नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ ) जगाच्या नकाशावर जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश पाकिस्तान आणि चीनचा भाग म्हणून दाखवत आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शंतनू सेन यांनी जगाच्या नकाशाचे स्क्रीनशॉट टाकून हा खुलासा केला आहे. त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
शंतनू सेन यांनी त्यांच्या पत्रात पंतप्रधान मोदींना सांगितले की, "जेव्हा मी डब्ल्यूएचओची कोविडची साइट उघडली, तेव्हा मला भारताचा एक नकाशा दिसला ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा रंग वेगळा होता आणि त्याचा एक छोटासा भाग देखील वेगळ्या रंगात होता. जेव्हा मी झूम इन केले आणि त्यावर क्लिक केले तेव्हा पाकिस्तान आणि चीनची कोविड आकडेवारी दिसली.
सेन यांनी माहिती दिली की, निळ्या भागावर क्लिक केल्यावर भारताचा डेटा नकाशात आला, परंतु वेगळ्या भागावर क्लिक केल्यावर ते पाकिस्तानचा कोविड डेटा दाखवत होते. तृणमूल खासदार म्हणतात की, अरुणाचल प्रदेशचा काही भाग भारताव्यतिरिक्त चीनचा भाग म्हणूनही दाखवण्यात आला आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगून सेन यांनी भारत सरकारला याबाबत हस्तक्षेप करण्यास सांगितले.
जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशावरून गायब करण्याचे काम ट्विटर आणि गुगलनेही केले आहे
२०२१ मध्ये ट्विटरने जम्मू-काश्मीरला भारताच्या नकाशावरून हटवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय २०२० मध्ये लेहला ट्विटरने चीनचा भाग म्हणून दाखवले होते. ट्विटर व्यतिरिक्त गुगलने आपल्या 'ट्रेंड्स' विभागात भारताचा चुकीचा नकाशा दाखवला होता, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचे काही भाग गायब होते.
यानंतर सोशल मीडियावर लोकांनी गुगलने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल आक्षेप घेतला आणि लवकरात लवकर नकाशा सुधारण्याचा सल्ला दिला. या काळात भारत सरकारने टाकलेला नकाशाही लोकांनी शेअर केला. भारत सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर, दोन्हीचा स्पष्ट नकाशा जारी करण्यात आला, तरीही गुगल आणि ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म त्यांना भारताचा भाग म्हणून दाखवत नाहीत.