अबाईड विथ मी : गुलामगिरीची खूण मिटली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2022   
Total Views |

retreat
 
‘प्रजासत्ताक दिना’चा कार्यक्रम अतिशय उल्हासाने सर्वत्र संपन्न झाला. मात्र, त्याची सांगता दरवर्षी दि. २९ जानेवारीला संगीतमय सोहळ्याने होत असते. यंदाही ‘प्रजासत्ताक दिना’चा ‘बिटिंग द रिट्रीट’द्वारे आज समारोप होईल. पण, त्यात ‘अबाईड विथ मी’ ही सुरावट न वाजवण्यावरुन विरोधकांकडून निरर्थक वाद निर्माण केला जात आहे. त्याविषयी सविस्तर...
१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले, तर दि. २६ जानेवारी, १९५० रोजी भारतात राज्यघटना लागू झाली. तेव्हापासून अनुक्रमे ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ भारतीय राष्ट्रीय उत्सव झाले. दरवर्षी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीसह देशभरात दोन्ही उत्सव आनंदाने अगदी साजरे केले जाऊ लागले. सर्वसामान्यांसाठी ‘स्वातंत्र्य दिन’ किंवा ‘प्रजासत्ताक दिन’ एका दिवसाचा दिसत असला तरी शासकीय स्तरावर दोन्ही उत्सव साधारण आठवडाभरापर्यंत सुरु असतात. यंदा मात्र ‘प्रजासत्ताक दिना’चा उत्सव दि. २३ जानेवारी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून सुरु करण्यात आला. ‘आझाद हिंद सेने’च्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात संघर्ष करताना ब्रिटिशांवर तातडीने देश सोडण्याची वेळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आणली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सशस्त्र लढ्याच्या सन्मान, गौरवासाठीच यंदा त्यांच्या जयंतीदिनाला ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात आले. त्यानंतर ‘प्रजासत्ताक दिना’चा कार्यक्रमही अतिशय उल्हासाने सर्वत्र संपन्न झाला. मात्र, त्याची सांगता दरवर्षी दि. २९ जानेवारीला संगीतमय सोहळ्याने होत असते. यंदाही ‘प्रजासत्ताक दिना’चा अर्थात ‘बिटिंग द रिट्रीट’द्वारे शनिवारी समारोप होईल, पण त्यात ‘अबाईड विथ मी’ ही सुरावट न वाजवण्यावरुन विरोधकांकडून निरर्थक वाद निर्माण केला जात आहे.
 
‘बिटिंग द रिट्रीट’चा इतिहास
 
वस्तुतः ‘बिटिंग द रिट्रीट’ची सुरुवात १७व्या शतकात इंग्लंडमध्ये झाली. त्यावेळी किंग जेम्स द्वितीयने सायंकाळी युद्धसमाप्तीनंतर आपल्या सैनिकांना ड्रम वाजवणे, ध्वज झुकवणे आणि परेडच्या आयोजनाचे आदेश दिले होते. युद्धादरम्यान सूर्यास्तावेळी ‘सिंगल राऊंड फायरिंग’ने या कार्यक्रमाची सुरुवात होई. त्यावेळी या कार्यक्रमाला ‘वॉच सेटिंग’ म्हटले जात असे. ही परंपरा ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह कितीतरी देशांत आजही सुरु आहे.
भारतात ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमाची सुरुवात ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पहिल्या भारत दौर्‍यावेळी झाली होती. स्वातंत्र्यानंतर ब्रिटनचे शाही कुटुंब प्रथमच भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यांच्या पाहुणचारात कसलीही कमतरता राहू नये, अशी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी द ग्रेनेडियर्सचे अधिकारी मेजर जी. ए. रॉबर्ट्स यांना एका अनोख्या समारंभाच्या आयोजनाची सूचना केली. इथूनच ‘बिटिंग द रिट्रीट’ची सुरुवात झाली. ‘बिटिंग द रिट्रीट’कार्यक्रम ब्रिटिश साम्राज्यवादाच्या उरलेल्या अवशेषांचाच एक भाग आहे. यावेळी भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौसेनेचे बॅण्ड पारंपरिक सुरावटी वाजवत परेड करतात.
 
