हिंदुत्व : विचारून सांगतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2022   
Total Views |

Sanjay Raut1
 
आमच्या हिंदुत्वाला घाबरूनच, तर भाजपने उत्तर प्रदेशातील आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले. मी काहीही म्हणालो की, तुम्ही जाम विनोदाच्या अंगाने घेता राव. का बरं? मी काही विनोदवीर आहे का? मी राज्यात सत्ता स्थापन केली. मीच तो लिलावती हॉस्पिटलमध्ये बसून हृदयाची शस्त्रक्रिया केल्यावर एका दिवसात कामधद्यांला लागलो. ‘आपून की पॉवर हैं।’ काय म्हणता, ‘पवार हैं।’ नाही... नाही... पवारांचा असा एकेरी उल्लेख करता. काय आमचा तख्त पालट करायचा विचार आहे का तुमचा? मेरा नाम तो सुनाही होगा? नका... नका... काहीच नका म्हणू. मला माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेने सध्या मला खूप नावं दिली आहेत. पण माझ्याशिवाय आणि आमच्या साहेबांशिवाय आणि साहेबांच्या बारामतीच्या काकांशिवाय आणि काकांच्या दिल्लीतल्या मॅडमशिवाय आणि दिल्लीतल्या मॅडमच्या राजकुमारांशिवाय आणि राजकुमारांच्या राजकुमारी बहिणीशिवाय आज महाराष्ट्राला तारणारं कुणी आहे का? इथे महाराष्ट्रातला शेतकरी मरत होता. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने ‘वाईन’च्या खपासाठी निर्णय घेतला ना? ‘वाईन’ ठेवल्या ना किराणामालाच्या दुकानात विक्रीला. लोक ताज्या फळांची चिंता करतात. आम्ही सडलेल्या फळांचीसुद्धा चिंता केली, पण ‘नावडतीचे मीठच अळणी.’ यावरून पण लोक आम्हाला काहीबाही बोलतात. ‘पण लक्षात कोण घेतो?’ अहो, हरीभाऊंच्या कादंबरीचं नाव घेतले. कारण, मी कार्यकारी संपादक आहे. साहित्याचा अभ्यास असावा लागतो बाबांनो! नसला तरीसुद्धा अधूनमधून अशी नावं घेऊन अभ्यास आहे, असे दाखवावे लागते. जाऊ दे! तर काय झाले की, उत्तर प्रदेशात ते भाजपवाले आमच्या हिंदुत्वाला घाबरले. काय म्हणता, आमचे टिपू सुलतानचे हिंदुत्व आहे? काय म्हणता, आमचे ‘लव्ह जिहाद’ला ‘शिव विवाह’ नाव देण्याचे हिंदुत्व आहे? काय म्हणता? बॉम्बस्फोट अपराधी मेमनच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍यांना मुंबईचे पालकमंत्री करण्याचे हिंदुत्व आहे? असू देत. आमचे जे काही आमच्यासाठीचे हे हिंदुत्व आहे, त्याला उत्तर प्रदेशातील भाजप म्हणजे योगी म्हणजे मोदी घाबरले आहेत. समजले का? आता हे कोण म्हणाले की, ‘हर्बल’ वनस्पती आणि ‘वाईन’ याची जबरदस्त ‘किक’ लागली की, उत्तर प्रदेशातच काय, अमेरिकेतसुद्धा आमचाच मुख्यमंत्री होईल. मी काय सत्तेत आहे? थांबा. साहेबांना, काकांना आणि मॅडमना विचारून सांगतो.
 
‘वाईन’ प्या आणि शांत बसा
 
अजूनही मुंबईसारख्या जागतिक शहरात काही भागात पाणी विकत घ्यावे लागते. पाण्याची चोरी होते. पाण्यावरून मार्‍यामार्‍या होतात. मग कशाला हवे ते पाणी? अजित पवारांनी परदेशी लोकांची युक्ती सांगितली की, परदेशात लोक पाण्याऐवजी ‘वाईन’च पितात. गोरगरीब जनतेने ही युक्ती अंमलात आणावी. राज्यातली कष्टकरी जनता परदेशात तर जाऊ शकत नाही. त्यामुळे जनतेला आपण परदेशात आहोत, असा ‘फील’ आणण्यासाठी किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीचा निर्णय दयाळू सरकारने घेतला असावा. राज्यात स्थगिती ‘पॉलिसी’मुळे उद्योगधंदे बंद पडले. नोकर्‍या नाहीत. किराणा दुकानात तांदूळ, डाळ, गहू, बाजरी, ज्वारी, तेल, मीठ, पीठ विकत घेता आले नाही, तर काय होते? इतक्या सगळ्या वस्तू घेण्यापेक्षा ‘वाईन’ घ्या. घरातल्या लहान मुलामुलींचं काय घेऊन बसलात? मात्र, ‘वाईन’ बनवणार्‍या या मोठमोठ्या कंपनीचे संचालक कोण आहेत किंवा या ‘वाईन’ विक्रीमुळे शेतकर्‍यांचा खरंच फायदा होणार आहे का, याबद्दल अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत. बरं! महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून सगळ्यात वाईट काय झाले तर? महाराष्ट्रातल्या जनतेचा आपल्याशक्तीवरचा विश्वास उडाला. राज्यात काहीही झाले, तरी जनतेने स्वत:चे मत मांडणे सोडले. सत्ताधारी ‘वाईन’ कशी चांगली, याची जमेल तशी जाहिरात करत आहेत. विरोधी पक्ष किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीस ठेवण्यास परवाना दिला म्हणून आक्षेप घेत आहेत. या सगळ्यांमध्ये जनता कुठे आहे? जनतेला ‘वाईन’ संदर्भातला निर्णय आवडलेला नाहीच, पण जनतेला वाटते, आपण बोलून राज्य सरकारला काहीही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीपर्यंत जनतेच्या मनातली ही खदखद सध्या पोहोचणार नाहीच. मात्र, मतपेटीच्या माध्यमातूनच हा आवाज या सरकारला ऐकू येणार आहे. पण त्याआधी पुलाखालून बरेच पाणी गेले असेल. राज्यातल्या जनतेची सदसद्विवेकबुद्धी मेली की जीवंत आहे पाहण्याचा, किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्री हा केवळ एक प्रयोग आहे. कोणे एकेकाळी ‘मार्मिक’मध्ये मराठी माणसांच्या व्यथांबद्दल लिहिलेले असे. वाचा आणि शांत बसा. आता राज्यातील तमाम गोरगरीब माणसाने त्यांच्या समस्यांबाबत आवाज न करता काय करावे? ‘वाईन’ प्या आणि शांत बसा.
 
९५९४९६९६३८
 
@@AUTHORINFO_V1@@