पंजाब कॉंग्रेस सरकारचा चालूय 'खेळ' ; पदके जिंकणाऱ्या खेळाडूचा संताप

पंजाब सरकारने फिरवली पाठ ; मंत्र्यांकडून फक्त आश्वासने

    03-Jan-2022
Total Views |

Malika Handa
 
नवी दिल्ली : जागतिक मूक-बधिर बुद्धिबळ स्पर्धेत देशाचे नाव लौकिक करणाऱ्या मुकबधीर बुद्धिबळपटू मलिका हांडाला आजही नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. तिने देशाला जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून दिली आहेत. पण आता तिच्यावर रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करण्याची वेळ आली. तिने ट्विटरवर व्हिडियो पोस्ट करून पंजाब सरकारचे अपयश पुन्हा एकदा उघड केले आहे. पंजाब सरकारने आपल्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप मलिकाने केला आहे. पंजाब कॉंग्रेस सरकारने जी आश्वासने दिली होती त्याचा त्यांना विसर पडला आहे, अशी खंत तिने ट्विटरच्या माध्यमातून मांडली.
 
 
 
 
स्टार मुकबधीर बुद्धिबळपटू मलिका हांडाने ट्विट करत म्हंटले आहे की, "मला खूप दुःख होत आहे. ३१ डिसेंबरला मी पंजाबचे क्रीडामंत्री परगट सिंग यांची भेट घेतली होती. कर्णबधिर खेळासाठी त्यांच्याकडे असे कोणतेही धोरण नसल्याने ते मला नोकरी किंवा रोख रक्कम देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. माजी क्रीडामंत्र्यांनी माझ्यासाठी पुरस्कार जाहीर केला होता. याचे निमंत्रण पत्रदेखील माझ्याकडे आहे. पण हा कार्यक्रम कोविडमुळे रद्द झाला होता."
 
 
 
 
पुढे तिने म्हंटले आहे की, "ही गोष्ट मी ज्यावेळी विद्यमान क्रीडा मंत्री परगट सिंह यांना सांगितली त्यावेळी मी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असे उत्तर मिळाले. ही घोषणा माजी मंत्र्यांनी केली होती मी नाही, असे त्यांनी मला सांगितले. या सराकारने माझी पाच वर्षे वाया घालवली. मूकबधिर खेळाडूंची त्यांना पर्वा नाही. जिल्हा काँग्रेसने मला सांगितलेला पाठिंबा आणि आश्वासन ५ वर्षातही पूर्ण झालेले नाही. पंजाब सरकार माझ्याशी असे का करत आहे?" असा सवाल तिने केला आहे.
 
 
 
 
 
मलिका हांडा ही ७ वेळा राष्ट्रीय मुकबधीर बुद्धिबळ चॅम्पियन राहिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके जिंकली आहेत. तिने जागतिक मुकबधीर बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. या यशानंतरही राज्य सरकारने त्यांना मदत केली नाही. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये क्रीडा विभागाच्या संचालकांशी तिने संपर्क साधला होता. नोकरी आणि आर्थिक सहाय्यासाठी तिने सरकारकडे मदत मागितली होती. मात्र, तेव्हाही राज्य सरकारकडून उदासीन प्रतिसाद मिळाला होता. यावेळीही तिने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटर व्हिडियो पोस्ट केला होता.