‘अबाईड विथ मी’
 
स्कॉटिश अँग्लीकन कवी हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी १८४७ साली ‘अबाईड विथ मी’ या येशू ख्रिस्ताची स्तुती करणार्‍या काव्यपंक्ती लिहिल्या. हेन्री फ्रान्सिस लाइट कवी तर होतेच, पण ते चर्चच्या ‘अँग्लीकन डिव्हाईन’ श्रेणीतील पाद्री वर्गातही सामील होते. ‘अँग्लीकन डिव्हाईन’ श्रेणीतील लोकांनी लिहिलेल्या धार्मिक लेख अथवा कवितांना धर्मावरील श्रद्धा व अध्यात्माचा मानदंड मानले जाते. ‘अबाईड विथ मी’ या येशू ख्रिस्ताची स्तुती करणार्‍या काव्यपंक्ती याच प्रकारातील. १८६१ मध्ये ‘अबाईड विथ मी’ या काव्यपंक्तींना विल्यम मॉन्क यांनी संगीताचा साज चढवला. हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी लिहिलेल्या येशू ख्रिस्ताच्या स्तुतीपर काव्यपंक्तीत ‘अबाईड विथ मी’ सर्वाधिक लोकप्रिय ठरली. महात्मा गांधींच्या आवडत्या ख्रिस्ती काव्यपंक्ती व सुरावटींपैकी ‘अबाईड विथ मी’ देखील होती, तर सन १९५० पासूनच ‘अबाईड विथ मी’ ‘प्रजासत्ताक दिना’च्या कार्यक्रमाचा भाग राहात आली.
 
