मेरे को सब आता है!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2022   
Total Views |

rahul gandhi
मला पण कळतं ना? सगळं सगळं बदललं. माझं असं मनमौजी जगणं होतं. परदेश वारी करायची, नॅनीकडे जायचे. ते म्हणतात ना, मामाच्या गावाला जायचे. तर तसं अर्ध भारतात आणि अर्ध मामाच्या गावात असं माझं छान आयुष्य होतं. पण, सगळं सगळं संपलं. याला कारणीभूत कोण? ते मोदीकाकाच! आमचं राज्य होतं राज्य. पण, आता काय? काहीच नाही शून्य झालोत! निवडणुकीत पण शून्य सिट जिंकू लागलो. याला पण कारण ते मोदीकाकाच!! तुम्हाला सांगू का, मोदीकाका त्या ट्विटरला सांगतात की, याचे ‘फॉलोअर्स’ वाढवू नको. थांबा, आता मला सांगून त्यांचं घर उन्हातच बांधतो. मोदीकाका काम का बरं करतात? काय तर रात्री १ वाजता ते मोदीकाका आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी रेल्वे स्टेशनची पाहणी करत होते. काय गरज होती का? मग लोकांना वाटतं मी काय करतो? काय म्हणता, मग मी का नाही काम करत? हे बघा, असं बोलू नका, नाही तर तुमचं पण घर उन्हात बांधीन, नाय तर माझ्या महाराष्ट्रातल्या नव्या सेनापतींना सांगेन. मग बघा ते वाघनखं घालून कसा कोथळा बाहेर काढतील ते!!! आता कोथळा, वाघनखंबिखं मला काही माहिती नाही. पण, महाराष्ट्रातले ते सेनापती सारखं असं म्हणत असतात. मी मम्माला विचारले की, “वाघनखं म्हणजे काय गं?” तर ती म्हणाली, “कोणत्या वाघाची नखं? वाघाची नखं तर आपण २०१९ सालीच काढली.” मी म्हणालो, “बिननखांचा वाघ असतो का?” तर मम्मा किती हसली. शरदकाकांना कळले तर ते पण हसत होते. आता यात हसण्यासारखे काय झाले? जाऊ दे, मोठ्या माणसांच्या गोष्टीत लहानांनी तोंड घालू नये. त्यामुळे मी काही बोललो नाही. आणखी एक आहे कमळवाल्यांना आणि भारतातल्या बहुसंख्य लोकांना वाटते की, मोदीकाकाच काम करतात. पण, मोदीकाकांकडे माझ्यासारख्या ‘आयड्या’ आहेत का? ‘आलूपासून सोना’ बनवण्याचे कुणीतरी विचार करेल का? माझ्यातला हा ‘युनिक पॉईंट’ कुणी कसा विसरू शकेल? मी तर हाथरसला पण गेलो. तिथे पण पडलो. पण, कोणी त्याबद्दल काहीही म्हणाले नाही. मोदीकाकांच्या गळ्यात पण पडलो ना? पण, काहीही नाही. जाऊ दे, पण एक सांगू का, मोदीकाकांनी जनतेसाठी कितीही काम केले तरी ‘मैं मैं हू, मैं हू ना.. मेरे को सब आता हैं...’
 

अन्सारी, तुम्ही राष्ट्रवाद शिकवू नका!

 
“भारतात असहिष्णूता वाढली आहे. स्थापित नागरी राष्ट्रवादाच्या विरोधात काल्पनिक, सांस्कृतिक राष्ट्रवाद मुद्दाम उभा केला जातो. त्यांना धार्मिक बहुमत दाखवून राजकीय एकाधिकार करायचा आहे,” असे मत भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नुकतेच व्यक्त केले. हे मत त्यांनी मांडले कुठे, तर ‘इंडियन-अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’च्या कार्यक्रमात. त्यांच्या या म्हणण्याला अमेरिकेचे खासदार एड मर्की, जिम मैकगवर्न, एंडी लेविन आणि जेमी रस्किन यांनी दुजोरा दिला. त्यांनीही मतं मांडलं की, “हो हो, भारतात असहिष्णूता वाढत आहे.” मुळात प्रश्न असा की, भारतात राहून, भारताचे खाऊन उपराष्ट्रपतीपदाचे सर्वोच्च बहुमान भुषवून वर भारताविरोधातच वक्तव्य करताना या हमीद यांना काहीच वाटले नाही? हे असे बोलल्यामुळे मोदी आणि भाजपची कमी, मात्र देशाची बदनामी होते, हे हमीद यांना कळत नसेल, तर त्यांना ज्यांनी कोणी उपराष्ट्रपती बनवले, त्यांच्या विचारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हमीद ज्या नागरी राष्ट्रवादाचा उच्चार करतात, त्या नागरी राष्ट्रवादाचे सत्व त्यांनी तरी जपले का? भारताच्या गल्लीबोळात अगदी रस्त्यावर राहणाऱ्या कफल्लक माणसासमोर जरी भारताविरोधात बोलले तरी त्याला वाईट वाटते. तो आपल्य भारताचे सगळे चांगलेचुंगले सांगत बसतो. या परिक्षेपात माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आधी आपला भारतीय नागरिकत्वाचा राष्ट्रवाद तपासावा. अन्सारी सांस्कृतिक राष्ट्रवादाला ‘कल्पना’ म्हणतात. तो ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ समजून घ्यायची तसदीसुद्धा ते घेणार नाहीत. ‘मोदी, योगी गये तो तुम्हारा क्या होगा’ असे विचारणाऱ्या ओवेसी बंधुंनासुद्धा हा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ समजून घ्यायचा नाहीच. कारण, ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची मुळे आशिया खंडाच्या बाहेरपर्यंत आहेत. भारताचा असा विस्तार ‘भारत तेरे तुकडे होंगे...’ची मनोवृत्ती बाळगणाऱ्यांना कधीच आवडणार नाही. ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ला ‘काल्पनिक’ मानणाऱ्या हमीद अन्सारी यांना जागतिक ‘मुस्लीम ब्रदरहूड’ काल्पनिक वाटतो का? या प्रश्नाचे उत्तर हमीद देणार का? कारण, या उत्तरातच भारत असहिष्णू आहे की,हमीद अन्सारी आणि त्यांच्या सारखाच भारताला असहिष्णू ठरवणारी गँग असहिष्णू आहे, हे स्पष्ट होईल. तुर्तास आम्हाला आमचा भारत माहिती आहे. भारताची खोटी निंदा करणाऱ्यांकडून भारत समजून घेण्याइतकी वाईट वेळ सध्या आलेली नाही!
 
@@AUTHORINFO_V1@@