‘नुक्कड साहित्य संमेलना’त शांताबाईंच्या साहित्याला उजाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2022   
Total Views |
 
Nukkad-Sahitya-Sammelan
 
 
 
पुणे : “शांताबाई शेळके यांचे कवितेवर प्रेम होते. शांताबाईंचा कविता हा श्वास होता. मराठी कवितेच्या प्रांतामध्ये शांताबाईंनी विहार करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सदानंद मोरे यांनी रविवार, दि. २ जानेवारी रोजी काढले. ‘विवेक साहित्य मंच’, ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ आणि ‘नुक्कड’ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राज्ञी शांताबाई शेळके जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘फर्ग्युसन महाविद्यालया’च्या ‘अ‍ॅम्पी थिएटर’मध्ये पार पडलेल्या ‘नुक्कड साहित्य संमेलना’मध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘नुक्कड साहित्य संमेलना’चे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी, महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी सदानंद मोरे यांनी शांताबाई शेळके यांच्या बाबतीतील आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, “पुण्यामध्ये शांताबाई शेळके यांनी ‘मकरंद साहित्यमाले’मध्ये कवितेसोबतच रहस्यकथाही लिहिल्या. त्यांनी अनेक गाण्यांना चालीसुद्धा दिल्या. व्यक्तिगत पातळीवर माझ्या पहिल्या पुस्तकाला नवलेखक योजनेतून अनुदान मिळाले. त्या पुस्तकाला शांताबाईंनी प्रस्तावना लिहिली.” याप्रसंगी डॉ. रवींद्रसिंग परदेसी यांनी ‘फर्ग्युसन महाविद्यालया’ला लाभलेला साहित्यिकांचा वारसा सांगताना महाविद्यालयामध्ये साहित्य संमेलन घेण्याबाबत विचारणा झाल्याबद्दल आभार मानले. त्याबरोबरच ‘विवेक साहित्य मंच’चे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी ‘नुक्कड साहित्य संमेलना’ची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी विक्रम भागवत यांच्या संकल्पनेतून ‘नुक्कड साहित्य संमेलना’ची सुरुवात झाल्याचे सांगितले.
 
 
यावेळी बीजभाषणातून प्रतिभा रानडे यांनी शांताबाई शेळके यांच्याबद्दल आठवणी सांगताना शांताबाईंच्या साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रानडे म्हणाल्या की, “शांताबाई शेळके यांना सर परशुराम महाविद्यालयात असताना श्री. म. माटे यांचे मार्गदर्शन लाभले आणि महाविद्यालयात असतानाच त्यांचे साहित्य बहरत गेले. शांताबाईंनी त्यांच्या कवितेतून निसर्गाशी एकरूप होऊन जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्याबरोबरच त्यांनी अनेक कवितांमधून विश्वाशी नाते जोडले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये उमटले. त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगताना चित्रपटगीते, बालगीते, हायकू आदी काव्य प्रकरांतून त्यांनी विपुल लेखन केले. शांताबाईंशी गप्पा मारण्याचा जास्त योग लाभला नाही. परंतु, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी मला बोलविल्यानंतर माझ्या त्यांच्याशीच गप्पा झाल्या आहेत, असे मला याक्षणी वाटते.”
 
 
 
रानडे यांनी शांताबाईंबाबत वैयक्तिक अनुभव सांगताना सांगितले की, “मी काबूलमध्ये असताना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तेथील दूतावासामध्ये महाराष्ट्राचे प्रतीक असणार्‍या तमाशामध्ये ‘रेशमांच्या रेघांनी...’ ही लावणी सादर केली. हे शांताबाईंना कळताच त्यांनी कौतुकही केले,” असे त्यांनी सांगितले.
 
 
परिसंवाद


संमेलनाच्या दुसर्‍या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाचे संजीवनी शिंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. परिसंवादामध्ये, ज्येष्ठ लेखिका नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली, ‘संवादसेतू’च्या संपादिका वंदना बोकील-कुलकर्णी, मराठी स्त्री संत साहित्याच्या अभ्यासिका रुपाली शिंदे, गरवारे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वर्षा तोडमल, मानसी चिटणीस यांनी सहभाग घेतला. यावेळी सहभागी परिसवादकांचे महेश पोहनेरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शांताबाईंच्या कथासाहित्याबाबत विश्लेषण करताना रुपाली शिंदे यांनी शांताबाईंच्या कविता कारण मध्यमवर्गाच्या उदयाच्या काळात त्यांची कथासाहित्यावर आधुनिकतेचा प्रभाव व परंपरेला बांधले गेल्याने अनुवाद या साहित्यप्रकारासारखी कथासाहित्य प्रकाराला आशय संपन्नता मिळाली नाही. तरीही त्यांच्या कथेमध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब ठळकरीत्या उमटलेले दिसते.
 