वादाचा मुद्दा
 
दरम्यान, यंदाच्या ‘प्रजासत्ताक दिना’च्या समारोपाच्या ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमात ‘अबाईड विथ मी’चा समावेश करण्यात आलेला नाही आणि त्यावरुन विरोधकांकडून विनाकारण आरडाओरडा केला जात आहे. भारतीय लष्कराने शनिवारी जारी केलेल्या तपशील पुस्तिकेनुसार यंदा ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमात २६ सुरावटी वाजवण्यात येणार आहेत. त्यात ‘हे कांचा’, ‘चन्ना बिलोरी’, ‘जय जन्मभूमी’, ‘नृत्य सरिता’, ‘विजय जोश’, ‘केसरिया बन्ना’, ‘वीर सियाचिन’, ‘हाथरोई’, ‘विजय घोष’, ‘लडाकू’, ‘स्वदेशी’, ‘अमर चट्टान’, ‘गोल्डन अ‍ॅरोज’, ‘स्वर्ण जयंती’, ‘वीर सैनिक’, ‘फॅनफेयर बाय बगलर्स’, ‘आयएनएस इंडिया’, ‘यशस्वी’, ‘जय भारती’, ‘केरल’, ‘हिंद की सेना’, ‘कदम कदम बढाए जा’, ‘ड्रमर्स कॉल’, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ या सुरावटींचा समावेश आहे. पण, त्यात ‘अबाईड विथ मी’ नसल्याने काँग्रेसने मोदी सरकारकडून महात्मा गांधींचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यापासून ते गल्लीतल्या नेते-कार्यकर्त्यांपर्यंत सारेच यावरुन गोंधळ माजवत आहेत.
तथापि, ‘अबाईड विथ मी’ या काव्यपंक्तींची अथवा सुरावटींची रचना करण्यात महात्मा गांधींचा सहभाग नव्हता. इतकेच नव्हे, तर महात्मा गांधी हयात असतानाही भारतीय स्वातंत्र्यानंतर शासकीय कार्यक्रमात ‘अबाईड विथ मी’चा समावेश करण्यात आलेला नव्हता किंवा त्यांनी तशी कधी सूचनाही केलेली नव्हती. असे असताना ती सुरावट महात्मा गांधींचा वारसा कशी असू शकते? तसेच काँग्रेसला महात्मा गांधींच्या वारशाची काळजी कधीपासून वाटू लागली? खरे म्हणजे महात्मा गांधींच्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय वा आर्थिक वारशाची, विचारांची धुळधाण करण्यात काँग्रेसी नेते-कार्यकर्त्यांनीच सातत्याने पुढाकार घेतला.
एक मात्र नक्की की, ‘अबाईड विथ मी’ या सुरावटीचा ‘बिटिंग द रिट्रीट’मध्ये समावेश न केल्याच्या कारणावरुन काँग्रेसकडून केल्या जाणार्‍या टीकेमुळे तो पक्ष अजूनही ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा वारसा जपत असल्याचे ठळकपणे दिसून येते. मात्र, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राष्ट्रीय उत्सवांचे भारतीयीकरण करत आहे, यंदाच्या ‘बिटिंग द रिट्रीट’मध्ये भारतीय सुरावटींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महात्मा गांधीदेखील स्वदेशीचा नारा देत होते, मोदी सरकारही तेच करत आहे. त्यावरुन मोदी सरकार महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरणारे, तर स्वदेशीला नाकारणारे काँग्रेसजनच महात्मा गांधींना विरोध करणारे असल्याचे स्पष्ट होते.
आज ‘अबाईड विथ मी’ या ब्रिटिश साम्राज्यवादी सुरावटीपासून भारत स्वतंत्र होत असताना त्याचे स्वागत केले पाहिजे. त्याऐवजी आता ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ या सुरावटी वाजवल्या जात आहेत. विरोध करणार्‍या काँग्रेसींना या भारतीय सुरावटी जवळच्या वाटत नाहीत का? ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गीत तर जवाहरलाल नेहरुंच्यासमोर लता मंगेशकर यांनी गायले होते. तरीही त्याला विरोध का होत आहे? ‘अबाईड विथ मी’शी तमाम भारतवासीयांचे किंवा राजकारण्यांचे तरी नेमके नाते काय आहे? या सगळ्याचा तारतम्याने विचार केला पाहिजे. पण, तसे न होता फक्त मोदी सरकारने केलेय ना मग करा विरोध, असाच प्रकार सुरु आहे. याला मुर्खपणाचा कळस नव्हे तर काय म्हणणार?
दरम्यान, ‘प्रजासत्ताक दिना’च्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ब्रिटिश साम्राज्यवादाची निशाणी मिटवणारे इतरही अनेक निर्णय याआधीही घेतलेले आहेत. कारण, त्या माध्यमातून आपण परकीय गुलामगिरी प्रतिकात्मकरित्या झुगारुन देत असल्याचा संदेश सर्वत्र पोहोचत असतो. मोदी सरकार येईपर्यंत ‘आझाद हिंद सेने’तील सैनिकांना ‘प्रजासत्ताक दिना’पासून नेहमीच दूर ठेवले गेले. त्याच शूरवीर सैनिकांना परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या साथीने ‘प्रजासत्ताक दिना’च्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोदी सरकारने निमंत्रित केले होते. २०१५ साली ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमावेळी ब्रिटिशकालीन मिलिटरी बॅण्डसह सितार, संतुर, तबला या भारतीय शास्त्रीय वाद्यांचाही वापर करण्यात आला होता. २०१८ साली प्रथमच ‘बिटिंग द रिट्रीट’मधील २६ पैकी २५ सुरावटी भारतीय होत्या. २०१९ साली स्वतंत्र भारताची पहिली मार्शल सुरावट-शंखनादाला मार्शल सुरावटीऐवजी वाजवण्यात आले होते. ही सुरावट महार रेजिमेंटच्या शौर्याचे गुणगाण करते. यावरुनच जवाहरलाल नेहरुंपासून अन्य काँग्रेसी सरकारांनीही ब्रिटिश साम्राज्यवादाचे अंश हटवण्याचा प्रयत्न केला नसल्याचेच दिसून येते. त्यासाठी मोदी सरकारलाच सत्तेवर यावे लागले.
तत्पूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही ब्रिटिश साम्राज्यवादाच्या खुणा पुसण्याचे निर्णय घेण्यात आले. त्यात अर्थसंकल्पाशी संबंधित निर्णय महत्त्वाचा म्हटला पाहिजे. वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सायंकाळी ५ वाजता संसदेत सादर केला जात असे. कारण, त्यावेळी इंग्लंडमध्ये सकाळचे ११.३० वाजत असत आणि अर्थसंकल्प इंग्लंच्या वेळेनुसार तिथल्या सत्ताधार्‍यांना समोर ठेवून सादर केला जात असे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा प्रकार वर्षानुवर्षे सुरुच होता. पण, अटलबिहारी वाजपेयी यांनी ही पद्धत बदलली आणि अर्थसंकल्प भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सादर होऊ लागला. म्हणजेच, गुलामगिरीच्या खाणाखुणा मिटवण्याचे काम ज्या ज्या वेळी भाजप सरकार येते त्यावेळीच होत असल्याचे स्पष्ट होते. आताचा ‘बिटिंग द रिट्रीट’मध्ये ‘अबाईड विथ मी’ सुरावटीचा समावेश न करण्याचा निर्णयही त्याच धर्तीवरचा!
 
@@AUTHORINFO_V1@@