कथा यशाची...सुरज तायवाडेंची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2022   
Total Views |

masne 2
बॅण्ड वाजवण्याच्या कामाला सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देणारे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतः सोबत अनेकांचे आयुष्य घडवणार्‍या नागपूरच्या सुरज तायवाडे यांची कथा...
 
 
 
रे, याचा बाप मैतीच्या पुढं बॅण्ड वाजवतो,” असे म्हणून सुरजचे वर्गमित्र त्याला चिडवू लागले. अपमान, दुःख सुरज यांच्या डोळ्यात उतरले. पण, त्याही वयात त्यांना वाटले की, बॅण्ड वाजवणे म्हणजे काय वाईट आहे? नाही तर गरिबी आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती वाईट आहे. इथूनच नागपूरच्या गौतमनगर या मातंग वस्तीतल्या सुरज महोदवराव तायवाडे नावाच्या मुलाची कथा सुरू होते. ही परिस्थिती बदलायची, हा विचार पुढे सुरज यांनी प्रत्यक्षात कृतीत आणला. लहानपण अत्यंत हलाखीत गेलेल्या सुरज तायवाडे, ज्यांचे वडील कुणाच्या तरी बॅण्डपथकात बॅण्ड वाजवायला जायचे, त्या सुरज यांची नागपूरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून स्वत:ची ‘सुरज बॅण्ड पार्टी’ आहे. या बॅण्ड पथकात अत्याधुनिक वादन साहित्य आहे. शहरातील मोठमोठे सोहळे, विवाह या ‘सुरज बॅण्ड पार्टी’शिवाय होत नाहीत. इतकेच नव्हे, तर सुरज यांचे नागपूर शहरात उच्चभू्र वस्तीत ‘सुरज म्युझिकल पॉईंट’ नावाचे पांरपरिक आणि आधुनिक वादन साहित्य विक्रीचे दुकानही आहे.



 
व्यवसाय-उदिम करणे त्यातही आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन त्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणे, हे काम वेगळ्या वाटेचे. सहसा या वाटेने जायला कुणी शहाणासुरता माणूस धजावत नाही. मात्र, सुरज महोदव तायवाडे यांनी हे धाडस केले. इतकेच नव्हे, तर बॅण्ड पथकात मातंग समाजातील व्यक्तींना संधी दिली. २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या बॅॅण्ड पथकात आज ५० जण सहभागी आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबात शिक्षण आणि आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी सुरज कटाक्षाने लक्ष देतात. इतकेच नव्हे, तर समाजात शिक्षणाबद्दल जागृती व्हावी, तरूणांनी कष्टाने, जिद्दीने आपले आयुष्य घडवावे, यासाठी सुरज समाजात जागृती करतात, मदत करतात. समाजात त्यांना मानही आहे, तसेच समाजाच्या उत्थानासाठी काम करतात, म्हणूनही समाज त्यांना साथही देतो. सुरज म्हणतात, ”युवकांनी स्वतःसोबत समाजातील इतरांचेही कल्याण होईल किंवा इतरांनाही जगणे सुलभ होईल, असे स्वत:चे अस्तित्व घडवायला हवे. त्यासाठी माझी धडपड आहे.” सुरज यांचे म्हणणे खरे आहे. कारण, ‘सुरज बॅॅण्ड पथक’ किंवा ‘सुरज म्युझिकल पॉईंट’ यासाठी वेळ दिल्यानंतर सुरज पूर्णवेळ सामाजिक कार्याला देतात.