 
कादंबरीबाबत बोलताना वंदना बोकील-कुलकर्णी म्हणाल्या की, “शांताबाईंनी तरुण वयात कादंबर्‍यांचे लेखन केले. त्यांच्या कादंबर्‍यांमधून सामाजिक दस्तावेज पुढे येतानाच त्यांचे अनुभवविश्वदेखील पुढे येते. परंतु, त्यांच्या कादंबर्‍या आजच्या घडीला कुठेही उपलब्ध नसून त्यांच्या निवडक कथांचा संग्रह होणे गरजेचे आहे.” याबरोबरच शांताबाईंच्या ललितलेखनाबाबत बोलताना वर्षा तोडमल म्हणाल्या, “शांताबाईंच्या ललित साहित्यामधून साधी, सरळ, चित्रदर्शी शैली सापडते. त्यांच्या ललितगद्य लेखनामध्ये देशीपणा जाणवतो, सोबतच लेखनातून मनोविश्लेषण आणि शोधकता समोर येते.” अनुवादित साहित्याबाबत बोलताना मनीषा चिटणीस यांनी, शांताबाईंनी देशीदेशीचे अनेक भाषांमधील साहित्य प्रकारचे वाचन केल्यानेच त्यांनी इतर भाषेतील साहित्यकृतींचे अनुवाद केल्याने मराठीच्या कक्षा रुंदावल्या. यासाठी इतर लेखनाबरोबरच त्यांचे अनुवाद केलेले साहित्यसुद्धा त्यांच्या विशेष शैलीमुळे लोकप्रिय झाले.
 
 
 
मराठी माणसाला शांताबाईंनी ‘जाणकार माणूस’ केले

 
“परिसंवाद अध्यक्षा नीलिमा गुंडी यांनी शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते,” असे गौरोवोद्गार काढले. “शांताबाई प्रचंड बुद्धिमत्ता असूनही साध्या जीवन जगल्या. शांताबाईंच्या साहित्यावर इतके महान असूनही त्यांच्यावर अद्याप एकही पीएच.डी का झाली नाही? हा संशोधनाचा विषय आहे. शांताबाईंनी विपुल लेखन केले. परंतु, त्यांची ओळख एक कवयित्री म्हणूनच कायम राहिली. मराठी माणसाला शांताबाईंनी जाणकार माणूस केले. शांताबाईंच्या लेखनात स्मरणरंजन आढळते, असे बोलले जाते. परंतु, त्यांचे साहित्य म्हणजे स्मरणसंजीवन आहे. स्मरणरंजन म्हणणे म्हणजे त्यांचा साहित्याचा अपमान होय. मराठी रसिकतेचा निर्देशांक जर काढायचा असेल, तर त्यांचे श्रेय शांताबाईंनाच जाते.”
 
 
‘...तरी असेल गीत हे’ने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

 
तिसर्‍या सत्रात शांताबाईंनी लिहिलेल्या मराठी गीतांना रसिक श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सहभागी कलाकार, चैत्राली अभ्यंकर, केतन अत्रे यांना डॉ. नरेंद्र चिपळूणकर, ओंकार पाटणकर, ऋतुराज कोरे यांनी साथसंगत दिली. यावेळी ‘शूर आम्ही सरदार’, ‘रेशमांच्या रेघांनी’, ‘जीवलग’, ‘काटा रुते कुणाला’ यासारख्या गीतातून शांताबाईंच्या आठवणींना उजाळा मिळाला. या सत्राचे निवेदन डॉ. सुजाता शेणाई यांनी केले.
 
