मुंबई - राज्यात काही दिवसांपासून थंडीने उसंत घेतली होती. मात्र, येत्या दोन ते तीन दिवासांमध्ये राज्यातील किमान तापमानामध्ये घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खास करुन नाशिक,पुणे, जळगाव आणि मुंबईमध्ये थंडीची लाट पुन्हा येणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळावेळी राज्यातील किनारपट्टीभागातील किमान तापमानात घट झाली होती. त्यानंतर किमान तापमान स्थिर होते. मात्र, आता पुन्हा या तापमानात कमालीची घट होणार आहे. तशी माहिती हवामान विभागाने टि्व्ट करुन दिली आहे. नाशिक, पुणे, जळगाव आणि मुंबईमध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये किमान तापमानात घट होणारी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ४, ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी नाशिक, पुणे, जळगाव आणि मुंबईतील किमान तापमानात घट होईल. यावेळी पुण्याचे किमान तापमानात ११ अंश सेल्सिअसपर्यंत घट होईल. तर नाशिकमध्ये ६ अंश, जळगावमध्ये ७ अंश आणि मुंबईमध्ये १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद होईल.