मृत्यूशी दोन हात करणारा प्राणिसखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2022   
Total Views |
 
Ashok Lakde 
 
सहा ते सातवेळा प्राणघातक हल्ले आणि प्राण्यांच्या चाव्यांचे संपूर्ण शरीरावर ३३ टाके त्यांनी पचवले. जाणून घेऊया अशा या प्राणिप्रेमासाठी दुकान, सोनंनाणं आणि घरदार विकणाऱ्या अशोक लकडे यांच्या थरारक प्रवासाविषयी...
 
 
अशोक अप्पासाहेब लकडे यांचा जन्म सांगलीतील मिरजमधला. विद्यामंदिर प्रशालेत नववीपर्यंतचे शिक्षण. आई अक्काताईला प्राणिप्रेमाची आवड. त्यामुळे जखमी अवस्थेतील प्राणी लोकं त्यांच्या घरी आणून सोडत. त्यानंतर आई त्यांचे संगोपन करायची. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अशोक यांनी काही वर्ष धान्याचे वडिलोपार्जित दुकान सांभाळल्यानंतर पूर्णवेळ प्राणिप्रेमासाठी देण्याचा निर्णय घेतला. जखमी प्राण्यांची माहिती समजल्यावर लकडे सायकलवर जाऊन प्राण्याला घेऊन येत. बालपणापासूनच लकडे कुटुंबीयांच्या पाच हजार चौ.फुटांच्या संपूर्ण घरात प्राण्यांचा वावर असायचा. विशेष म्हणजे, लकडे यांनी घराबाहेर एक पाळणा आणि घंटा ठेवली होती. या पाळण्यात लोकं जखमी प्राण्यांना ठेवून जात. पहिल्यांदा सुभाषनगर परिसरात जखमी अवस्थेतील कावळ्याला त्यांनी जीवनदान दिले आणि येथूनच सुरू झाला त्यांच्या प्राणिप्रेमाचा थरारक आणि तितकाच थक्क करणारा अनोखा प्रवास...
 
प्रतापसिंह उद्यानात अनेक प्राण्यांचे मृत्यू होत असताना उद्यानातील ४३ सिंहांपैकी १६ सिंह वाचवण्यात लकडे यशस्वी ठरले. लकडेंची ही धडपड माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मनेका गांधी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी लकडेंना ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’ संस्थेत सामील होण्याची विनंती केली. त्यानंतर लकडेंनी या संस्थेसोबत काम सुरू केल्याने प्रयत्नांना आणखी बळ मिळाले. सशांची शिकार, बत्तीस शिराळा येथील नागांची जत्रा तसेच बैलगाडा शर्यतींविरोधात लकडेंनी आवाज उठवला. कामाचा आवाका वाढत गेला आणि लकडेंसोबत एक हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले. नंतर लकडे यांना सांगलीबरोबरच सातारा आणि कोल्हापूरचीही जबाबदारी मिळाली. प्राणिप्रेमासाठी पैसा प्रचंड लागतो आणि सरकार अनुदान देत नाही. म्हणून प्राणी वाचवण्याच्या वेडापायी अनेक लोकांकडून कर्जे घ्यावी लागली. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांचे पाच हजार चौ. फुटांचे घर, १३ तोळे दागिने आणि धान्याचे दुकान विकावे लागले. यानंतर त्यांनी पंढरपूरमधील स्मशानभूमीच्या जवळील एका ओढ्याच्या किनारी झोपडीत प्राण्यांसहित आपले बस्तान हलवले. दीड महिन्यांनंतर त्यांनी हॉटेल सुरू केले. २००८ साली राहायला घर नसल्याने त्यांनी सांगलीतील पार्श्वनाथ नगरमधील शहानुल्ला बिल्डर्सकडे वॉचमनची नोकरी सुरू केली आणि याच ठिकाणी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये आई, पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहू लागले.
 
शहानुल्ला बिल्डर व चेतन चोपडे यांनी लकडे यांचे काम लक्षात घेऊन स्मशानभूमीजवळील दहा हजार चौ. फुटांची जागा त्यांना उपलब्ध करून दिली आणि याच ठिकाणी पुन्हा प्राणिघर दिमाखात उभे राहिले. शासनाच्या असहकार्यामुळे आणि जाचक अटींमुळे हिंस्र प्राण्यांचे संगोपन बंद करत २३ घार, तीन माकड, एक घुबड, तीन बगळे, चार कासव कात्रजच्या उद्यानाला सोपवले. जखमी अवस्थेतील पारवा, कावळा, सुगरण, बदक, घुबड, हात-पाय तुटलेल्या २६ भाकड गायी, एक म्हैस, दोन शेळ्या, सात गाढव, दोन घोडे, दोन राजहंस, ससे, टर्की देशातील मोर, कडकनाथ प्रकरणातील लोकांनी फेकून दिलेल्या ३५ कोंबड्या, ५२ मांजर, कबुतर, कुत्री २२ असे १९९ प्राणी सध्या लकडेंच्या प्राणिघरात आहेत.
 
दररोज साडेचार हजारांचा खर्च, मात्र अनुदान आणि मदत तुटपुंजी. कुणी मदतीसाठी उत्सुक असल्यास त्यांना प्राणिघरात ज्या गोष्टी संपल्या आहेत, त्या विकत घेऊन द्यायला सांगतात. घर विकून प्राणिप्रेम करत असल्याने नातलग ‘भिकेला लागला’ म्हणून हिणवतात. बत्तीस शिराळा येथे नागांची जत्रा बंद केल्याच्या कारणास्तव लकडे यांच्या जुन्या घराची मागची बाजू पेटवून देण्यात आली. मात्र, “सोबत पत्नी शुभांगी, आई आणि साक्षात परमेश्वर असल्याने मी त्याची चिंता करत नाही,” असं लकडे सांगतात. साडेपाच लाखांचे कर्ज असूनही प्राणिप्रेमाशी त्यांनी कदापि तडजोड नाही. प्राणिघराविषयी परिसरातील लोकं प्रशासनाकडे तक्रारी करतात, याविषयी देखील लकडे खंत व्यक्त करतात.
 
तब्बल सहा ते सात वेळा प्राणघातक हल्ले होऊनही लकडेंनी आपलं प्राणिप्रेम सोडलं नाही. २००७ साली कवठे-महाकाळमध्ये बैलगाडी शर्यतीला विरोध करत असता दोन बैलगाड्या त्यांच्या चक्क अंगावरून गेल्या. मिरजेत गोवंश वाचवण्यासाठी गेले असता १० ते १५ जण त्यांच्या पाठीमागे तलवारी घेऊन लागले. त्यावेळी दीड किलोमीटर धावून चकवा देत घरामध्ये लपून त्यांनी आपला जीव वाचवला. सध्या तोंडाला २२ टाके, एका पायाला सात व दुसऱ्या पायाला पाच टाके आहेत. प्राण्यांना एकदा सवय झाली की, ते त्रास देत नाहीत, असं लकडे सांगतात. लकडे यांना आजपर्यंत ४९ पुरस्कार मिळाले आहेत. प्राणिप्रेमापोटी जीवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या अशोक लकडे यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@