नवपराक्रमी ‘मालविका’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2022   
Total Views |

Sayali Bansod
 
 
 
अल्पावधीत पदकविजेत्या सायनाला हरवून प्रसिद्धीझोतात आलेल्या नागपूरच्या मालविका बनसोडच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...
 
 
जागतिक बॅडमिंटन विश्वात भारतीय खेळाडूंचे कौशल्य विशेषत्वाने अधोरेखित केले जाते. अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी आजवर उत्तम कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. अनेक बॅडमिंटनपटूंनी देशाच्या कानाकोपर्‍यातून येत आपल्या नावाचा डंका जागतिक पातळीवर वाजवला. क्रिकेटचा सर्वाधिक चाहता वर्ग मानल्या जाणार्‍या भारतात आता बॅडमिंटनचादेखील चांगलाच विकास होताना दिसतो. भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांनी ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धेसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी बॅडमिंटन या खेळाविषयी युवकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत पुढच्या पिढीत सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या उदयोन्मुख खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन विश्वात स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले. अशाप्रकारे गेल्या काही दशकांपासून भारतीय बॅडमिंटन क्षेत्र बहरत चालले आहे. आता या खेळाडूंचा आदर्श घेऊन पुढची पिढीदेखील अनोखी कामगिरी करत आपले कौशल्य दाखवत आहे. सध्या असेच एक नाव चर्चेत आहे, ते नाव म्हणजे, नागपूरची मालविका बनसोड.
 
 
 
देशासाठी ‘ऑलिम्पिक’ पदक जिंकलेल्या, भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील आघाडीची खेळाडू असलेल्या सायना नेहवालचा आपल्या क्रीडाकौशल्याने अवघ्या ३४ मिनिटांत पराभव केला. पुढे तिला जेतेपद गाठता आले नाही. मात्र, सायनाचा पराभव करुन तिने देशभरात नाव कमावले. जाणून घेऊया तिच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल... मालविका बनसोडचा जन्म दि. १५ सप्टेंबर, २००१ रोजी नागपूरमध्ये झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरमधीलच ‘मदर्स पेट किंडरगार्टन’ आणि ‘सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड’ येथे झाले. मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोड हे नागपुरात दंत चिकित्सालय चालवतात, तर या कामात मालविकाची आई डॉ. तृप्ती बनसोड या मदत करतात. वयाच्या आठव्या वर्षी मालविकाने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. मालविकाच्या यशामागे तिच्या आईचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. कारण, लहान असताना मालविकाची आई तिला नागपूरमधील शिवाजी नगरच्या मैदानावर घेऊन गेली होती. यावेळी पहिल्यांदा तिचा संबंध हा ‘बास्केटबॉल’शी आला. मात्र, हा क्रीडा प्रकार तिला तितकासा आवडला नाही. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच तिला बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाली आणि तिचे नशीबच पालटले. शालेय पातळीवर तिने अनेक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे, ‘स्कूल गेम फेडरेशन’मध्ये तिने तीन सुवर्णपदके मिळविली. यादरम्यान मालविकाला तिच्या कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुढे तिला प्रशिक्षक संजय मिश्रा यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी रायपूर गाठावे लागले. यावेळी मालविकाला कोणतीही अडचण येऊ नये आणि तिच्या प्रशिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी तिच्या आईने नागपूर सोडून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली.
 
 
 
यादरम्यान मालविकाने १३ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटात राज्य चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले. मात्र, २०१८ मध्ये ती ‘आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप’साठी पात्र ठरली नाही. पण, या अपयशाने खचून न जाता पुढे कॅनडातील ‘जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सलग दोन निवड स्पर्धा तिने जिंकल्या. २०१८च्या डिसेंबरमध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या २१ वर्षांखालील दक्षिण आशियाई विभागीय चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि सांघिक अशा दोन्ही स्पर्धांमध्ये ती विजेती ठरली. पुढे २०१९ मध्ये मालविकाने ‘अखिल भारतीय वरिष्ठ क्रमवारी स्पर्धा’ आणि ‘अखिल भारतीय कनिष्ठ क्रमवारी स्पर्धा’ जिंकल्या. याचवर्षी तिने ‘बल्गेरियन ज्युनियर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप’मध्ये कांस्यपदक पटकावले आणि त्याचवर्षी तिने मालदीव ‘आंतरराष्ट्रीय भविष्य मालिका बॅडमिंटन स्पर्धे’तही विजेतेपद मिळवून वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तसेच, नेपाळमध्ये झालेल्या ‘अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिकां’मध्ये विजेतेपद आणि बहारीनमध्ये आंतरराष्ट्रीय मालिकेत कांस्यपदक पटकावत सलग दोन महिन्यांत केलेल्या या कामगिरीमुळे जगातील अव्वल २०० बॅडमिंटनपटूंच्या यादीत प्रवेश केला. सध्या जागतिक क्रमवारीत तिचा ११५वा क्रमांक आहे.
 
 
 
२०२१ मध्ये ती ‘ऑस्ट्रियन ओपन आंतरराष्ट्रीय मालिका’ खेळली. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत तिचा स्पेनच्या क्लारा अझुरमेंडीविरुद्ध पराभव झाला. तिच्या या कामगिरीसाठी तिला ‘खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट अ‍ॅथलिट पुरस्कार’ आणि ‘लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीम अ‍ॅथलिट पुरस्कारा’ने गौरवविण्यात आले. परंतु, नागपूरच्या या कन्येची देशभरात चर्चा झाली, ती तिने तिचा आदर्श असलेल्या सायनाच पराभव करत फक्त खेळावरच विजय मिळवला नाही, तर मानसिकदृष्ट्याही ती किती आत्मविश्वासू आणि सकारात्मक आहे, हेदेखील सिद्ध केले. ‘इंडिया ओपन २०२२’मध्ये सायना आणि तिच्यात झालेल्या सामन्यात ‘२१-१७’, ‘२१-९’ अशी मात करत अवघ्या ३४ मिनिटांत विजय मिळवला. देशभरातून तिच्या या खेळाचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे, सायनानेदेखील तिचे कौतुक केले. तिच्या खेळातील परिपक्वता आणि निर्भीडपणा असाच राहो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 
@@AUTHORINFO_V1@@