदरम्यान विश्रांती दिली जाते. याशिवाय लग्न, शारीरिक दुखापत, पालकत्व रजा यांसह अन्य कारणांसाठीही खेळाडूंना विश्रांती देण्यात येते. संघातील प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या गरजेनुसार बोर्डाकडून विश्रांतीसाठी वेळ देण्यात येतो. त्यामुळे या कारणास्तव निवृत्ती पत्करण्याचा क्विंटन डी कॉकचा निर्णय न पटण्यासारखा असल्याचे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. केवळ क्विंटन डी कॉकच नव्हे तर, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या फळीतील काही खेळाडूंनी अलीकडच्या काळात अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस आदींसारख्या खेळाडूंनीही अचानकपणे निवृत्ती स्वीकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. केवळ आफ्रिकेतीलच नव्हे, तर अनेक देशांतील खेळाडूंनी तारुण्यातच कसोटी क्रिकेट खेळण्यास नापसंती दर्शविण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढीस लागले आहे. त्यामुळे सध्या कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
लक्ष देण्याची वेळ
क्रिकेटविश्वात आधीच्या काळात वरिष्ठ खेळाडू जेव्हा निवृत्ती पत्करत असे, तेव्हा आधी तो एकदिवसीय प्रकारातून आणि मग कसोटी क्रिकेटच्या प्रकारातून निरोप घेत असे. अनेक वर्षांपासून क्रिकेट विश्वात ही परंपरा कायम होती. अगदी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही निवृत्ती पत्करताना वेस्ट इंडिजविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळतच निरोप घेतला होता. अंतिमपर्यंत कसोटी क्रिकेट खेळण्यासच सर्व खेळाडू प्राधान्य द्यायचे. परंतु, सध्याच्या काळात अनेक तरुण खेळाडू कसोटी क्रिकेटचे सामने खेळण्यास टाळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कसोटी सामन्यांच्या तुलनेत ते ‘टी-२०’ आणि एकदिवसीय सामने खेळण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. मात्र, कसोटी सामने खेळण्याची वेळ आल्यास ते थेट या खेळाच्या प्रकारातूनच निवृत्ती पत्करत असल्याची अनेक उदाहरणे क्रिकेटमध्ये समोर आली आहेत. खेळाडूंचे हे वागणे कसोटी क्रिकेटच्या भवितव्यासाठी योग्य नाही. कसोटी क्रिकेटचे भवितव्य अधांतरी ढकलण्यासारखे हे आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे. कसोटी क्रिकेट म्हणजे खेळाडूंच्या संयमाची परीक्षा असते. पाच दिवसांपर्यंत चालणार्या या प्रकारात संयमाने क्रिकेट खेळणार्या खेळाडूंनाच यश मिळते. फलंदाज असो किंवा गोलंदाज लाल चेंडूसमोर उत्तम प्रदर्शन करणे, हे सर्वांसमोर एक मोठे आव्हानच असते. त्यामुळे कसोटी क्रिकेट म्हणजे एक प्रकारे अग्निपरीक्षाच असे क्रिकेटच्या जाणकारांचे म्हणणे आहे. अनेकवेळापर्यंत मैदानावर टिकून राहणे, यात फलंदाजांचा कस लागतो, सतर मैदानावर अनेकवेळापर्यंत टिकून राहाण्याच्या उद्देशाने फलंदाजी करणार्यास विविध क्लृप्त्या लढवून तंबूत माघारी पाठविण्यात गोलंदाजांचा कस लागतो. यासाठी दोन्ही संघांकडून आखण्यात येणारी रणनीती आणि पाच दिवसांपर्यंत चालणारा सामना, यातच खरी रंगत असते. अगदी अखेरच्या दिवसापर्यंत सामन्याचा निर्णय लागत नाही. सामना अनिर्णित राहतो आणि बरोबरीत सुटतो. यातच खरी रंगत असते. कसोटी क्रिकेटच्या प्रकारामुळेच परिपक्वता येते. त्यामुळे क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या प्रकारास अनन्यसाधारण महत्त्व असून, याचे महत्त्व टिकून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष देण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- रामचंद्र नाईक