मुंबई : विरारमध्ये एका शिवसेना विभाग प्रमुखाने एका महिलेला फोन करून शरीरसुखासाठी महिलांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विभाग प्रमुखाला रिक्षामध्ये चांगलाच चोप देण्यात येत असल्याचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या तक्रारीवरुन या शिवसेनेच्या विभागप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालक आक्रमक झाल्या आहेत. विरार पूर्वेच्या शिवसेना शाखेचा जितु खाडे असे या विभाग प्रमुखाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर पिडीत महिलेने सांगितले की, ती विरारमध्ये राहत असून रिक्षाचालक आहे. जितु खाडे तिला सतत फोन करून शरीरसुखासाठी कोणी महिला आहे का? अशी विचारणा करून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला वैतागून अखेर त्याला रिक्षामध्ये बसला असताना चपलेने तुडवले. त्यानंतर पिडीत महिलेने त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तर, शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी सांगितले की, "जितु सध्या फरार असून त्याच्या कृत्याला आमचा पाठिंबा नाही. वरिष्ठांनी बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल." असे आश्वासन दिले आहे. तर, इतरवेळी महिला सुरक्षा आणि आदर याबद्दल बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील विभागप्रमुखाचे कृत्य पाहून काय कारवाई करणार? असा प्रश्न स्थानिक आणि विरोधक विचारात आहेत.