उज्जैन : काशी विश्वनाथानंतर आता उज्जैनच्या महाकाल मंदिरालाही त्याच स्वरुपात भव्यता देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी ७०५ कोटी रुपयांच्या महाकाळ विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आहे. येत्या महाशिवरात्रीपूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिथे महाकालाचे सहज दर्शन घेता येईल, तिथे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाकाल कॉम्प्लेक्सचा विस्तार होणार आहे. सध्या २.८२ हेक्टरमध्ये पसरलेले हे संकुल ४ पटीने वाढून २० हेक्टर होणार आहे. यामध्ये महाकाल पथ, महाकाल वाटिका, रुद्रसागर तट यांचा समावेश आहे. या संकुलात राहणे आणि फिरणे याशिवाय इतरही अनेक सुविधा असतील. या प्रकल्पामध्ये महाकाल पथ, महाकाल वाटिका, रुद्रसागर किनारपट्टीच्या विकास कामांचा समावेश आहे. त्रिवेणी संग्रहालयासमोर वाहनांसाठी पार्किंगची जागाही तयार करण्यात येत आहे. डिसेंबर २०२१ मध्येच, फेब्रुवारी २०२२ पासून रुद्रसागरमध्ये गटाराच्या पाण्याचा एक थेंबही येऊ देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता.
उज्जैनचे जिल्हा दंडाधिकारी आयएएस आशिष सिंह यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “महाकाल विस्तार प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम महाशिवरात्रीपूर्वी पूर्ण होईल. दुसरा टप्पा जून २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर तासाला सुमारे १ लाख भाविक कोणत्याही व्यत्ययाशिवाय महाकालाचे दर्शन घेऊ शकतील. भाविकांच्या सोयीसाठी UDA मार्फत १८ कोटी रुपये खर्चून भक्त सुविधा केंद्र बांधण्यात येत आहे. स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या प्रकल्पावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.