 
 
संमेलनाचा समारोप ‘नुक्कड कथा विश्व स्पर्धे’च्या विजेत्यांना पारितोषिक प्रदान करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या आजीव सदस्या सविता केळकर, ‘विवेक साहित्य मंच’चे महेश पोहनेरकर, आनंद काटिकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना २०२१ मधील प्रत्येक महिन्यातील कथा विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये ‘जानेवारी’च्या स्त्रीवादी कथा प्रकारातील स्पर्धेसाठी आणि शुभांगी निकम यांच्या आणि ‘काळी हसली’ या कथेस प्रथम, आशा पाटील यांच्या ‘तीळगुळ घ्या गोड बोला’ कथेस द्वितीय; फेब्रुवारीसाठी बोलकथा प्रकारातील स्पर्धेसाठीसोनाली ताम्हाणे यांच्या ‘ढग आणि तारा’ या कथेस प्रथम, तर ‘कष्टेवीण फळ नाही’ कथेस द्वितीय; मार्चसाठी पुरुषकथा प्रकारात ज्योती आफळे यांच्या ‘ते’स प्रथम, तर जयश्री दाणी यांच्या ‘कवी मरत नाही’ याकथेस द्वितीय, एप्रिलसाठी ग्रामीण कथा प्रकारात विशाल इंगोले यांच्या ‘दिव्यातील अंधार’ याकथेस प्रथम, तर मंजुषा गारखेडकर यांच्या ‘बंडी उलार’ कथेस द्वितीय; मे- ज्येष्ठ कथेसाठी सचिन देशपांडे यांच्या ‘दोघे’ कथेस प्रथम, तर स्वाती वैद्य यांच्या ‘भागी’ कथेस द्वितीय; जून- पाऊस कथा प्रकारात, रोशन कुमार पिलेवार याच्या ‘पाऊसपाणी’ कथेस प्रथम, तर माधुरी वरूडकर यांच्या ‘नकुशी’ कथेस द्वितीय; जुलै- महानगरीय कथा याप्रकारात उज्ज्वला रानडे यांच्या ‘धंदा’ कथेस प्रथम, तर सचिन देशपांडे यांच्या ‘रिचार्ज’ कथेस द्वितीय; ऑगस्ट- राजकीय कथा याप्रकारात योगिनी पाळंदे यांच्या ‘शेवटचे विमान’ कथेस प्रथम, तर स्वाती वैद्य यांच्या ‘या वळणावर’ कथेस द्वितीय; सप्टेंबर - सामाजिक कथा प्रकारात योगिनी पाळंदे यांच्या ‘जंगलम मंगलम’ याकथेस प्रथम, तर क्षमा शेलार यांच्या ‘मानूस’ या कथेस द्वितीय; ऑक्टोबर- भयकथा याप्रकारात वर्षा पतके थोटे यांच्या ‘गणपत भुताया’ कथेस प्रथम, तर ज्योती आफळे यांच्या ‘शोध’ कथेस द्वितीय; नोव्हेंबर- विनोदी कथा प्रकारात उज्ज्वला रानडे यांच्या ‘गोड बातमी’ याकथेस प्रथम तर स्वाती वैद्य यांच्या ‘आज भाय गरम हाय’ कथेस द्वितीय; पर्व एक व दोन च्या अनुक्रमेच्या नवनाथ पवार यांच्या ‘वावटळ’, सोनाली ताम्हणे यांच्या ‘बिया’ कथेस प्रथम, तर मीनाक्षी मोहरील यांच्या ’एकाकी’, तर नेहा पुजारी यांच्या ‘स्वातंत्र्य आणि मर्यादा’ कथेस द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
 
 
 
यावेळी सत्राचे अध्यक्ष कौशल इनामदार यांनी शांताबाईंच्या कवितेबद्दल सांगून “मराठीमधील साहित्य प्रकार जोपर्यंत बोलले, गुणगुणले जाणार नाहीत तोपर्यंत साहित्याचे वाङ्मय होणार नाही,” असे प्रतिपादन केले. याबरोबरच त्यांनी शांताबाईंच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देताना भाषा, साहित्य, संगीत आणि काव्य याबाबत त्यांचे मत प्रदर्शित केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘विवेक साहित्य मंच’च्या अर्चना कुरतडकर यांनी केले.
 
 
युवा अभिवाचकांकडून रंगला आठवणींचा बकुळगंध
 
 
ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात नेहा लिमये, मयूर भावे, मयूर सरकाळे, मनस्वी पेंढारकर, स्नेहल सुरसे यांनी शांताबाईंच्या प्रचलित नसणार्‍या कवितांचे अभिवाचन केले. या सत्राचे नेहा लिमये यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी काव्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण म्हात्रे व ‘पुना गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स’चे अजित गाडगीळ यांचा ‘विवेक समूहा’चे प्रबंधक संपादक दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते, तर अरुण म्हात्रे यांच्या हस्ते अभिवाचकांचासुद्धा सत्कार करण्यात आला.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@