मुंबई : कोरोना संसर्गामुळे अनेक क्षेत्रांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पण या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा ट्रॅव्हल आणि टुरिझम या उद्योग क्षेत्राला बसला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावावा लागला आणि त्यामुळेच अनेक टुरिस्ट संस्थांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्याचमुळे येत्या अर्थसंकल्पाकडून या उद्योग क्षेत्राला मोठी अपेक्षा आहे.
या उद्योग क्षेत्राला बळ आणि पाठिंबा मिळावा म्हणून अर्थमंत्र्यांकडून या संबंधी मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी आशा या क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. ' मेक माय ट्रीप ', ' इक्सिगो ' आणि ' थॉमस कूक ' यांसारख्या कंपन्यांकडून लिव्ह ट्रॅव्हल अलाऊंस म्हणजेच LTA सूट मर्यादा वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच सध्या करदाता हा २ वर्षांतून एकदाच रजेच्या प्रवास सुटसाठी अर्ज करू शकतो. परंतु त्यांना वार्षिक पद्धतीने या सूटसाठी अर्ज करता यावा असे म्हणणे मेक माय ट्रीप चे राजेश मागो यांनी मांडले आहे. तसेच देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी काही तरतुदी केल्या पाहिजेत आणि त्यासाठी सरकार एक उत्तम योजना आणेल अशी शक्यता इक्सिगो या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलचे संस्थापक आलोक बाजपेयी यांनी मांडली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत पर्यटन आणि प्रवासावर होणाऱ्या खर्चासाठी जर आयकर डिˈडक्श्न् मिळाले तर या क्षेत्राला आणखी फायदा होऊ शकतो असेही मत बाजपेयी यांनी मांडले.
मागील वर्षी पर्यटन मंत्रालयासाठी साल २०२०-२१ मध्ये जी २५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती ती २०२६.७७ कोटी रुपये इतकी करण्यात आली होती आणि याचमुळे मागील वर्षी पर्यटन क्षेत्राला एक प्रकारे धक्काच बसला होता. परंतु आता ही तरतूद वाढवावी आणि परदेशी हॉलिडे पॅकेजवर लागणारा ५ टक्के टीसीएस (tax at source) हा काढून टाकावा अश्या मागण्या जोर धरत आहेत. तेव्हा यावेळी अर्थमंत्र्यांकडून ट्रॅव्हल आणि टुरिझम उद्योगाला असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होणार का? याकडेच संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.