 
सुरज यांच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. सुरज यांच्या जीवनावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रभाव. लहानपणी सुरज मित्रांकडून अण्णाभाऊ साठेंच्या कादंबर्‍या वाचायला न्यायचे. त्यांच्या कादंबरीतला जिद्दी, समाजशील आणि प्रेमळ, दयाळू, मायाळू, ध्येयशील नायक हा कायमच सुरज यांना प्रेरणा देत राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव. त्यामुळेच आयुष्यात आणि आजुबाजूच्या समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनांचा ते संवेदनशीलतेने विचार करत. एक प्रसंग असाच.आजोबा वारले. त्यांचा अंतिम संस्कार करायला घरात एक रूपया नव्हता. आजुबाजूवाल्यांकडून पैसे घेऊन अंतिम संस्काराची तयारी झाली. हा प्रसंग त्यावेळी लहान असलेल्या सुरजच्या मनावर कायमच वेदना देऊन गेला. आपली आर्थिक परिस्थिती सुधरवायचीच. त्यासाठी शिकायचे आणि काहीतरी बनायचे, हा निश्चय सुरज यांनी केला. त्यावेळी नागपूरच्या त्या गरीब वस्त्यांमध्ये दारूच्या व्यसनांचा विळखा. सुरज यांचे वडील महादेवही त्यातून सुटले नव्हतेच. त्यांची पत्नी लीलाबाई अत्यंत स्वाभिमानी आणि कष्टाळू स्त्री. ती मुलांना म्हणजे सुरज आणि त्यांच्या बहिणीला सांगे ”बघा बरं व्यसनांनी कशी घरादाराची वाट लागते. घरदार रोटीला पारखं होतं. तुम्ही कधी दारूला शिवू नका.” तसे महादेवही इतरवेळी मुलाबाळांच्या पाठिशी खंबीर राहात. मुलांनी शिकावे असे त्यांना वाटे. सुरज यांना घराची समाजाची ‘नाही रे’ परिस्थिती कळत होती. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. पण, दहावीला असताना घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. महादेव यांना आजारपणामुळे काम करण्यास कठीण जाऊ लागले.





त्यामुळे दहावीनंतर लगेच नोकरी लागेल म्हणून सुरज यांनी ‘इलेक्ट्रॉनिक’चा कोर्स शिकायला सुरुवात केली. दिवसा कोर्स आणि संध्याकाळी दुकानात नोकरी. इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतानाच त्यांना जाणवले की, बॅण्ड पथकात इलेक्ट्रॉनिकची आधुनिक वादनाचाही वापर होतो. आपण अशी इलेक्ट्रॉनिक वादन असलेला बॅॅण्ड पार्टी काढायची, असा विचार त्यांच्या मनात आला. पण, आईवडिलांनी विरोध केला. मुलाने शिकून-सावरून आपल्या बापजाद्यांचाच काम करायचं? मग शिकला कशाला, असा त्यांचा रोकडा सवाल! त्यावेळी सुरज यांनी आईवडिलांना समजावले की, ”हे काही जुन्या बॅण्ड पथकासारखे नाही, तसेच यात आपल्याच आजुबाजूच्या शेजारच्या तरूण मुलांना काम मिळेल, चांगले पैसेही मिळतील. हा चांगला प्रतिष्ठित बिझनेस होईल.” त्यावेळी मुलाची इच्छा म्हणून अनिच्छेने दोघांनी होकार दिला. या व्यवसायात एक-दोन वर्ष तर संघर्षातच गेले. पण, अशावेळी महादेव मुलांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. ‘आता माघार घेऊ नकोस,’ म्हणू लागले. ”आपण लहुजी वस्तादाची अवलाद, जे करू त्यात माघार नाही!” त्यामुळे सुरज यांनी नेटाने प्रयत्न सुरू ठेवले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नागपूरमध्ये काही प्रतिष्ठित बॅण्ड पथकांमध्ये आज ‘सुरज बॅण्ड पथक’ आहे आणि समाजासाठी काही तरी करणारा प्रयोगशील व्यक्ती म्हणून सुरज तायवाडे यांचे नाव आहे. प्रवाहाविरोधात जाऊनही केवळ नि:स्पृह ध्येय, तळमळ आणि कष्ट यामुळे यश मिळतेच, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरज महादेव तायवाडे होत. सुरज यांचे कर्तृत्व समाजाला कायमच प्रेरणादायी आहे.




 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@