नवी दिल्ली : विविध राज्यांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निवडणूक आयोगाने निवडणुकांदरम्यान होणारे रोड शोज आणि रॅलींवर बंदी घातली होती. ही बंदी ३१ जानेवारी पर्यंत घालण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात १००० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रॅलींस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे.
निवडणूक प्रचाराचे नवीन नियम
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी आरोग्य साचीवांशी चर्चा केल्यानंतर नवीन नियम जाहीर केले. सभागृहात होणाऱ्या सभांना आता ५०० जणांची मर्यादा घातली आहे. तसेच घरोघरी प्रचारासाठी २० जणांची मर्यादा केली आहे. यापूर्वी ८ जानेवारीला पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर निवडणूक प्रचारावर आयोगाने २२ जानेवारी पर्यंत काही निर्बंध घातले होते. नंतर त्याला ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु सध्या त्यात अजून मुदतवाढ देताना काहीशी सूट देण्यात आली आहे.
७ टप्प्यांत होणार निवडणुका : १० मार्चला जाहीर होणार निकाल
उत्तरप्रदेश मध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. पंजाब, उत्तरखंड आणि गोवा ह्या राज्यांत १४ फेब्रुवारी ह्या एकाच दिवशी मतदान होणार आहे. मणिपूर मध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी मतदान होणार असून या सर्व राज्यांच्या मतदानाचे निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत.
निर्बंधाच्या आधीच उत्तर प्रदेश मध्ये रॅलीज
निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील २-३ रोड शोज, रॅलीज झाल्या होत्या. उत्तर प्रदेश मधील ४०३ पैकी २७५ जागापर्यंत हे तिघेही पोचले आहेत.