शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक

    29-Jan-2022
Total Views |

IAS Sushil
 
 
पुणे : शिक्षक पात्रता परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून एका आयएएस अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून शनिवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३१ जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते सध्या कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत ते शिक्षण विभागात कार्यरत होते.
 
 
 
'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल सात हजार आठशे परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आली. त्याचबरोबर २०१८ रोजी झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवले असून त्याचीही पडताळणी सुरू आहे.', असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.